उद्धरेत् आत्मना आत्मानम्
डॉ. अनिरुद्धांचा अग्रलेख
अगदी लहानपणापासून प्रत्येकाला काही करायचे असते आणि काही बनायचे असते, म्हणजेच काहीतरी बदलायचे असते. हा हवा असणारा बदल ही त्या त्या मानवासाठी त्याच्या अपेक्षित प्रगतीची पाऊलवाट असते. अगदी दहा वर्षाच्या बालकापासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धावस्थेत येऊन पोहोचलेल्या प्रौढापर्यंत प्रत्येकाला आहे त्या स्थितीत, आपण आणखी काही चांगले करायला हवे होते, मिळवायला हवे होते असे वाटतच राहते.
मानवाची ही स्वत:च्या परिस्थितीत अधिक चांगले बदल घडवून आणण्याची इच्छाच त्याच्या विकासाला कारणीभूत ठरते. परंतु बर्याच वेळा असे लक्षात येते – ‘प्रयत्नांच्या पाऊलवाटा अंंती निघाल्या विगती’. केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरतात तर काही वेळा चुकीच्या गोष्टीसाठीच प्रयत्न केले जातात. आपले जीवन शांत, तृप्त व भरभराटलेले असावे ही अगदी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु असे होत मात्र नाही आणि म्हणूनच जीवनामध्ये वारंवार अशांती, अतृप्ती व असहाय्यतेचे अनुभव येत राहतात.
खूप काही स्वप्न बघितली, खूप काही निश्चय केले, परंतु त्यानुसार उचित परिश्रम घडून कृतकृत्य झालो व आनंदीत राहिलो असे होताना दिसत नाही.
जीवनाचा सर्वांगीण विकास घडवून आणून शांती व तृप्तीचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकाला आवश्यकता असते ती ह्या महावाक्याचा अर्थ नीट समजून घेऊन त्यानुसार आचरण करण्याची.
अगदी सरळ साध्या भाषेत, माझा उद्धार फक्त मीच करू शकतो. मग तो सामान्य प्रापंचिक जीवनातील विकासाचा मार्ग असो किंवा पूर्ण ‘मी’पणा विरघळून टाकून परमेश्वराशी एकरूप होण्याचा मोक्षप्राप्तीचा मार्ग असो, परिश्रम मलाच करायचे असतात.
आमची चूक घडते ती इथेच. आमच्या स्वत:च्या विकासासाठी जोपर्यंत आम्ही आजूबाजूच्या परिस्थितीवर, दुसर्या कुणाच्या मदतीवर, चमत्कारांवर किंवा प्रारब्धावर अवलंबून असतो तोपर्यंत आम्ही आमचे ध्येय कधीच गाठू शकत नाही. कुठल्याही उचित मार्गावरील प्रयासांसाठी स्वत:ची ताकद स्वत:च मिळवायची असते. परावलंबी जीवन आणि पुस्तकी विद्या कधीच कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. त्यासाठी आवश्यकता असते अनुभव घेण्यास सिद्ध असणार्या स्वावलंबनाची. जो स्वावलंबी नाही, तो अर्थातच अपंग आहे आणि म्हणूनच असमर्थही. हेलन केलरसारखी अनेकविध शारीरिक अपंगत्व असलेली स्त्री तिच्या स्वावलंबी बनण्याच्या प्रयासांमुळे सर्व जगाला प्रेरणा देणारी ठरते, मग शारीरिकदृष्ट्या धडधाकट असणार्या आम्हाला काय अशक्य आहे? तुम्ही म्हणाल, पण हेलनला सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी ती शिक्षिका आवश्यक होतीच ना? होय, बरोबर आहे. परंतु अपंगत्वाची परिसीमा असताना परिश्रम करू इच्छिणार्या त्या बालिकेला कुठल्या ना कुठल्या रूपात ते परमेश्वरी प्रेम मदत करणारच होते. त्या जिद्दी अपंग बालिकेसाठी परमेश्वराचे प्रेमच त्या शिक्षिकेच्या रूपात अवतीर्ण झाले. नाही, परमेश्वरी प्रेमाला तेथे यावेच लागले.
उद्धार म्हणजे नक्की काय? पापातून मुक्ती, अधिक पुण्याचा संचय, गरिबीतून श्रीमंतीकडे वाटचाल, अनीतिकडून नीतिकडे वाटचाल की दुर्बळतेकडून सामर्थ्याकडे वाटचाल? म्हटले तर ह्यातील प्रत्येक गोष्ट किंवा म्हटले तर ह्यातील एकही नाही. ‘उद्धार’ म्हणजे परमेश्वरी मार्गाने म्हणजेच सत्य व प्रेमाच्या मार्गाने वाटचाल करून आनंद प्राप्त करण्याचा मिळविलेला अधिकार.
मात्र ह्या वाटचालीत सत्य म्हणजे काय व प्रेम म्हणजे काय ह्याची नीट ओळख असावी लागते. सत्य आणि वास्तव ह्या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. समजा मी सत्यच बोलण्याचे ठरविले आहे व एक असहाय्य तरुणी धावत माझ्याकडे आली व म्हणाली,‘‘माझ्यामागे गुंड लागले आहेत, मी तुमच्या घरात लपते.’’ पाठीमागून थोड्या वेळात गुंड आले व त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्ही अशा मुलीला पाहिलेत काय?’’ मग मी उत्तर काय द्यावे? ‘‘होय, ती मुलगी माझ्या घरात लपली आहे.’’ हे माझे उत्तर मला सत्याचरणी बनवेल काय? माझे बोलणे वास्तवपूर्ण असेल परंतु त्यात सत्याचा अंशही नसेल कारण त्या बोलण्यातून उत्पन्न होणार आहे बलात्कार, एक निंद्य, अपवित्र व घृणास्पद घटना. ह्याचाच अर्थ ज्यातून पावित्र्य उत्पन्न होते वा राखले जाते, तेच सत्य. सगळ्यात आवश्यकता असते स्वत:शीच सत्य बोलण्याची आणि तेच आम्ही कधी करत नाही. आम्ही स्वत:शीच जास्तीतजास्त खोटे बोलतो. स्वत:च्या स्थितीला बाकी सर्व गोष्टींना जबाबदार धरून, लंगड्या सबबी मी स्वत:च्याच बुद्धीला पटवून देतो व इथेच माझी स्वत:चा उद्धार करण्याची क्षमता घालवून बसतो. ‘सबब’ हे माझ्या संपूर्ण जीवनाचा नाश करू शकणारे फार मोठे संहारक अस्त्र आहे.
जो स्वत:च्या चुका ओळखून, त्यांचा जास्त बाऊही न करता त्या सुधारण्यासाठी परिश्रम करतो, तोच खरा यशस्वी होय. मग त्याचे ध्येय; धन, कीर्ती व सत्ताप्राप्तीचे असो वा परमेश्वरप्राप्तीचे असो. परंतु जीवनाच्या प्रवासात ‘प्रेम’ नसेल तर सत्य लंगडे पडते. प्रेम म्हणजे ‘लाभेविण प्रीति’. असे प्रेम, ही ह्या जगातील सर्वात मोठी ताकद आहे. प्रेमाच्या ताकदीपुढे कुठलीही संहारक व विघातक त्रासदायी शक्ती नेहमीच हरते.
माझा प्रपंच, माझा गृहस्थाश्रम म्हणजे असे प्रेम करण्यास शिकण्याची सर्वात मोठी व अगदी सोपी कार्यशाळा आहे. परंतु तिथेही आमचा थोडासा अपमान झाला किंवा काही मनाविरूद्ध घडले, की आमचा त्या व्यक्तिविषयीचा आपलेपणा संपुष्टात येतो. मग माझ्या घराबाहेरच्यांची काय कथा! तेथे तर अगदी लहानसहान गोष्टींसाठीसुद्धा मी द्वेषाच्या व शत्रुत्वाच्या राशीच्या राशी उभ्या करत असतो व हाच द्वेष माझ्या आजूबाजूच्या वातावरणात भरभरून राहिल्यामुळे परत परत माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्याच जीवनात शिरत राहतो व त्याचे विषारी परिणाम आम्ही भोगतच राहतो.
मनापासून प्रेम करण्याचा प्रयत्न करा व पावित्र्याचा मार्ग सोडू नका. मग संपूर्ण जग तुमचेच आहे. कारण ह्या परमेश्वराच्या राज्यात संपूर्ण लोकशाही आहे. लोकशाहीत ज्याप्रमाणे प्रत्येक मतदार हाच शासक असतो, शासन निवडत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक मानव स्वत:च स्वत:चे प्रारब्ध घडवत असतो. परमेश्वराने प्रत्येकाला पूर्ण कर्मस्वातंत्र्य दिलेलेच आहे. मानवी लोकशाहीत जपले जाते, त्याच्याहीपेक्षा अनेकपटीने जास्त वक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य व उच्चारस्वातंत्र्य मानवाला परमेश्वराने बहाल केलेले आहे. परंतु मानवी लोकशाहीत ज्याप्रमाणे जसे लोक, जसा लोकांच्या मतस्वातंत्र्याचा उपयोग तसेच सरकार त्यांना प्राप्त होते, त्याचप्रमाणे जशी व्यक्ती व जशी व्यक्तीची सत्य व प्रेमाच्या बाबतीत बांधीलकी तसेच प्रारब्ध त्या व्यक्तीला प्राप्त होते.
आम्ही लोकशाहीत एकतर आधी मतदान करत नाही व केलेच तर कुठल्याही मूल्यांच्या विचाराशिवाय असमंजसपणे करतो व त्याचे ङ्गळ म्हणून चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता जाऊ शकते. त्याचप्रमाणे माझ्या स्वत:च्या जीवनात चुकीच्या मतांमुळे किंवा विचारसरणीत स्पष्टता नसल्यामुळे माझे जीवन त्रासदायक परिस्थितीच्या अधीन होते.
प्रारब्धापेक्षा पुरुषार्थ हा नेहमीच जास्त बलवत्तर असतो. फक्त त्याला शक्तिपुरवठा करणार्या सत्य व प्रेम ह्या परमेश्वरी गुणांना टाकून देऊन हे होणे नाही.
कुठल्याही लोकशाही राष्ट्रात जेव्हा नागरिक असे म्हणतात की आम्ही मतदान केले आणि आमची जबाबादारी संपली. आता आमची प्रत्येक गोष्ट सरकारने बघायला हवी, तर त्या राष्ट्रात लोकशाही ही एक विदूषकी सर्कसच बनते. त्याचप्रमाणे माझ्या जीवनात ‘असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी’ ही भूमिका किंवा ‘नशीबापुढे माझे काय चालणार?’ ही भूमिका माझे संपूर्ण जीवन हास्यास्पद बनवते.
स्वत:च्या जीवनात बाकीच्या कुबड्या टाकून देऊन खरेखुरे स्वावलंबी बनायचे असेल तर सत्य व प्रेमाची कास धरून परमेश्वर हाच एकमेव खराखुरा माझा आधार आहे हा दृढविश्वास अंगी बाणवावा लागतो. परंतु समाजात दिसते काय? आम्ही परमेश्वरालाच आमची कुबडी बनवायला बघतो. परमेश्वर हा काही पांगुळगाडा नाही तर तो साक्षात अपंगत्वच नाहीसे करणारा आहे हे आम्हाला शिकायला हवे. सत्य व प्रेमाच्या शिवाय केलेली सर्व कर्मकांड, विधी व भक्तीची नाटके म्हणजे असेच तकलादू पांगुळगाडे आहेत. त्यांचा उपयोग आम्हाला अधिकाधिक अपंग बनविण्यासाठीच होतो, तर सत्य व प्रेमाच्या मार्गावरून केलेली भक्ती आम्हाला पूर्ण स्वावलंबी व म्हणूनच यशस्वी बनवते.
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् | यत्कृपा तं अहं वंदे परमानंदमाधवम् ॥