त्रिविक्रमाची १८ वचने
दत्तगुरुकृपे मी सर्वसमर्थ तत्पर ।
श्रद्धावानास देईन सदैव आधार ॥१॥
मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्चित ।
मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात ॥२॥
धरू नका जराही संशय याबाबत ।
न होऊ देईन तुमचा मी घात ॥३॥
प्रेमळ भक्ताचिया जीवनात ।
नाही मी पापे शोधीत बसत ॥४॥
माझिया एका दृष्टिपातात ।
भक्त होईल पापरहित ॥५॥
माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्वास ।
त्याच्या चुका दुरुस्त करीन खास ॥६॥
तैसेचि माझ्या भक्तां जो देई त्रास ।
सजा मी नक्कीच देईन त्यास ॥७॥
माझिया भक्तांचे कुठलेही प्रारब्ध ।
बदलीन, तोडीन वा घालीन बांध ॥८॥
न येऊ देता जगदंबेच्या नियमास बाध ।
दु:खातून काढूनी बाहेर, मार्ग दावीन अगाध ॥९॥
सदैव मी तुमचा उगवता देव ।
नाही मावळणार, सौम्य करीन दैव ॥ १०॥
पूर्ण श्रद्धेने करा नवस, करा भक्ती गाळा घाम ।
पावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम ॥११॥
सर्व मार्गांमध्ये, मज असे भक्ती प्रिय ।
जन्म-जीवन-मृत्यू तुमचे काहीही न व्यर्थ जाय ॥१२॥
शरणागत होऊनी करी जो गजर ।
त्याचिया जीवनी सुख अपरंपार ॥१३॥
माझिया भक्तीपासून, कोण तुम्हांस रोखेल?
कामक्रोध जरी असले भरून, माझे नाम माझिया भक्तास तारेल ॥१४॥
प्रेमे जो माझे घेई नाम, त्याचे काम सर्व पुरवीन ।
संपन्न करीन त्याचे धाम, भरीन शांती समाधान ॥१५॥
माझ्या चरणांचिया नि:शंक ध्याने ।
सहस्रकोटी संकटे पळती भयाने ॥१६॥
खरा भक्त राही, दोन चरणांत माझ्या ।
तिसरे पाऊल माझे तुडवील संकटास तुमच्या ॥१७॥
जेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम ।
तेथे तेथे कर्ता मी त्रिविक्रम ॥ १८ ॥
अभंगलेखक - डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी