अनिरुद्ध बापूंनी ‘रामरक्षा प्रवचन ५’ मध्ये सांगितला 'श्रीहनुमान कीलकम्' चा अर्थ - आपल्या जीवनाची गुरुकिल्ली (Master Key) कोणाकडे असते?

अनिरुद्ध बापूंनी ‘रामरक्षा प्रवचन ५’ मध्ये सांगितला 'श्रीहनुमान कीलकम्' चा अर्थ - आपल्या जीवनाची गुरुकिल्ली (Master Key) कोणाकडे असते?

 

सद्गुरु अनिरुद्ध बापू हे रामरक्षा स्तोत्रमंत्र मालिकेतील ५ व्या प्रवचनात ’श्रीमद्‌हनुमान कीलकम्’ या ओवीबद्दल सांगतात की, जसं आपण तिजोरी किंवा कपाटासाठी कुलूप आणि त्याची किल्ली (किलक) वापरतो, तसेच आपल्या जीवनाची गुरुकिल्ली (Master Key) ही सद्‌गुरुशिवाय कोणाकडेही नसते आणि हे आपल्याला माहित नसते. आपल्याला ‘कीलक’ म्हणजेच योग्य गुरुकिल्ली हवी असते.

बापू स्पष्ट करतात की, आपण प्रत्येक क्षणी जी कृती करतो ती एक ‘चावी’ आहे – ती आपल्याला आपल्या प्रारब्धाच्या भोगांकडे घेऊन जाते. चुकीच्या कर्मामुळे चुकीची कुलुपं उघडली जातात आणि दुर्दैवाने एखादे चूकीचे कुलुपं उघडले गेले तर माझ्याकडे असणार्‍या चांगल्या चावीने म्हणजेच मी केलेल्या चांगल्या कृतीमुळे चांगली कुलुपंही उघडता येतात. म्हणजेच मला जे कर्मस्वातंत्र्य मिळाले आहे त्या चाव्या आहेत ज्याच्या सहाय्याने मी माझ्या प्रारब्धाची द्वारे उघडू शकतो. मात्र कर्म करताना मला ‘फलाशेचा पूर्ण विराम’ ठेवावा लागतो, म्हणजेच मला पाहिजे त्या फळाची अपेक्षा न ठेवता परमेश्वर देईल ते फळ स्विकारायची तयारी ठेवूनच कृती करायची.

‘आनंद मिळवणं’ हेच माणसाचं स्वधर्म आहे. पण आनंदाच्या विशिष्ट स्वरूपाची अपेक्षा ठेवणे म्हणजेच फलाशा, जी आपल्याला दुःख देऊ शकते. म्हणून प्रयत्न करत राहायचे, पण फळं किती, कसे व केव्हा मिळेल हे सर्व नियोजन परमेश्वरावर सोपवायचे.

 

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यामधील फरक

सद्गुरु अनिरुद्ध सांगतात की आयुष्यात घडणाऱ्या घटनांना आपण ‘रिअ‍ॅक्ट’ न करता म्हणजे प्रतिक्रिया न देता ‘रिस्पॉन्स’ म्हणजेच प्रतिसाद द्यायला हवा. प्रतिक्रिया ही बेजबाबदार असते, तर प्रतिसाद ही जबाबदारीने दिलेली कृती असते. जीवनात आपण कसे वागायचे, हे आपल्या हातात आहे, आणि कुठल्याही प्रसंगाला आपण प्रतिसाद देतो की प्रतिक्रिया देतो यावर आपल्या आयुष्याची उचित-अनुचित दिशा ठरते.

बापू उदाहरण देतात की पालक मुलाचे परीक्षेतील अपयश पाहून लगेच रागावतात (Reaction), पण जबाबदार (Responsible) पालक प्रेमाने, सकारात्मकपणे प्रतिसाद देतात. आपण आपली जबाबदारी कशी पार पाडावी हे आपण हनुमानाच्या चरित्रातून शिकावे – कारण हनुमंताच्या चरित्रातून आपल्याला कळते की आचार, भक्ती आणि दास्यत्व कसे असावे.

 

महाभारतातील हनुमंताची आणि त्याची नामभक्ती

जेथे रामनाम घेतले जाते तेथे तो असतोच. युगानयुगे तो रामनाम घेतोच आहे. हनुमान हा आदर्श भक्त आणि दासोत्तम आहे. आपल्या सर्वांसाठी त्याची श्रवणभक्ती, नामसंकीर्तन आणि सेवा वृत्ती याचा आदर्श आहे. हा हनुमंत हा कुठल्याही देवळामध्ये आनंदाने रहातो, गावाच्या वेशीवर किंवा झाडाच्या पारावरही त्याचे मंदीर असते.

महाभारताच्या युद्धात कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाच्या ध्वजावर हनुमंत विराजमान होतो. तेव्हा हनुमंताला केवळ त्याचा राम पुन्हा युद्ध करताना पहायचा असतो, त्याची वाणी ऐकायची असते. हनुमंत कृष्णामध्येच रामाचं रूप पाहत असतो. कृष्णही हनुमंताला आपलं दर्शन सतत मिळावं म्हणून रथावरील स्वतःवर असणारे छत्रही काढतो. हनुमंत त्या वेळी ‘कृष्णनाम’ घेत असतो, पण अर्जुनाला ’रामनाम’ ऐकू येते, आणि जेव्हा हनुमंत रामनाम घेतो तेव्हा अर्जुनाला ’कृष्णनाम’ ऐकू येते. सद‌गुरु अनिरुद्ब या कथेद्वारे सांगतात की आपल्याला या नामांच्या संभ्रमामध्येही अडकायचे नाही, कारण खरे नाम घेण्याची जबाबदारी (Responsibilty) ह्या हनुमंताची आहे आणि तो ते करतो आहे. म्हणून आपल्याला मात्र हनुमंत जे नाम उच्चारतो आहे तेच नाम उच्चारायचे आहे. तो जे नाम युगानंयुगे घेतोय त्यात आपल्याला आपला खारीचा वाटा टाकायचा आहे. कारण ह्याच्याएवढी नामसंकिर्तनाची भक्ती कोणाचीही नाही.

 

दासोत्तम हनुमंताच्या नवविधा भक्तीचा आदर्श

सद्‌गुरु अनिरुद्ध सांगतात की नवविधा भक्तीमधील प्रत्येक प्रकारात हनुमंत सर्वोत्तम आहेत. रामासमोर नेहमी त्याचे हात जोडलेले असतात (वंदन भक्ती), हनुमंत सतत रामनाम घेत असतो (नामस्मरण), हनुमंत रामाच्या चरणांजवळ बसलेला असतो (अर्चन भक्ती), रामासाठी सर्वस्व अर्पण करणारा तो सेवक आहे (दास्य भक्ती). राम, लक्ष्मण नागपाशात अडकले असताना किंवा लक्ष्मण मूर्च्छित झाल्यावर, धावत संजीवनी आणायला जाणारा हनुमंतच आहे. आपण श्रीहनुमान चालिसेतही ऐकतो की राम हनुमंताला म्हणतो - "तुम मम प्रिय भरतही सम भाई." हे सखत्वही (सख्य भक्ती) हनुमंताकडे आहे. रामाचा शब्द व रामाचे कार्य हेच हनुमंताचे जीवन आहे (आत्मसमर्पण). हनुमंताचे प्रेम, समर्पण हे सर्वोच्च आहे, म्हणूनच नवविधा भक्तीतील प्रत्येक प्रकारात तो सर्वोत्तम आहे.

हनुमंत आपल्याला “प्रतिसाद म्हणजेच रिस्पॉन्स देण्याची कला” आणि “नवविधा भक्तीच्या नऊ पायर्‍या’ शिकवतो. कोणत्याही गोष्टीमध्ये (उदा. गायन, शिक्षण, साधना)

यशस्वी होण्यासाठी नवविधा भक्तीच्या नऊ पायर्‍या महत्त्वाच्या आहेत आणि त्या म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण वंदन, अर्चन, पादसंवाहन, दास्य, सख्य, आत्मसमर्पण.

पादसंवाहनानंतर येते - ‘दास्यभक्ति’, दास्यानंतर येते ‘सख्य’, सख्यानंतर ‘आत्मनिवेदन’. कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद, यश प्राप्त करण्याच्या ह्या अंतिम चार पायर्‍या आहेत. त्यामधलं ‘पादसंवाहन’ आम्हाला नीट शिकावं लागते. कोणतीही गोष्ट उदा. गाणं शिकणं, देवभक्ती, शिक्षण हे योग्य क्रमानेच शिकावे लागते. देवाने आधी कृपा करावी आणि मगच मी भक्ती करेन हे आचरटपणाचे लक्षण आहे. इमारत बांधणीची सुरुवात पायापासून होते, नवव्या मजल्यावरून नव्हे. पायाशिवाय इमारत उभी राहू शकत नाही आणि हेच तत्व भक्तीमध्येही लागू होते.

 

हनुमंत – रामरक्षेचा ‘कीलक’

बापू पुढे सांगतात की हनुमंत हाच रामरक्षेचा ‘कीलक’ आहे. तर हनुमंताच्याकडून होणारं पादसंवाहन, हनुमंताने आम्हाला शिकवलेलं पादसंवाहन ही जीवनाची ‘गुरुकिल्ली’ आहे.

राम म्हणजे पुरुषार्थ आणि सीता म्हणजे या पुरुषार्थाने प्राप्त होणारी तृप्ती. पुरुषार्थाने तृप्ती कशी वाढवायची आणि तृप्तीने पुरुषार्थ कसा वाढवायचा याचे रहस्य म्हणजे रामरक्षा. हा हनुमंत या रामरक्षेचा किलक का आहे, तो या रामरक्षेची किल्ली कसा हे सद्‌गुरु बापू मग हनुमंताच्या कथेवरून स्पष्ट करतात.

 

रामरक्षा - जबाबदारी सांभाळण्याची क्षमता पुरविणारी गुरुकिल्ली

हनुमंतच आम्हाला जन्मापासून त्याच्या प्रत्येक कथेमध्ये चावी देत राहतो की पुरुषार्थ आणि तृप्ती म्हणजेच राम आणि सीता ह्यांच नातं मी माझ्या आयुष्यामध्ये आणायचं कसं? ’श्रीमद्हनुमान कीलकम्’ हे जेव्हा मी भक्तिभावाने म्हणतो तेव्हा हनुमंत स्वतः कामाला लागतो. तो माझ्या मनामध्ये ही वृत्ती उत्पन्न करतो की राम हेच सर्वात सुंदर फळ आहे. या भावना आपोआप उत्पन्न करण्याचं काम हा हनुमंत करतो. मला रामनामाची, कृष्णनामाची, गुरुनामाची ओढ लावण्याची सगळी तयारी हा हनुमंत करतो म्हणून त्याला कीलक म्हटलेलं आहे. आमच्या मनात जी अनेक बंद कपाटं आहेत ती उघडण्यासाठी स्वतः हनुमंतच चाव्या घेऊन बसलेला असतो.

लंकादहनाच्या कथेतून हनुमंत आम्हाला शिकवतो की रिअ‍ॅक्ट न करता रिस्पॉन्स कसा द्यायचा? जबाबदारीने कसं वागायचं? सीतामाईने हनुमंताला दिलेल्या माळेच्या कथेतूनही बापू आम्हाला सांगतात की आम्ही काय मागायला शिकलं पाहिजे.

सद्‌गुरु अनिरुद्ध सांगतात की हनुमंत व श्रीरामांच्या पहिल्या भेटीच्या कथेतूनही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी, उत्तरदायित्व, जबाबदारी कशी सांभाळायची हे आम्हाला हनुमंतच वारंवार शिकवत राहतो. या प्रवचनाच्या शेवटी बापू म्हणतात की, "रामरक्षा आम्हाला पुरुषार्थ ही देते आणि तृप्ती देते म्हणजे काय देते? आमची जी खरीखुरी जबाबदारी आहे, ती पूर्ण करण्याची क्षमता आम्हाला रामरक्षेतून प्राप्त होते आणि त्याचा कीलक कोण आहे? तर हनुमंत आहे. कारण तो एकमेव असा आहे की जो त्याची जबाबदारी नीट जाणतो."