अनिरुद्ध बापूंच्या ‘रामरक्षा प्रवचन ३’मध्ये ‘अनुष्टुप छंद’चे कथेद्वारे उलगडलेले रहस्य आणि ‘सुन्दरकाण्डचे खरे सौदर्य कोणते?’ हे सोप्या शब्दांत सांगितले आहे.

छंद’ म्हणजे काय – अनुष्टुप छंदाचे स्वरूप व उत्पत्ती
रामरक्षा या स्तोत्रमंत्रावरील प्रवचनात सद्गुरु अनिरुद्धांनी ‘अनुष्टुप छंदः’ या ओळीवरून ‘छंद’ म्हणजे काय हे प्रथम सांगितले आहे. बापू म्हणतात. "छंद" म्हणजे कविता किंवा स्तोत्र तयार करताना वापरली जाणारी विशिष्ट रचनापद्धती. रामरक्षा "अनुष्टुप" छंदात रचलेली आहे. हा छंद प्रत्येक चरणात ८ अक्षरे असलेल्या ४ चरणांनी बनतो — म्हणजे एकूण ३२ अक्षरांचा.
या छंदाचा उगम वाल्मिकी ऋषींच्या संबंधीत क्रौंच पक्षाच्या जोडीच्या कथेतून झाला. एका क्रौंच पक्षी आणि त्याची पत्नी यांचा विरह पाहून त्यांच्या हृदयातून आपसूक जे शब्द निघाले, तेच अनुष्टुप छंदात होते आणि पुढे त्यांनी रामायण याच छंदात लिहिले. त्यामुळे हा छंद श्रेष्ठ मानला जातो.
हा छंद ‘गायत्रीपुत्र’ व ‘छंदयोनी’ म्हणूनही ओळखला जातो. सद्गुरु अनिरुद्ध पुढे सांगतात की रामरक्षेचे हे छंदरूप व रचनाकथा समजून घेतली तर आपण जे म्हणतो त्या शब्दांमागचे खरे सौंदर्य, अर्थ आणि शक्ती अधिक चांगल्या प्रकारे अनुभवू शकतो.
उपदेश किंवा ग्रंथातील कुठलेही मार्गदर्शन स्वीकारताना महत्वाच्या असणार्या गोष्टी
बापू पुढे सांगतात, की कोणताही उपदेश किंवा ग्रंथातील कुठलेही मार्गदर्शन स्वीकारताना आपल्याला पुढील गोष्टी पाहाव्या लागतात –
- हा उपदेश देणार्या व्यक्तीवर किंवा ग्रंथावर आपला विश्वास आहे का?
- या उपदेशाचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम.
वरील गोष्टी एका मूलभूत बाबीवर अवलंबून असतात आणि ते म्हणजे त्या व्यक्तीचं किंवा ग्रंथकर्त्याचं आपल्यावर असलेलं प्रेम.
प्रेमाशिवाय दिलेला सल्ला प्रभावी होत नाही. जेव्हा उपदेश प्रेमातून येतो, तेव्हा तो हृदयाला भिडतो आणि आयुष्य बदलतो.
अनुष्टुप छंद – प्रेमातून निर्माण झालेला छंद
रामरक्षा स्तोत्रातला "अनुष्टुप छंद" हे याच प्रेमाचं प्रतीक आहे. वाल्मिकी ऋषींनी त्यांचे क्रौंच पक्षाशी काहीही नाते नसताना क्रौंच पती-पत्नीच्या विरहाने व्यथित होऊन ज्या शब्दांत अभिव्यक्ती केली, त्यातूनच हा छंद जन्माला आला. आणि या छंदामुळे त्या मृत क्रौंचालाही परत जीवन मिळालं. मग अनुष्टुप छंदातील रामरक्षा पठणाने आपले दुष्प्रारब्धमय आयुष्य आपण बदलू शकत नाही का?
हा अनुष्टुप छंद रामरक्षेच्या प्रत्येक ओळीत आहे; आणि म्हणूनच हा छंद आपल्या मृत झालेल्या भावना, प्रेम व श्रद्धा पुन्हा सजीव करण्याची ताकद देतो. परंतू त्यासाठी आपल्या मनात रामावर प्रेम असणे आवश्यक आहे.
भक्त व भगवंत याच्यातील द्वैत दूर करणारी संत चोखामेळा व संत बंका महार यांची कथा
यानंतर सद्गुरु अनिरुद्धांनी वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत चोखामेळा आणि संत बंका महार यांची कथा सांगितली. संत चोखामेळा आणि संत बंका महार हे एकमेकांनाच स्वतःचा गुरु मानतात आणि या प्रेमात, अहंकारविरहीत अवस्थेत ते हरवून जातात. मुक्ताबाई त्यांना सांगते की “गुरु होण्यापेक्षा शिष्य राहण्यात अधिक आनंद आहे”. अखेरीस रखुमाई हस्तक्षेप करते आणि दोघांनाही अद्वैताच्या स्थितीत नेते – दोघं एकमेकांशी पूर्णतः एकरूप होतात. हे अद्वैत पांडुरंगाच्या कृपेने आणि अनुष्टुप छंदाच्या माध्यमातून घडतं. या कथेतून सद्गुरु अनिरुद्ध पटवून देतात की हा छंद केवळ रचना नाही, तर भक्ती दृढ करून भक्त आणि भगवंत यांच्यातील द्वैत दूर करणारा प्रेमाचा सेतू आहे.
अनुष्टुप छंद आणि भगवंताची जबाबदारी
अनुष्टुप छंदाचे महत्त्व सांगताना सद्गुरु अनिरुद्धांनी स्पष्ट केले की, जो कोणी भक्त हा छंद मनापासून म्हणतो, तेव्हा त्या भगवंताशी एकरूप होण्याची जबाबदारी त्या भक्तावर राहत नाही, तर भक्ताला स्वतःशी एकरुप करुन घेण्याची ती जबाबदारी स्वतः परमेश्वर घेतो. त्यामुळेच अनुष्टुप छंदातील हे रामरक्षा स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे.
सुन्दरकाण्ड – हनुमंताच्या भक्तीचे शिखर
रामायणातील ‘सुन्दरकाण्ड’ हे रामायणातील सर्वात सुंदर काण्ड मानलं जातं. या भागात हनुमंताच्या अद्वितीय भक्तीचं आणि सेवाभावाचं वर्णन आहे. सीतेच्या शोकाला दूर करणारा तो “सीताशोकविनाशक” ठरतो. सीतेने रामाला केलेली प्रार्थना म्हणजेच, "दीनदयाल बिरुदु संभारी, हरहु नाथ मम संकटभारी" ही एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे कारण ही भक्तीरूपीणी सीतेने रामाची नाथ म्हणून देव म्हणून केलेली प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना रामापर्यंत पोहोचवणारा साक्षात रामदूत हनुमंत आहे.
हनुमंताचा त्याग, शुद्ध भक्ती, नम्रता आणि त्याचे राम व सीतामाईवरील प्रेम यामुळे तो सर्वश्रेष्ठ भक्त ठरतो. तो फक्त मुखाने रामनाम घेतं नाही, तर त्याच्या प्रत्येक पेशीमध्ये राम ठासून भरलेला आहे. म्हणूनच त्याला 'सीताशोकविनाशक' आणि आदर्श भक्त मानलं जातं.
ययाती व रामाची विलक्षण कथा
प्रवचनाच्या शेवटी बापूंनी सांगितलेली रामभक्त ययातीची कथा ही त्याच्या रामावरील भक्तीच्या सौंदर्याचे दर्शन घडवते. ययाती नावाचा एक राजा, जो रामाचा घनिष्ठ मित्र व भक्त असतो, दुर्वास ऋषी संतापून रामाकडून ययातीच्या वधाचं वचन घेतात. सीता, ययातीच्या पत्नीस निरोप पाठवून सावध करते, पण स्वतःच्या अवतारधर्माच्या मर्यादा ती ओलांडत नाही. त्याच वेळेस अंजनीमातेकडून तिच्या पुत्राला – म्हणजे हनुमंताला ययातीचे रक्षण करण्यासाठी वचन घेतलं जातं. त्यामुळे राम आणि हनुमान यांच्यात युद्ध होण्याची वेळ येते. रामाचा बाण हनुमानाच्या छातीतून आरपार निघून जातो आणि त्याच क्षणाला राम मृत्युमुखी पडतो. कारण हनुमंताच्या हृदयात रामच आहे. अखेरीस सीतेच्या सांगण्यावरून राम पुन्हा सजीव होतो. ही कथा दाखवते की ज्याप्रमाणे हनुमंताच्या हृदयात राम, लक्ष्मण, सीता आहे त्याचप्रमाणे त्या रामाच्या हृदयात पण हा हनुमंत आहे. हे हनुमंताच्या भक्तीचं सौंदर्य आहे, म्हणून हे सुन्दरकाण्ड खूप सुंदर आहे.
सुन्दरकाण्ड – स्वयंभू अनुष्टुप छंद आणि परावाणीचा ध्वनी
सुन्दरकाण्ड हे स्वयंभू अनुष्टुप छंदात रचलेलं आहे. सद्गुरु अनिरुद्धांनी ‘अनुष्टुप’ शब्दाचा एक महत्त्वाचा अर्थ सांगितला आहे की, अनुष्टुप म्हणजे असा ध्वनी की जो कशाचाही स्फोट करत नाही, जो काहीही फोडत नाही, जो फोडून बाहेर येत नाही असा. आवाज उत्पन्न करायला आम्हाला स्फोट करावा लागतो किंवा आम्हाला एका धातुवर दुसरा धातू अथवा धातूवर लाकडाची पट्टी मारावीच लागते. अनुष्टुप असा ध्वनी आहे जो कोणत्याही आघाताशिवाय उत्पन्न होतो म्हणजेच परावाणीचा शब्द. तुलसीदासांनी सुन्दरकाण्ड उच्चारलेलं नाही तर त्यांना ते हनुमंताने प्रत्यक्ष घडताना दाखवलं व ते स्वतः हनुमंतांनी लिहिलं. तुलसीदासच्या हनुमंतावरील प्रेमामुळे आणि त्याच्या मनीच्या भाव जाणून हनुमंताने केलेली रचना म्हणजे सुन्दरकाण्ड, म्हणून हे सुन्दरकाण्डच पूर्णपणे अनुष्टुप आहे. ही रामरक्षा अनुष्टुप आहे, हे संपूर्ण रामायण अनुष्टुप आहे. कारण रामच अनुष्टुप आहे. गायत्रीचा पुत्र तोच अनुष्टुप, तोच श्रीराम.