सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ९

संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १३९६ व १३९७.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू तुलसीपत्र - १३९६ या अग्रलेखामध्ये लिहितात,
सर्व उपस्थितांच्या समोरच सातवी नवदुर्गा कालरात्रिचे रूपांतर आठवी नवदुर्गा महागौरीमध्ये होत होते.
अगदी हळूहळू, अत्यंत हळू.
आतापर्यंत कुठल्याही रूपांतरणाला (Transformation) अगदी क्षणही लागला नव्हता.
कैलाशावर काळच अस्तित्वात नसल्यामुळे, ‘किती हळू' हे कुणालाच कळत नव्हते. परंतु तेथील प्रत्येकजण सतत कुठला ना कुठला नित्यजप करीत असल्यामुळे, प्रत्येकाला पूर्ण जाणीव होत होती की त्यांच्या जपाची कित्येक आवर्तनेच्या आवर्तने होत आहेत आणि तरीदेखील हे रूपांतरण चालूच आहे.
सर्व उपस्थितांमधील ह्याविषयीची उत्सुकता आता बेचैनीत बदलू लागली
व हळूहळू ती बेचैनी मनाला अस्थिर करू लागली. - महर्षिंपासून शिवगणांपर्यंत प्रत्येकाचे मन उत्कंठेच्या सर्वोच्च कड्यावर पोहोचून, मग तेथून कडेलोट झाल्यामुळे पूर्णपणे अशांत व अस्थिर झाले होते.
सर्व ब्रह्मर्षिगण मात्र ह्याच हळूहळू चाललेल्या प्रक्रियेमुळे अधिकाधिक शांत, तन्मय, तल्लीन व आनंदित होत होता
व हे लक्षात येताच तर इतर सर्वांच्या मनातील अशांतता व अस्थिरता अधिक वेगाने वाढू लागल्या
व ही आपल्या बालकांची अवस्था आदिमाता पाहू शकेल काय?
नक्कीच नाही.
आदिमाता श्रीविद्येने त्या सर्वांकडे कृपादृष्टीने पाहून बोलण्यास सुरुवात केली, “हे वत्सहो! तुम्हां सर्वांचे मन आता पूर्णपणे ‘थर्व' अवस्थेत जाऊन पोहोचले आहे.

सामान्यतः मानव ‘थर्व' अवस्थेत जातो, तो त्याच्या षड्-रिपुंच्या टोकाला जाण्यामुळे.
परंतु तुम्ही सर्वजण ‘थर्व' अवस्थेत गेला आहात, ते केवळ आणि केवळ ‘असतो मा सद्गमय' ह्या एकाच कारणासाठी अर्थात पवित्र अस्तित्वाचे आणि पवित्र कृतीचे रहस्य व कारण जाणण्यासाठी
आणि तेदेखील कुठल्याही प्रकारच्या स्वार्थासाठी नाही, तर केवळ आणि केवळ आठवी नवदुर्गा महागौरीला पूर्णपणे जाणण्यासाठी - पूर्णपणे सात्त्विक उत्कंठेमुळे.
हे शिव-ऋषि तुंबरु! हे रूपांतरण पूर्ण होईपर्यंत तू ह्या सर्वांना ह्या रूपांतरणाची कथा सविस्तर सांग.”
आदिमाता श्रीविद्येस साष्टांग प्रणिपात करून शिव-ऋषि तुंबरु कथा सांगू लागला, “हे आप्तजनहो! ह्या पार्वतीने एकदा जेव्हा वसुंधरेवरील व वसुंधरेच्या अवकाशातून त्या काळात असणाऱ्या सर्वच्या सर्व आसुरी शक्तींचा, आसुरी रूपांचा व आसुरी गुणांचा पूर्णपणे विध्वंस घडवून आणण्याचे ठरविले, तेव्हाच पहिल्यांदा तिचे हे ‘कालरात्रि'स्वरूप प्रकट झाले होते.
पार्वतीने हा निर्धार केवळ एकाच कारणासाठी केला होता - त्यावेळेस भगवान परमशिव घनप्राण गणपतीचा जन्म होण्यासाठी घोर तपश्चर्येस बसला होता.
परमशिवाची ही तपश्चर्या लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक होते व आसुरी वृत्ती ह्यालाच विरोध करत होत्या.
त्यामुळे ह्या विश्वाच्या घनप्राणास जन्मास घालण्याच्या प्रक्रियेस फक्त दहा हजार वर्षांचा काळ उरलेला असल्यामुळे ह्या भक्तमातेने असा कठोर निर्धार करून युद्धास आरंभ केला व तिने तिचा निर्धार मानवी शंभर वर्षांतच तडीस नेला
व त्याबरोबर परमशिवाची तपश्चर्या अवघ्या मानवी आठ वर्षांत सफळ व संपूर्ण झाली आणि त्यामुळे आदिमातेस पाहिजे त्या क्षणाला शिवगंगागौरीपुत्र विनायक ब्रह्मणस्पति हा ‘गणपती' म्हणून जन्मास येण्यासाठीची संपूर्ण तयारी झाली.

परमशिवाने तपश्चर्या संपवून डोळे उघडताच त्याला पार्वतीचे हे भीषण रूप दिसले व ‘केवळ आपल्याचसाठी आपल्या प्रिय सहधर्मचारिणीने स्वतःचे सौंदर्य दूर फेकून हे भयकारी स्वरूप धारण केले आहे' हे जाणून परमशिवाने तिच्याकडे अत्यंत प्रेमाने स्नेहार्द्र नजरेने पाहिले
व त्याबरोबर भर्गलोकात वाहणारी गंगा (सातवी गंगा) भगवान परमशिवाच्या दोन्ही डोळ्यांतून प्रवाहित झाली व परमशिवाने आपल्या प्रिय पत्नीस त्या सातव्या गंगेच्या जलाने अभिषेक करण्यास सुरुवात केली.
स्वतः परमशिव त्या सातव्या गंगेच्या जलातून थेंब थेंब जल घेऊन पार्वतीच्या शरीरास लेपन करीत होता
व असे विलक्षण अभिषेकस्नान व लेपन मानवी १०८ वर्षे चालले
आणि त्या क्षणाला पार्वतीचे हे आठवे नवदुर्गा स्वरूप ‘महागौरी' विलसू लागले.”
शिव-ऋषि तुंबरुंची कथा संपली व त्याच क्षणाला आठवी नवदुर्गा ‘महागौरी' तिच्या संपूर्ण वैभवासह दृश्यमान झाली.
ही चतुर्हस्ता होती. हिचा उजवा वरचा हात अभयमुद्रेत होता, उजवा खालचा हात त्रिशूळ धारण करून होता, तिच्या डाव्या वरच्या हातात सौम्य व प्रशांत ध्वनी उत्पन्न करणारा डमरू होता व हिचा डावा खालचा हात वरदमुद्रेत होता.

ही महागौरी विलक्षण गौरवर्णाची होती.
हिची सर्व वस्त्रेही चांद्रवर्णाची होती.
हिच्या सर्वांगावर मोत्याचे अलंकार होते व गळ्यात श्वेत सुगंधित पुष्पांच्या माळा होत्या.
हिची नजर पूर्ण वात्सल्याने भरलेली, सौम्य, प्रशांत व तृप्तिदायक होती.
ही वृषभारूढा होती.
हा वृषभही पूर्ण गौरवर्णाचा व अत्यंत शांत स्वभावाचा होता.
हिच्या कपाळावर तृतीय नेत्र नव्हता.
महागौरीच्या पापण्यांच्या केसांच्या हालचालींमधून अत्यंत सुगंधित व शांतिदायक ऊर्जाप्रवाह सर्वत्र पसरत होते
व त्यांचा स्पर्श होताच तेथील प्रत्येक उपस्थिताचे ‘थर्व' झालेले मन पूर्णपणे ‘अथर्व' बनत होते.
बापू पुढे तुलसीपत्र - १३९७ या अग्रलेखामध्ये लिहितात,
आदिमाता श्रीविद्येने ब्रह्मवादिनी लोपामुद्रेस महागौरीचे पूजन करण्याची आज्ञा केली व त्यानुसार लोपामुद्रेने इतर सर्व ब्रह्मवादिनींसह सुगंधित श्वेतपुष्पांनी महागौरीचे पूजन केले.
महागौरीने, तिला अर्पण केली गेलेली सर्व सुगंधित श्वेतपुष्पे आपल्या स्वतःच्या ओंजळीत घेऊन सर्व उपस्थितांवर वर्षाव केला.
आश्चर्य म्हणजे प्रत्येकाला फक्त एकच श्वेतपुष्प मिळाले आणि प्रत्येकाच्या हातातील ते श्वेतपुष्प आठ दलांचे (पाकळ्यांचे) होते.
तद्नंतर आठवी नवदुर्गा महागौरीने विविध रंगांच्या सुगंधित पुष्पांनी आदिमाता श्रीविद्येचे व अनसूयेचे पूजन केले
व महागौरीने तिच्या हातातील पुष्पे आदिमातेच्या चरणी वाहताच, प्रत्येक उपस्थिताच्या हातातील ‘ते' श्वेतपुष्प आता अधिक तेजःपुंज व आह्लाददायक दिसू लागले
आणि ते अष्टदलपुष्प प्रत्येकाच्या त्रिविध देहांमध्ये शांती, प्रसन्नता, स्थैर्य, धैर्य व आह्लाद हे गुण पसरवीत होते.
प्रत्येक उपस्थिताला जाणीव होत होती की ‘ते' अष्टदलपुष्प त्यांच्या हाताला कायमचे चिकटलेले आहे आणि ‘ते' पुष्प त्यांचे संपूर्ण मनच अधिकाधिक सुंदर आणि सबल करीत आहे.
ब्रह्मवादिनी लोपामुद्रा महागौरीच्या आज्ञेनुसार उपस्थितांकडे वळून बोलू लागली, “हे उपस्थित आप्तगणहो! ही आठवी नवदुर्गा महागौरी शांभवीविद्येच्या पंधराव्या व सोळाव्या पायरीची (कक्षेची) अधिष्ठात्री आहे
आणि नवरात्रीच्या अष्टमी तिथीच्या दिवस व रात्रीची नायिका आहे.
परमशिवाने भर्गलोकातील सातव्या गंगेच्या जलाचा लेप व अभिषेक करून हे ‘महागौर' स्वरूप निर्माण केले, ही गोष्ट आपण ऐकलीच.
परंतु जर सातवी गंगा आहे, तर बाकीच्या सहा गंगांचे काय? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
परंतु सध्या फक्त एवढेच लक्षात ठेवायचे की भूलोकावर अवतरलेली ती प्रथम गंगा व मग प्रत्येक लोकातील एक एक गंगा.
बाकीचे हे गंगाज्ञान शांभवी विद्येच्या पंधराव्या व सोळाव्या कक्षा पार केल्यावरच होत असते.
ही सातवी अर्थात भर्गलोकीय गंगा क्षीरसागरातील जलाचीच बनलेली आहे व हीच ‘अमृतवाहिनी', ‘अमृतवर्षिणी' व ‘चंद्रमधुप्रसविणी' ह्या नावांनी ज्ञात आहे.
महागौरी व भर्गलोकीय सातवी गंगा ह्या दोघी एकमेकींच्या जुळ्या भगिनी मानल्या जातात - कारण त्या दोघींचे कार्यच मुळी जुळे आहे.
शांभवी विद्येच्या पंधराव्या व सोळाव्या पायऱ्यांवरती उपासकांना, आपल्या गुरुसमक्ष बसून, गुरुच्या मार्गदर्शनाखाली ‘श्रीशांभवीमुद्रा' शिकायची असते, तिचा दररोज त्रिकाल सराव करायचा असतो, तिचा अभ्यास करायचा असतो व तिजविषयीचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असते
व हे सर्व घडवून आणते, ती आठवी नवदुर्गा महागौरी.
बघा! आपण प्रथमपासून पाहत आहोत की महागौरीला भालप्रदेशावर तृतीय नेत्र नाही. तेथे कुंकुमतिलक आहे.
परंतु हे सत्य नव्हे.
महागौरीलाही तृतीय नेत्र आहेच.
परंतु आपण कुणीही तो पाहू शकत नाही.
अगदी ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनीही नाही.
ह्याचे कारण काय?
हेच तर श्रीशांभवीमुद्रेचे रहस्य आहे. ही मुद्रा करताना उपासकाने आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार सुखासनात बसायचे असते. दोन्ही डोळे पूर्णपणे बंद करून, मग त्या बंद पापण्यांमागील डोळे आपल्या स्वतःच्या आज्ञाचक्राच्या स्थानावर अर्थात तृतीय नेत्र स्थानावर सावकाश केंद्रित करायचे असतात.

ही क्रिया किती वेळ करायची, कशी करायची, त्यावेळेस मंत्र म्हणायचे, कुठले मंत्र म्हणायचे, कधी मन शांत ठेवायचे व कधी मन त्या आज्ञाचक्राशी बांधून ठेवायचे व कसे, हे सर्व सद्गुरु प्रत्येक उपासकाला ब्राह्ममुहुर्ताच्या वेळेस पवित्र नदीच्या तीरावर शिकवितात.”
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने केलेले हे श्रीशांभवी मुद्रेचे वर्णन ऐकून महर्षिंपासून शिवगणांपर्यंत सर्वजण अत्यंत आनंदित झाले व प्रत्येकाच्या मनात ‘आपल्यालाही हे मिळावे' अशी इच्छा उत्पन्न झाली
आणि अशी इच्छा त्यांच्या मनात उद्भवताच ब्रह्मवादिनी लोपामुद्रा म्हणाली, “उगीच भलती साहसे करू नका. माझे किंवा कुणाचेही वर्णन ऐकून एकदम प्रयास करू नका.
कारण ही श्रीशांभवीमुद्रा श्रीशांभवीविद्येच्या पंधराव्या व सोळाव्या पायरीवरच प्राप्त होते व करताही येते.
ही श्रीशांभवीमुद्रा शिव-शक्तीचे एकत्व, एकरूपत्व व निरंतर साहचर्य व ‘भेद असूनही अभेद' असे विलक्षण स्वरूप व त्यामागील रहस्य प्रकट करणारी आहे.
‘आदिमातेला व तिच्याच ‘आदिपिता' रूपाला जाणणे व त्यांचे होऊन राहणे' हेच एकमेव उद्दिष्ट व हेच एकमेव ध्येय ह्या कक्षांवर असावे लागते
आणि उपस्थित आप्तगणहो! एवढे मोठे ज्ञान प्रदान करणारी ही महागौरी साध्यासुध्या श्रद्धावानांना, त्यांच्या त्यांच्या पातळीवर अधिक मनःशांती, सबलता, चित्तस्थैर्यता व आध्यात्मिक प्रगती देत राहते.”