'करुणात्रिपदी'च्या पहिल्या पदाचा अर्थ

'करुणात्रिपदी'च्या पहिल्या पदाचा अर्थ

हिंदी

शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता ॥धृ.

हे श्रीगुरुदत्ता, तू सदैव शांतच असतोस. तुला क्रोध येणे संभवतच नाही. पण भक्तांच्या हितासाठी तू जो क्रोध धारण केला आहेस, त्यामुळे मला भीती वाटते आहे रे. हे श्रीगुरुराया, माझ्या मनातील भीती शांत कर. माझे चित्त जे भयाने, भीतीने, अस्थैर्याने असुरक्षिततेने ग्रासले गेले आहे, ते शांत कर, या सर्वांचे शमन कर. 

तू केवळ माताजनिता सर्वथा तू हितकर्ता

तू आप्तस्वजन भ्राता सर्वथा तूचि त्राता

भयकर्ता तू भयहर्ता दंडधर्ता तू परिपाता

तुजवाचुनि दुजी वार्ता तू आर्ता आश्रय दाता ॥१॥

हे श्रीगुरुराया, केवळ तूच माझा मायबाप आहेस, म्हणजेच मला जन्माला घालणारा माझे पालनपोषण करणाराही तूच आहेत. तूच माझे सर्वार्थाने हित करणारा आहेस. तूच माझा खरा आप्त आहेस, तूच माझा सगासोयरा, माझा भाऊही आहेस. तूच माझे सर्वस्वी रक्षण करणारा आहेस.

आमच्या कल्याणासाठी प्रसंगी भय निर्माण करणारा, आम्हाला भय दाखविणारा तूच आहेस आणि भय हरणाराही तूच आहेस त्यासाठीच तू हाती दंड धारण केला आहेस आणि शिक्षेतून वाचविणारा, क्षमा करणाराही तूच आहेस. तुझ्याशिवाय इतर कुणीही माझा नाही आणि तुझ्याशिवाय दुसरे काही मला ठाऊक नाही. माझ्यासारख्या दु:खी-कष्टी पीडितांचा, संकटग्रस्तांचा आश्रयदाता तूच आहेस. हे श्रीगुरुदत्ता, तूच आम्हा आर्तांचा एकमेव आश्रयकर्ता आहेस 

अपराधास्तव गुरुनाथा जरि दंडा धरिसी यथार्था

तरी आम्ही गाउनि गाथा तव चरणीं नमवू माथा

तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा?

सोडविता दुसरा तेंव्हा कोण दत्ता आम्हा त्राता? ॥२॥

हे श्रीगुरुनाथा! आमच्या अपराधांना, दुर्वर्तनांना, पापांना शिक्षा करण्यासाठी म्हणजेच आमचे कल्याण करण्याच्या हेतूने तू हातात दंड धारण केला आहेस. हे जरी योग्य असले, तरी अपराधी आम्ही तुझे नामसंकीर्तन करून, तुझ्या चरित्राचे, लीलांचे गुणगान करून तुझ्या चरणी नतमस्तक होऊन तुला शरण आलो आहोत.

तरीही जर का देवा तू आम्हाला दंडित केलेस, तर मग आम्ही, तुझ्या लेकरांनी कुणाचा बरे धावा करावा? हे श्रीगुरुदत्ता! तुझ्याशिवाय आम्हाला अपराधांतून, दु:खकष्टातून, यातनांतून सोडवणारा आमचा रक्षणकर्ता दुसरा कोण बरं आहे? कुणीही नाही. 

तू नटसा होउनि कोपी दंडितांहि आम्ही पापी

पुनरपिही चुकत तथापि आम्हांवरि नच संतापी

गच्छतः स्खलनं क्वापि असे मानुनि नच हो कोपी

निज कृपालेशा ओपी आम्हांवरि तू भगवंता ॥३॥

खरं तर तू कधीच तुझ्या लेकरांवर कोपत नाहीस. एखाद्या नटाप्रमाणे आमच्या कल्याणासाठी तू रागावल्याचा अभिनय करत आहेस. त्या नटासारखाच क्रोध धारण करून तू आम्हां पापी जिवांना शिक्षा करतोस. तरीही सुधारलेले आम्ही अज्ञानी पुन्हा पुन्हा त्याच चुका करीत राहतो. म्हणूनच हे श्रीगुरुदत्ता, आम्ही तुझी प्रार्थना करतो की तू आमच्यावर संतापू नकोस.

गच्छतः स्खलनं क्वापिम्हणजे वाटेवरून चालणारा माणूसच ज्याप्रमाणे चालताना कधी कधी घसरून पडू शकतो, त्याप्रमाणे आमच्याकडून कर्मे करताना चुका होऊ शकतात आणि होतातही, हे जाणून तू आमच्यावर कोपित होऊ नकोस. हे भगवन्! तुझ्या कृपेचा आम्हांवर वर्षाव कर, कारण तुझ्या कृपेचा लवलेशही आमचा उद्धार करण्यास समर्थ आहे.

तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडतां

सांभाळुनि मार्गावरता आणिता दुजा त्राता ।।

निज बिरुदा आणुनि चित्ता तू पतीतपावन दत्ता

वळे आता आम्हांवरता करुणाघन तू गुरुदत्ता ॥४॥

हे भक्तपित्या श्रीगुरु दत्तात्रेया! तुझ्या चरणकमलांचा आश्रय घेतल्यावर जर आमचं पाऊल आडमार्गावर पडलं म्हणजेच आम्ही चुकीचे वागलो, तरीही तुम्ही आम्हाला सांभाळून सुखरूप पुन्हा योग्य मार्गावर आणता. असा आमचा दुसरा कोणीही तारणहार नाही.

हे पतितपावना श्रीगुरुदत्ता, करुणाघना, तुझ्या या ब्रीदाला चित्तात धारण करून आमच्यावर तुझी कृपा अखंड बरसत ठेव.

सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार

तव पदीं अर्पू असार संसाराहित हा भार

परिहारिसी करुणासिंधो तू दीनानाथ सुबंधो

आम्हा अघलेश बाधो वासुदेवप्रार्थित दत्ता ॥५॥  

श्रीगुरु दत्तात्रेया, आम्ही सहकुटुंब, सहपरिवार तुझेच दास आहोत. या नश्वर क्षणभंगुर संसाराची, घरदाराची आसक्ती, आमची कर्म म्हणजेच आमच्या समग्र विकासाच्या आड येणारा भार आहे, जो आमचे अहित करणारा आहे. आमचाहासारा भार आम्ही तुझ्या चरणी अर्पण करत आहोत.

हे गुरुराया! हे करुणेच्या सागरा! तू आम्हां दीनांचा नाथ आहेस, आमचा हितचिंतक आहेस. तू आमच्या सार्या दु:-क्लेशांचा, दुष्प्रारब्धाचा, अनुचिताचा समूळ परिहार करतोस. हे दत्तात्रेया! तुझ्या सेवेत आमच्या पापांची अंशमात्रसुद्धा बाधा होऊ देऊ नकोस अशी मी वासुदेव (परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामी) आपल्याला प्रार्थना करीत आहे.