सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी ‘रामरक्षा’ प्रवचन २ मध्ये मंत्रदेवता, मंत्राची दिव्य शक्ती आणि ‘रामरक्षा’ला स्तोत्रमंत्र का म्हणतात याचा सोपा उलगडा केला आहे.

रामरक्षा प्रवचन २ मध्ये अनिरुद्ध बापू ‘मंत्रदेवता’ची दिव्य शक्ती, ‘स्तोत्रमंत्र’चे रहस्य व ‘श्री सीता-रामचंद्रो देवता’चा अर्थ नामजपासह श्रद्धा-सबुरी जागृत होते हे समजावतात
मंत्रदेवता: मंत्राची दिव्य शक्ती
सद्गुरु अनिरुद्ध बापू सांगतात की, ‘देव’, ‘देवी’, ‘देवता’ या शब्दांचा संबंध संस्कृतमधील ‘दिव्य’ या धातूशी आहे. परमेश्वराचे स्वरूप त्याच्या मंत्रापेक्षा वेगळे नसते. नाम आणि नामी हे एकरूप असतात, म्हणजेच परमेश्वर आणि त्याचे नाम हे एकच आहेत.
जेव्हा एखादा मंत्र अधिकारी व्यक्तीकडून (सिद्धाकडून) सिद्ध केला जातो, तेव्हा त्या मंत्राच्या उच्चारणाने, भक्तांच्या भक्तीतून आणि स्पंदनांमधून एक दिव्य शक्ती निर्माण होते. ही शक्ती म्हणजे मंत्रदेवता होय. ही मंत्रदेवता त्या मंत्राचे उच्चारण करणाऱ्या प्रत्येकाला आपली स्पंदने अविरतपणे देत राहते. प्रत्येक मंत्राची स्वतःची अशी एक वेगळी मंत्रदेवता असते. सांघिक उपासनेत, म्हणजेच अनेक लोक एकत्र येऊन जेव्हा मंत्राचे उच्चारण करतात, तेव्हा हजारो पटीने स्पंदने निर्माण होतात. यामुळे ही मंत्रदेवता अधिकाधिक शक्तिशाली होते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जो कोणी या मंत्राचा उच्चार एकदा जरी मनापासून करतो आणि त्याचे मन त्या मंत्राच्या देवतेच्या सगुण रूपाच्या चरणांशी एकरूप होते, त्या क्षणी ही मंत्रदेवता त्याला भरभरून लाभ देते. ही मंत्रदेवता ज्या देवतेचा मंत्र आहे, तिच्याशी आपल्याला जोडण्याचे काम करते.
नामस्मरण आणि मंत्रदेवता
या विश्वातील स्पंदनांपासून जशी एक मंत्रदेवता तयार होते, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या प्रारब्धानुसार आणि त्याच्या देहानुसार या मंत्रशक्तीची एक देवता तयार होते. बापूंनी विजेचे उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट केले आहे. धरणात वीज तयार झाली तरी ती तशीच्या तशी आपल्या घरात आणता येत नाही. तिची क्षमता हळूहळू कमी करून, घराच्या गरजेनुसार आणि घराला पेलवेल अशी वीज घरात येते. यासाठी ती वीज विविध सबस्टेशन्समधून जाते. त्याचप्रमाणे, ही आपल्या देहातील मंत्रशक्तीची देवता म्हणजे जणू काही त्या विश्वातील मंत्रदेवतेची ‘सबस्टेशन’ आहेत. ही आपल्या देहांतर्गत राहणारी मंत्रदेवता विश्वातील मंत्रदेवतेशी एकरूप असते.
जर आपल्या मंत्राच्या उच्चारणात खंड पडले, तर आपल्या देहात वाढणाऱ्या मंत्रदेवतेची वाढ हळू होते. या देहांतर्गत तयार झालेल्या मंत्रदेवतेची वाढ सुरळीत होण्यासाठी आपल्याला तिला ‘आहार’ द्यावा लागतो आणि तो आहार म्हणजे नामस्मरण. ज्या प्रमाणात आपण आपल्या भक्तीने नामस्मरण करत राहतो, त्याच प्रमाणात आपल्या देहांतर्गत तयार झालेल्या मंत्रदेवतेचा आकार म्हणजेच तिची शक्ती वाढते. या शक्तीमुळे आपल्याला विश्वशक्तीकडून अधिक स्पंदने मिळतात. ही विश्वातून उत्पन्न झालेली मंत्रशक्तीच परमेश्वर आणि आपल्यामध्ये असलेला दुवा आहे. म्हणजेच, परमेश्वराची शक्ती या विश्वातील मंत्रदेवतेमधून आपल्या शरीरातील, आपल्या देहांतर्गत राहणाऱ्या मंत्रदेवतेपर्यंत येत असते.
नामजपाचे महत्त्व आणि परमेश्वराचे अकारण कारुण्य
बापू परमेश्वराच्या अकारण कारुण्याची महती वर्णन करताना सांगतात की या विश्वात जेवढ्या व्यक्ती मंत्राचा मनापासून उच्चार करतात त्यामुळे जेवढी स्पंदने तयार होतात, तेवढी स्पंदने हा ॐकार, हा परमेश्वर त्या मंत्रमय शक्तीमध्ये टाकत असतो. म्हणूनच संत कळवळून सांगतात, “नामजपयज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्म-अधर्म, नामे परब्रह्म वेदार्थे”. याचा अर्थ असा की, बांबानो, स्नानादि कर्मात अडकू नका, फक्त नाम घ्या, तुमचे सर्व दोष माफ होतील.
श्रद्धा आणि अनुभवांवरील विश्वास
आपण प्रत्येक गोष्टीचे पुरावे शोधत असतो. बापू सांगतात की, पुरावे बाहेरून कुठेही मिळत नाहीत, तर ते आपल्याला आपल्याच जीवनात मिळतात. पण ते इतरांच्या अनुभवांतून आपल्याला शोधता आले पाहिजेत.
एक साधे उदाहरण ते देतात. आपण गहू, तांदूळ खातो. जर प्रत्येक माणसाने जन्माला आल्यानंतर असा विचार केला की, ‘मी गहू, तांदूळ का खाऊ? माझे आई-वडील, आजी-आजोबा खात होते म्हणून?’ आणि ‘मी रासायनिक तपासणी करून हे शरीरासाठी चांगले आहे हे सिद्ध झाले तरच खाईन’ असे ठरवले तर? आपल्या आजी-आजोबांनी, पणजी-पणजोबांनी गहू-तांदूळ खाल्ले आहेत आणि त्यात कोणताही धोका नाही, म्हणून आपण ते खातो.
हा खाण्याच्या बाबतीतील विश्वास मात्र पण भक्तीची गोष्ट आली की डळमळतो. ‘माझे आई-वडील भक्ती करत होते, आजी-आजोबा भक्ती करत होते. आम्ही कशाला भक्ती करू? देवाने त्यांचे भले केले असेल, पण आमचे कशावरून करेल?’ असा प्रश्न आपल्याला पडतो. बापू विचारतात, “अरे, ज्या तांदूळ-गव्हाने आजी-आजोबांचे पोट भरले, त्याच तांदूळ-गव्हाने तुमचे पोट भरते. मग ज्या देवाने आजी-आजोबांचे, पणजी-पणजोबांचे भले केले, तो देव तुमचे भले का नाही करणार?”
तांदूळ-गहू खाल्ले की पोट भरते, हे आपल्याला लगेच ढेकर देऊन कळते. इकडे देवाच्या कृपेसाठी मात्र आपल्याला थोडी वाट बघावी लागू शकते, आणि ती वाट बघायला आपली तयारी नसते. वाट बघणे म्हणजे सबुरी होय. ही सबुरी देण्याचे महत्त्वाचे काम ही मंत्रदेवता करत असते. श्रद्धा देण्याचे काम परमेश्वर करेल, पण सबुरी देण्याचे काम परमेश्वराच्याच मंत्रातून, प्रेरणेतून उत्पन्न झालेली त्याची जी मंत्रदेवता आहे ती करते. श्रद्धा आणि सबुरी या दोन आवश्यक गोष्टी आपल्याला अशा मिळत राहतात. सबुरी आली की श्रद्धा वाढते आणि श्रद्धा आली की सबुरी वाढते. या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत.
सीता: रामरक्षा स्तोत्राची मंत्रदेवता
सद्गुरु अनिरुद्ध बापु पुढे म्हणतात, रामरक्षेमध्ये बुधकौशिक ऋषी अत्यंत सुंदरपणे सांगतात, "श्री सीता रामचंद्रो देवता". याचा अर्थ, या मंत्राची अधिष्ठात्री देवता रामचंद्र आहे आणि या मंत्राची शक्ती सीता आहे. भूमिकन्या सीता हीच मंत्रदेवता आहे. मंत्रशक्ती पृथ्वीच्या पुत्रांकडून, म्हणजेच आपण मानवांनी उच्चारलेल्या मंत्रांकडून उत्पन्न होते.
मानवाला चार वाणी आहेत: वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. परावाणी आपल्या नाभीस्थानावर, बेंबीजवळ, म्हणजेच उदरात राहते. पृथ्वीच्या पुत्रांच्या उदरातून ही वाणी निघते आणि परावाणीतूनच इतर वाणींचा विकास होतो. म्हणजेच, आपण जी मंत्रमय शक्ती म्हणतो, त्या मंत्रमय शक्तीमधून जिचा जन्म झाला, ती भूमिकन्या सीता होय.
'सीता' या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. 'सीता' म्हणजे नांगराच्या फाळाने जमिनीत पडणारी चीर किंवा भेग. दुसरा अर्थ आहे - साखर, म्हणजेच गोडवा. सीता म्हणजे शीतलता नव्हे, तर शांतता. शांत-स्निग्ध म्हणजे सीता. ही शांतता आपल्याला नामस्मरणातून प्राप्त होते, आपल्या मंत्रस्मरणातून प्राप्त होते.
बुधकौशिक ऋषी एका वाक्यात खूप छान सांगतात की, “श्री सीता रामचंद्रो देवता”. सीता हीच श्री आहे, लक्ष्मी आहे. श्री सीता ही मंत्रदेवता आणि रामचंद्र हे अधिष्ठात्री देवता आहे.
रामचंद्र: सीतेसहित म्हणजे भक्तीसहित असणारा राम
राम हे सूर्यकुलोत्पन्न आहेत. कृष्ण चंद्रकुलोत्पन्न आहेत. राम सूर्यकुलोत्पन्न असल्यामुळे त्यांचे नाव 'रामभानु' असायला हवे होते. मग 'रामचंद्र' हे नाव कसे आले?
बापू म्हणतात, 'चंद्र' म्हणजे शीतलता, स्निग्धता, शांतता. ज्या क्षणी रामाचे सीतेशी स्वयंवर झाले, त्याच क्षणी राम हे रामचंद्र झाले. सीतेशिवाय राम हे प्रचंड उग्र आहेत, म्हणजेच ‘अप्राप्य’ (Unapproachable) आहेत. सीतेसहित राम हे आपल्या जवळचे आहेत. हे सर्वात महत्त्वाचे रहस्य आहे.
सीता म्हणजे भक्ती. ज्या क्षणी आपण रामाची भक्ती करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला कठोर वाटणारा, उग्र वाटणारा आणि महत्वाचे म्हणजे दूर वाटणारा राम आपल्याला सीतेमुळे जवळचा वाटू लागतो. ही भक्तीरूपी सीता ही ॐकाराच्या स्पंदनशक्तीच्या रूपाने अस्तित्वात आहेच. पण ती भक्ती आपण आपल्यासाठी, आपल्यामध्ये उत्पन्न करतो. म्हणूनच पहिला मान कोणाचा? सीतेचा, मग रामाचा. त्यामुळेच आपण 'सीताराम' म्हणतो, 'राधेश्याम' म्हणतो, 'लक्ष्मीनारायण' म्हणतो.
स्तोत्रमंत्र: जागृतीचा मार्ग आणि ज्ञानाचा खजिना
सद्गुरु अनिरुद्ध बापू पुढे सांगतात की, बुधकौशिक ऋषी 'अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य' असे म्हणतात. येथे 'स्तोत्रस्य' किंवा 'मंत्रस्य' असे वेगवेगळे न म्हणता 'स्तोत्र मंत्रस्य' असे म्हटले आहे, यात एक मोठे रहस्य दडलेले आहे. स्तोत्र आणि मंत्र यांचा संबंध बुध आणि कौशिक या दोन नावांसोबत आहे. स्तोत्र आपल्याला जागे करते, प्रबुद्ध करते आणि मंत्र हा आपला खजिना आहे., आपली संपत्ती आहे.
पण आपल्याला हा खजिना आहे हे कळलेच नाही, तर आपल्याला तो वापरता येईल का? नाही. तर आपल्याला जागृत करण्याचे काम कोण करते? तर ते स्तोत्र करते. म्हणूनच हा स्तोत्रमंत्र आहे. आपण रामरक्षा का म्हणतो? रामाने माझे रक्षण करावे म्हणून. हे रामाचे स्तोत्र आहे, प्रार्थना आहे, रामाची स्तुती आहे. पण त्यामध्ये खरा मंत्र म्हणजे खजिना लपलेला आहे.
जेव्हा मुलाला कडू औषध द्यायचे असेल तर आपण त्याला मधाचे बोट दाखवतो आणि मधामधून ते कडू औषध देतो. त्याचप्रमाणे, या स्तोत्रामध्ये हा मंत्र दिलेला आहे. नुसता मंत्र म्हणायला आपल्याला नीरस वाटतो, मन लागत नाही. पण या रामरक्षेतील प्रत्येक अक्षर मंत्रमय आहे. आपण त्याची कथा आधी ऐकली आहे. हा स्तोत्रमंत्र, ही प्रार्थना आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जागृत करते. रामरक्षा आपल्याला प्रबुद्ध करणारे आहे, स्वतःकडे आकृष्ट करून घेणारे आहे.
सद्गुरु अनिरुद्ध बापू सांगतात, "मंत्र म्हणजे ’मननात् त्रायते इति मंत्रः’ – म्हणजे ज्याचे मनन केल्यामुळे जो माझे रक्षण करतो, तो मंत्र. मंत्र हा खजिना आहे, जो आपल्याला आवश्यक ते देतो. पण जे आवश्यक आहे ते आपल्याला मिळवावे लागते आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला आधी ते माहित असावे लागते. ते माहित करून देणे, आपल्याला जागृत करणे, आपल्यावरची अज्ञानाची पुटे दूर करणे हे काम स्तोत्र करते. म्हणून याला मंत्राचे स्वरूप नसून स्तोत्राचे आहे, पण याचा आत्मा मात्र मंत्राचा आहे.
तीन अक्षय जोड्या: जीवनातील समृद्धीचा मार्ग
जेव्हा आपण भक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो, आपल्या गरजेपोटी स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो, पण ते भाविकपणे म्हणतो, तेव्हा आपल्याला जागृत करण्याचे काम सीता करते. ही आपल्याला शांतता देते, ही आपल्याला सबुरी देते. आणि ज्या क्षणी ही सीता स्थापित होते, त्या क्षणी तो राम आपल्याला खजिना द्यायला सुरुवात करतो.
यावरून हे स्पष्ट होते की, तिन्ही जोड्या कशा लावल्या आहेत: बुध-कौशिक, स्तोत्र-मंत्र, सीता-रामचंद्रौ देवता.
या प्रवचनात सद्गुरु अनिरुद्ध बापू लक्ष्मीमाता व विष्णुभगवान आणि वारकरी संप्रदायातील संत सावतामाळी यांचीही कथा सांगतात.
बापू त्यांच्या रामरक्षा प्रवचन मालिकेतील दुसऱ्या प्रवचनाच्या शेवटी सांगतात, "स्तोत्र आणि मंत्र, बुध आणि कौशिक व सीता आणि राम या तीन अक्षय जोड्या आम्हाला धारण करायला हव्यात, तेव्हा आमच्या जीवनामध्ये कुठलीच कमतरता रहाणार नाही; आमच्या जीवनात लौकीक आणि पारमार्थिक संपत्तीचा झरा कधीही आटणार नाही."
संपूर्ण प्रवचन मराठी मध्ये येथे पाहू शकता :-
https://www.youtube.com/watch?v=9ybzoYlfaKk
संपूर्ण प्रवचन हिंदी मध्ये येथे पाहू शकता :-
https://www.youtube.com/watch?v=sDV_Y56q3_w