मध्यम मार्ग - २३ डिसेंबर २००७

परमपूज्य बापूंनी लिहिलेल्या धर्मग्रंथाचे नामच मुळी ‘श्रीमद्‍पुरुषार्थ’ हे आहे. दैववादाची किंवा अंगाला राख फासण्याची भाषा सद्‍गुरु बापूंनी कधीच केलेली नाही व कुणासही शिक्षण, प्रपंच, व्यवसाय इत्यादिंकडे दुर्लक्ष करण्यास कधीच सांगितलेले नाही. मात्र प्रवृत्तिवादी जीवन अधिकाधिक चांगल्या रितीने जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थांच्या बरोबर भक्ती आणि मर्यादा हे दोन पुरुषार्थ नितांत आवश्यक आहेत, हेच सद्‍गुरु श्रीअनिरुध्द सदैव सांगत असतात.

आजच्या ह्या जागतिकीकरणाच्या युगात खरी ससेहोलपट होत आहे, ती मध्यमवर्गीयांची. त्यांना नीट पैसा मिळवताही येत नाही व मिळणार्‍या पैशाचे काय करायचे हेही नीटसे कळत नाही. खरे म्हणजे हा मध्यमवर्गच समाजाच्या भक्ती व मर्यादा पुरुषार्थाला जास्तीतजास्त चिकटून राहण्याच्या प्रयत्नात असतो व नीतिचे, संस्कृतीचे संरक्षण व संवर्धनही हा मध्यमवर्गच करत असतो.

bapu 01परमपूज्य सद्‍गुरुंना ह्या वर्षीच्या ‘प्रत्यक्ष’ च्या वर्धापनदिनासाठी विषय विचारताच त्यांनी मला एका क्षणात उत्तर दिले ते हेच की ह्या मध्यमवर्गीयाला ‘अर्थ’ पुरुषार्थाची नीट ओळख करुन द्या. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्व मंडळींनी निरनिराळे विषय, समीकरणे, मूल्ये व तत्त्वे ह्यांसंबंधी निबंध तयार केले. संपादक मंडळाने व त्यांच्या सहकार्‍यांनी अविश्रांत मेहनत घेतली. परमपूज्य बापू प्रत्येक भेटीत नवनवीन सांधे जोडतच राहिले.

हा विशेषांक तयार करताना आम्ही सर्वच जण खूप काही शिकलो. मुख्य म्हणजे आम्हाला जाणीव झाली, ती बापूंच्या सर्वांवरील प्रेमाच्या एका वेगळ्याच पैलूची. बापूंचे प्रेम प्रत्येक श्रध्दावानाला सहाय्य करण्यासाठी किती आतुर व तत्पर असते, त्याचा विलक्षण अनुभव आम्हाला ह्या निमित्ताने आला.

परमपूज्य श्रीअनिरुध्दांनी (बापूंनी) तुमच्या हाती दिलेला हा विशेषांक ‘प्रत्यक्ष’ पणे जो कुणी आचरणात आणण्यासाठी प्रयास करेल, त्यालाच जीवनाचा खराखुरा अर्थ समजेल व प्राप्तही होईल.

मात्र ‘ह्या अर्थ पुरुषार्थाची अधिष्ठात्री देवता श्रीलक्ष्मी, ही धन सगळ्यांनाच देते; पण तृप्ती, शांती व समाधान मात्र फक्त नारायणाच्या भक्तालाच देते’ हे परमपूज्य बापूंचे शब्द तळहातावर लिहून ठेवा.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥