Sant Tulsidas : महान संत श्रीतुलसीदासजी-विरचित ‘एक भरोसो एक बल एक आस बिस्वास। - सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे 23-03-2023 चे प्रवचन

Sant Tulsidas : महान संत श्रीतुलसीदासजी-विरचित ‘एक भरोसो एक बल एक आस बिस्वास। एक राम घनश्याम हित चातक तुलसीदास।।’ या दोह्याचा अर्थ परमपूज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी श्रीहरिगुरुग्राम येथील गुरुवार दि. 23-03-2023 रोजीच्या पहिल्या प्रवचनात समजावून सांगितला. चैत्र मासातील वासंतिक नवरात्रीच्या कालावधीतील गुरुवार असल्याने बापूंनी चैत्रातील नवरात्रीस ‘शुभंकरा नवरात्र’ आणि आश्विनातील शारदीय नवरात्रीस ‘अशुभनाशिनी नवरात्र’ म्हणण्यामागील कारणेही सांगितली.

गुरुवारी चैत्र शुक्ल द्वितीया हा अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ प्रकट दिन असल्याने बापूंनी स्वामी समर्थांच्या प्रकटनाबद्द्लही माहिती दिली. त्याचप्रमाणे स्वामींच्या छायाचित्रात त्यांच्या हातात असणार्‍या गोटीबद्दलचे कुतूहल अनेकांच्या मनात असते, त्या कुतूहलाचे शमनही सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या विवेचनाने झाले. दत्तमालामंत्रातील ‘बालोन्मत्तपिशाचवेशाय’ या शब्दाचा अर्थही बापूंनी सांगितला.

रामाच्या राज्याभिषेकसमयी हनुमंताने जानकीमातेने त्याला दिलेल्या माळेतील प्रत्येक मणि तोडून हनुमंत त्यात राम आहे का हे पाहिले आणि त्यानंतर स्वत:ची छाती फाडून हृदयस्थ रामाचे दर्शन सर्वांना घडवले, ही गोष्ट आम्ही ऐकलेली असते. या कथेतील मर्म सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी उलगडून दाखविले.

रामायणातील रामभक्त देवरूपात पूजले गेले हे बापूंनी शबरी, जटायु यांच्या उदाहरणांवरून स्पष्ट केले. रामावर १०८% विश्वास असणे आवश्यक आहे, हे सांगून बापूंनी ‘रामभरोसे’ या शब्दाचा गर्भितार्थ विशद केला.

सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या निवासस्थानी नुकतेच जे साप्ताहिक अनुष्ठान संपन्न झाले, त्याच्या शेवटच्या दिवशी जो दोहा अनुष्ठानासाठी घेतला होता, त्याबद्दल सांगताना बापूंनी ‘एक भरोसो एक बल.....’ या वर नमूद केलेल्या दोह्याबद्दल विस्ताराने सांगितले. ‘भरोसा, बल, आशा, विश्वास फक्त रामाचाच असावा; एकमेव रामच घनश्याम आहे, तुलसीदासजी चातक आहेत’ हा तुलसीदासजींचा विश्वास प्रत्येक भक्तासाठी मार्गदर्शक आहे.

‘सकृद्-एव प्रपन्नाय तव- अस्मि इति च याचते। अभयं सर्वभूतेभ्यो ददामि एतद्‌‍ व्रतं मम॥'

या आद्यकवि महर्षि वाल्मीकिविरचित रामायणातील वचनाबद्दल सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी गुरुवार दि. ०१-१२-२०२२ रोजीच्या प्रवचनात सांगितलेच आहे. रामावरील पूर्ण विश्वासाने जो या रामभद्रास एकदा जरी शरण गेला, त्याला हा स्वयंभगवान श्रीराम सर्वांपासून अभय प्रदान करतो. शरण जाण्यासाठी आवश्यकता असते, ती अनन्यभक्तीची.

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध त्यांच्या श्रीरामरसायन या ग्रंथात अयोध्यावासीयांच्या अनन्यभक्तीबद्दल सांगून पुढे म्हणतात - ‘अशी अनन्यभक्ती असणाऱ्या भक्तांस परमात्म्याचे त्रिकालाबाधित वचन आहे, जे पुढे भगवान श्रीकृष्णाने गीतेतून अर्जुनास सांगितले, ‘अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌‍॥'

भक्तांच्या प्रेमाची सदैव जाणीव व त्याच्या अनेक पटीने भक्तांवर प्रेम असणाऱ्या श्रीरामांना आम्ही शरण आहोत.

श्रीराम राम शरणं भव राम राम।’

गुरुवार दि. २३-०३-२०२३ रोजीच्या प्रवचनाचा समारोप करताना बापू म्हणाले की माझ्या मायबापा, तुझ्या माझ्या आड काहीही येऊ शकत नाही, हाच प्रत्येकाचा स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाप्रती विश्वास असायला हवा.