Ashadhi Ekadashi - आषाढी एकादशी

आषाढी एकादशी म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतो, तो पंढरपुरचा विठ्ठल, पंढरीची वारी करणारे वारकरी आणि पंढरपुरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी झालेली भक्तांची दाटी. ‘विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी’ हा सन्त चोखामेळा महाराजांचा अभंग वाचताना आपल्या डोळ्यांसमोर जणू आषाढी एकादशीच्या यात्रेचे चित्रच उभे राहते.  

गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी आषाढी एकादशी आहे. विठ्ठल, सन्त, सन्तांचे अभंग, वारी, वारकरी आणि विठ्ठलभक्ती ह्या संदर्भात सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या प्रवचनांमधून, अग्रलेखांमधून अनेकवार सांगितले आहे. 

त्या सावळ्या सच्चिदानन्दास भक्त मायबाप म्हणून भजतात, कथामंजिरी २-७२ मध्ये स्वयंभगवान श्रीत्रिविक्रम आणि सन्निहिता यांतील अभिन्नत्वाबद्दल बापूंनी सांगितले आहे. त्या लेखात बापू म्हणतात - ‘युगे अठ्ठावीस विटेवर उभा असणारा पांडुरंग विठ्ठल हा म्हणूनच, कलियुगात संतांकडून ‘मायबाप', विठूमाऊली, बापरखुमादेवीवरु अशा तीनही प्रकारे गायला जातो.’  

Aniruddha Bapu performing Poojan at Wadala Vitthal Mandir

सन २०१३च्या आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठ्ठलाच्या पूजनासाठी वडाळा, मुंबई येथील विठ्ठल मन्दिराकडून बापूंना निमन्त्रण दिले गेले आणि विठुमाऊलीचे अतिशय प्रेमाने व पूर्ण तल्लीन होऊन पूजन करताना बापूंना पाहणे हा एक अविस्मरणीय सोहळा होता. 

पुंडलीकाच्या भेटीस जेथे भगवन्त आले त्या चन्द्रभागेच्या तीरावर वसलेल्या श्रीक्षेत्र पंढरपुरची बापूंसह केलेली भावयात्रा श्रद्धावानांसाठी आयुष्यभर पुरेल असा आनन्दाचा ठेवा देणारी ठरली. पंढरपुर भावयात्रेत  पंढरपुरचे, पांडुरंगाचे, सन्तांचे माहात्म्य सांगून बापूंनी भक्तीतील भाव कसा असावा याबद्दलही प्रतिपादन केले आणि ‘देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी’ या अभंगाचे सुन्दर निरूपणही केले. 

Aniruddha Bapu performing Poojan at Wadala Vitthal Mandir

सन्त तुकाराम महाराजांच्या ‘खेळ मांडियेला वाळवंटी...’ या अभंगाचा भावार्थ समजावून सांगताना बापू म्हणाले - ही भक्तीची भूमी म्हणजेच वाळवंट. त्या भूमीमधून उगवतं ते माधुर्य, उगवतं ते प्रेम आणि खरंखुरं प्रेम. ह्याने मला काही द्यावं म्हणून प्रेम नाही. असं प्रेम उगवतं ते ह्या वाळवंटामध्ये आणि हाच प्रेम उगवण्याचा खेळ म्हणजे ‘खेळ मांडियेला’.  

बापूंनी सांगितल्याप्रमाणे भक्ती ही भाव हे हृदय असणारी, नित्य वाढत असणारी, अंतरंगी प्रेमशक्ती आणि सस्नेह सेवा आहे. त्यामुळे भगवन्ताचे भजन, कीर्तन, नामस्मरण करण्याबरोबरच भक्ति-अधिष्ठित सेवांमध्येही श्रद्धावान प्रेमाने सहभागी होतात.  

सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणार्‍या अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंट (ए.ए.डी.एम्-AADM) चे आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक (डी.एम्.व्हीज्-DMVs) पोलीस व प्रशासनाच्या विनंतीनुसार आषाढी एकादशीस पंढरपुरास विठ्ठलदर्शनास येणार्‍या वारकर्‍यांना, भक्तांना रांगेतून व्यवस्थित दर्शन घेता यावी यासाठी उन्हापावसाची तमा न बाळगता पंढरपुरात गर्दी व्यवस्थापन सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असतात.  

ह्या वर्षी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे संपन्न होणार्‍या आषाढी एकादशी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या १५ जिल्ह्यांमधून एएडीएम चे सुमारे १४५० डी.एम्.व्हीज् पंढरपुरात सेवेसाठी दाखल झाले आहेत. बापूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी घेतलेले हे निरपेक्ष सेवेचे व्रत हे भक्तिभावचैतन्याचेच एक अंग आहे. 
भक्तिसेवेसंदर्भात बापूंनी जे सांगितले आहे, तोच प्रत्येक श्रद्धावानाचा विश्वास असतो - ‘मी ज्या प्रमाणात भक्ती व सेवा करेन, ज्या प्रमाणात चांगले वागण्याचा प्रयत्न करेन, त्या प्रमाणात माझ्या आयुष्यात अधिकाधिक चांगल्या गोष्टी घडत राहतील.’