संत तुकारामांच्या ‘खेळ मांडियेला...’ या अभंगाचे सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी केलेले विश्लेषण - भाग ५
While explaining Sant Tukaram’s abhang ‘Khel Mandiyela Valvanti Ghai’, Sadguru Aniruddha (Bapu) described the beautiful relation that Lord Vitthal shares with each of his devotees. This relation is such that it cannot be stated in words and also cannot be compared with anything else.
ही भक्तीची भूमी म्हणजेच वाळवंट. ही वाळवंट असून मात्र ही उगवते, ह्या लोकांच्या डोळ्यांना दिसत नाही. वाळवंटामध्ये जर तुम्ही एकादशीच्या दिवशी ह्या भक्तांना नाचताना बघितलं तर तुम्हाला कळेल भर दुपारी ही मंडळी पायात चप्पल पण न घालता आनंदाने नाचत असतात. तासन्तास विठ्ठलाच्या दर्शनाची वाट बघत किंवा दर्शन घेतल्यानंतर सुखानंदाने नाचत असतात. कारण त्या भूमीमधून उगवतं ते माधुर्य, उगवतं ते प्रेम आणि खरंखुरं प्रेम. ह्याने मला काही द्यावं म्हणून प्रेम नाही. तू मला दिलंस तरी प्रेम, नाही दिलंस तरी प्रेम. तू माझ्याशी गोड बोललास तरी प्रेम, तू माझ्यावर रागावलास तरी प्रेम, तू माझ्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवलास, तरीही प्रेम आणि तू माझ्या पाठीत दोन धपके मारलेस तरी तुझ्यावरच प्रेम.
असं प्रेम उगवतं ते ह्या वाळवंटामध्ये आणि हाच प्रेम उगवण्याचा खेळ म्हणजे ‘खेळ मांडियेला’. ह्याच्यामध्ये खेळच प्रेमाचा आहे, खेळणारे वैष्णव आहेत. प्रेमाचा खेळ खेळतात ते वैष्णव. परमेश्वराबरोबर प्रेमाचा खेळ खेळतात ते वैष्णव आणि म्हणूनच गोपांना आणि गोपींना आद्यवैष्णव मानलेलं आहे. गोपांना आणि गोपींना ज्येष्ठ वैष्णव मानलेलं आहे. नारदाला आद्यवैष्णव आणि गोप-गोपींना ज्येष्ठ वैष्णव मानलेलं आहे. ते खेळताहेत, आम्हाला असंच खेळता आलं पाहिजे आणि खेळायचं असेल तर आम्हाला त्या भक्तिच्या प्रदेशात प्रवेश करायला हवा.
आणि मग पुढे तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, ‘गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा। हार मिरविती गळा।’ गोपीचंदनाची उटी लावलेली आहे, गळ्यात तुळशीच्या माळा आहेत आणि गळ्यामध्ये हार घातलेले आहेत. आता हे वर्णन कोणाचं आहे? विठ्ठलाचं आहे की भक्तांचं आहे? कारण विठ्ठलाला पण आपण गोपीचंदनाची उटी लावतो, विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत आणि त्याच्या गळ्यामध्येच आम्ही हार घातलेले आहेत. आम्ही भक्तांना गळ्यात हार घालून मिरवताना बघतो का कधी? नाही. इथे स्पष्ट म्हटलं आहे, ‘हार मिरविती गळा।’ म्हणजे गळ्यात हार घालून मिरवताहेत. मग हा कोण आहे? गळ्यात हार घालून बसणारा तर एक विठ्ठलच आहे. म्हणून भक्त गळ्यात हार घालून बसतात का तिकडे? उत्तर होय की नाही. कोणी घातलाय हार - भक्तांनी की विठ्ठलाने?
‘गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा। हार मिरविती गळा। टाळ-मृदुंग घाई पुष्पवर्षाव। अनुपम्य सुखसोहळा रे।’ ही गोपीचंदनाची उटी जशी विठ्ठलाने लावलेली आहे, तशीच भक्ताने लावलेली आहे. तुळशीची माळ जशी विठ्ठलाला प्रिय आहे म्हणूनच त्याच्या भक्तांना प्रिय आहे आणि तो हार जो विठ्ठलाच्या गळ्यात आहे ना, तो विठ्ठल. विठ्ठलाच्या बाबतीत एक गोष्ट मानली जाते लक्षात ठेवा, ह्या सावळ्याचं प्रेम मोठं अनिवार आहे की भक्तांनी त्याच्या गळ्यात हार घातला की तो लगेच तोच हार भक्ताच्या गळ्यात घालतो. आम्हाला दिसला की नाही हे आमच्या भाग्यावर अवलंबून आहे. पण विठ्ठल मात्र कधीही चुकलेला नाही आणि म्हणून मंदिरातून बाहेर पडणार्या भक्ताच्याच कपाळाला गोपीचंदन असतं, त्याच्याच गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ असते आणि तोच हार मिरवतो. का हार मिरवतो? कारण तो त्याच्या बापाने, त्याच्या देवाने घातलेला हार असतो आणि म्हणून तो, तो हार मिरवतो. एक वेळ विठ्ठलाच्या डोक्याला गोपीचंदनाची उटी नसेल, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ नसेल, तो हार मिरवत नसेल पण त्याचा भक्त मात्र हार मिरवतोपण, गोपीचंदनाची उटीपण लावतो आणि तुळशीच्या मण्यांची माळपण घालतो कारण हेच सगळे सोपस्कार ‘अनुपम्य सुख सोहळा रे।’ हा अनुपम्य आहे.
भक्त देवाची पूजा करताना आम्ही बघितलेत, पण भक्तांची पूजा करणारा हा देव एकच. भक्त माझा देव आहे, हे सांगणारा हा देव एकच. ही दुसर्या कोणाची ख्याती नाही, हाच फक्त छातीठोकपणे सांगू शकतो की माझ्यासमोर बसलेला प्रत्येक भक्त हाच माझा देव आहे आणि म्हणून मी त्याची पूजा करणार आहे, ह्या भावनेने हा विठ्ठल स्वागत करत राहतो आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, ‘अनुपम्य सुख सोहळा रे।’ अनुपम्य, ज्याला उपमा देता येत नाही, ह्याला उपमा देणार कशी, बाकी कुठलाही देव ही गोष्ट करत नाही. पण ही एकटीच सावळी विठाई माऊली मात्र, हा सावळा विठ्ठल मात्र आपल्या प्रत्येक भक्ताची पूजा करतो. जशी तो पूजा विठ्ठलाची करतो की लगेच ह्याने तशीच पूजा आपल्या भक्ताची केलीच.
म्हणून विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पंढपूरला, ह्या भूवैकुंठामध्ये जो कोणी शिरला, ज्याने विठ्ठलाच्या गळ्यात हार घातला त्याच्या गळ्यात विठ्ठलाचा हार पडलाच. त्याच्या गळ्यामध्ये माळ पडलीच आणि मग अर्थातच कोण मिरवणार नाही मला सांगा? साक्षात भगवंताने माझ्या गळयात जर हार घालता, माळ घातली तर मी मिरवणार नाही? मिरवायलाच पाहिजे. गर्वाने नाही प्रेमाने मिरवायला हवं, नातं आहे. आपण आपल्या लहानश्या नातवाला किंवा नातीला घेऊन मिरवतो ना. माझ्या मुलीचा मुलगा बघितला किती गोड आहे! ते मिरवणं आहे, त्यात कोणाला खिजवण्याची गोष्ट नाही, तो माझा स्वत:चा आनंद आहे. तसा भक्त मिरवत असतो की ही माळ कोणाची आहे? तर माझ्या विठ्ठलाची माळ माझ्या गळ्यात आहे.
सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||
॥ नाथसंविध् ॥