वेदमूर्ति आदरणीय श्री गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजींनी घेतली परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंची विशेष भेट
वाराणसी स्थित वेदाचार्य, वेदमूर्ति आदरणीय श्री गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजी ह्यांनी सोमवार दि. २६ मे २०२५ रोजी परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू ह्यांची वैयक्तिक विशेष भेट घेतली.
वेद वेदांताचे जाणकार आणि गाढे अभ्यासक व या क्षेत्रातील ज्यांचा अधिकार सर्व मान्य आहे असे वेदमूर्ति आदरणीय श्री गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजी ह्यांना आज कोण ओळखत नाही! वेद वेदांताच्या या क्षेत्रामध्ये मार्गदर्शक तज्ञ म्हणून विख्यात असलेल्या द्रविड गुरुजींचे नाव घरोघरी झाले, ते अयोध्येतील श्रीराममंदिरामधील भगवान रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेस! राममंदिराच्या भूमिपूजनाचा, तसेच ह्या पावन प्रतिष्ठापना विधीचा शुभमुहूर्त द्रविड गुरुजींनीच काढून दिलेला होता. काशीविश्वेश्वर मंदिर कॉरिडॉर भूमिपूजन विधीसाठीही द्रविड गुरुजींचेच मार्गदर्शन घेण्यात आले होते.
तसेच सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या ‘रामसेतु’विषयक खटल्यामध्ये, ‘रामसेतु’ ही काल्पनिक गोष्ट नसून ते वास्तविक बांधकाम असल्याचे विविध प्राचीन धर्मग्रंथांमधील पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. नुकतेच एप्रिल २०२५ मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे, माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अशा ह्या ऋषितुल्य गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजींनी दि. २६ मे २०२५ रोजी मुंबईस्थित खार येथील ‘श्रीदत्त निवास’ येथे येऊन परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू ह्यांची वैयक्तिक विशेष भेट घेतली.
सर्वप्रथम द्रविड गुरुजींनी ‘श्रीदत्त निवास’स्थित ‘अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’येथील आई जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळेस ‘अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’मध्ये त्यांचे औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


त्यानंतर द्रविड गुरुजींनी सद्गुरु अनिरुद्ध बापूंची भेट घेतली. ह्यावेळी गुरुजींचे शिष्यही सोबत होते. त्याचप्रमाणे सप्तश्रृंगगडाचे वे.शा.सं. श्री. धनंजय दिक्षित गुरुजीसुद्धा हजर होते. प्राथमिक चर्चा झाल्यावर, केवळ द्रविड गुरुजी आणि सद्गुरु बापू ह्या दोघांचीच वैयक्तिक भेट झाली; त्यावेळी इतर कोणीही उपस्थित नव्हते.




सद्गुरु बापूंबरोबरील ह्या वैयक्तिक विशेष भेटीनंतर द्रविड गुरुजींनी पुन्हा अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये थोडा वेळ बसून ‘श्रीनवनाथ भक्तिसार’ ग्रंथाचे पठण केले. त्यानंतर आई जगदंबेचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान केले.
ही भेट म्हणजे सनातन भारताचा श्रेष्ठ वैदिक वारसा आणि सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे अद्वितीय आध्यात्मिक कार्य ह्यांचा समसमा संयोगच होता.