अधिक श्रावण मास (Adhik Sharavan Maas)
अधिक मासास पुरुषोत्तम मास, धोंडा मास अशीही नावे आहेत. ह्या वर्षी अधिक श्रावण मास आला आहे. ३ ऑगस्ट २०२३ रोजीच्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी अधिक मास, श्रावण मास, शिव सहपरिवार पूजन ह्या संदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
‘अधिक मासात व्रत, पूजन, दान आदि साधने करावी’ आणि ‘अधिकस्य अधिकं फलम्’ ह्या उक्तीनुसार ‘अधिक मासात केलेल्या व्रतादिकांचे फल अनेक पटीने मिळते’ अशीही मान्यता आहे.
अधिक मासात भक्तिप्रधान ग्रंथांचे वाचन, स्तोत्रपठण करण्याचे महत्त्व सांगून बापूंनी ‘वाचन-पठणाचा परिणाम मनावर कसा होतो’ हेदेखील स्पष्ट केले. ‘अधिक मासास धोंडा मास का म्हणतात’ हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. ह्या संदर्भात बापूंनी त्यांच्या प्रवचनात उद्बोधक माहिती दिली.
२० जून २०१९ रोजीच्या प्रवचनात ‘श्रावण महिना हा श्रवण भक्तीचा आणि भगवान शिवाची भक्ती करण्याचा महिना आहे’, असे सांगून बापूंनी शिवपरिवाराची माहिती देऊन ‘शिव सहपरिवार पूजना’चे महत्त्वही स्पष्ट केले. सन २०१९ च्या श्रावण मासापासून बापूंनी ‘शिव सहपरिवार पूजन’ करण्याची संधीदेखील श्रद्धावानांना उपलब्ध करून दिली आहे.
३ ऑगस्ट २०२३ रोजीच्या प्रवचनात शिवपरिवार, त्यांची वाहने ह्यांच्याबद्दलही बापूंनी सांगितले. ‘आपल्या परिवारातील सदस्यांमध्ये परस्परप्रेम सदैव रहावे, कौटुंबिक सौख्य, शान्ती, समाधान लाभावे’ या प्रार्थनेसह श्रद्धावानांनी शिव सहपरिवार पूजन करावे असेही बापू म्हणाले.
गुरुक्षेत्रम् मन्त्र आणि मन्त्रगजर ह्यांचे महत्त्वही बापूंनी सांगितले. ‘एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। हरिकृपे त्याचा नाश आहे॥’ ह्या सन्त एकनाथ महाराजांच्या अभंगातील ओळीचा संदर्भ बापूंनी दिला. ‘स्वयंभगवानाच्या कृपेने प्रारब्धाचा नाश होतो, भक्तिभावचैतन्यात राहणार्या श्रद्धावानासाठी ‘नाथसंविध्’ सक्रिय असते, त्याला प्रारब्ध नसते,’ असेही बापू म्हणाले.
श्रावण मास हा आपली आध्यात्मिक भूमिका बळकट करण्याचा महिना असल्याचेही बापूंनी सांगितले आहे. बापूंच्या मार्गदर्शनानुसार दर वर्षी संपूर्ण श्रावण मासात श्रद्धावान सामूहिकरित्या घोरकष्टोध्दरण स्तोत्राचे नित्य १०८ वेळा पठण करतात. ह्या वर्षी श्रद्धावानांच्या सोयीसाठी हे पठण श्रीकृष्ण मंदिर सभागृह, दादर बरोबरच सर्व त्रिविक्रम मठांमध्येही (पुणे, वडोदरा, रत्नागिरी, मीरज, तसेच मुंबई पश्चिम उपनगर - बोरिवली) वरील कालावधीतच आयोजित करण्यात आले आहे. श्रीकृष्ण मंदिर सभागृह, दादर मध्ये होणार्या पठणाचे प्रक्षेपण (Live streaming) त्रिविक्रम मठांमध्ये दाखवण्यात येईल. त्रिविक्रम मठांच्या परिसराच्या आसपास राहणारे इच्छुक श्रद्धावान त्यांच्या सोयीनुसार जवळच्या त्रिविक्रम मठांमध्ये उपस्थित राहून पठणामध्ये सहभागी होऊ शकतात.
श्रावण मासाच्या प्रत्येक शनिवारी सद्गुरुनिवास, जुईनगर येथे अश्वत्थ मारुती पूजन केले जाते. श्रावण महिन्यात दर सोमवारी श्रध्दावान पुरुष एकत्र येऊन श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती करतात.
श्रद्धावान स्वत:ची आध्यात्मिक भूमिका बळकट करण्यासाठी बापूंनी उपलब्ध करून दिलेल्या ग्रन्थवाचन, सामूहिक स्तोत्रपठण, पूजन ह्या संधींचा लाभ घेत असतात. ह्या वर्षी अधिक श्रावण मासाच्या निमित्ताने आपणास सद्गुरुकृपेने अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत.