नवरात्रीतील अंबज्ञ इष्टिका पूजन

 नवदुर्गा पूजन        हिंदी    

२०१७च्या अश्विन नवरात्रीपासून, आपण परमपूज्य सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे अंबज्ञ इष्टिकेचे पूजन करण्यास सुरुवात केली. याप्रमाणे पूजन विधी सर्व श्रद्धावानांसाठी देत आहोत.

प्रत्येक श्रद्धावान आपल्या घरी अशाप्रकारे नवरात्री पूजन करू शकतो.

 

पूजनासाठी लागणारे साहित्य:

रामनामाच्या वहीच्या कागदापासून किंवा इतर कागदाच्या लगद्यापासून बनवलेली, गेरूचे लेपन करून सुकवून पूजनासाठी तयार केलेली इष्टिका.(व्हिडिओ)

पवित्र परातीच्या मागे किंवा पुढे  ठेवण्यासाठी आपापल्या कुलदेवतेची तसबीर, किंवा छोटी मूर्ती किंवा कुलदेवतेचा टाक.
छोटी मूर्ती किंवा टाक ठेवण्यासाठी छोटे ताम्हण.
परात, 
पाट, 
सोवळे किंवा हिरव्या रंगाचा खण (चोळी खण) 
मृत्तिका (माती), 
मृत्तिका ओली करण्यासाठी पाणी,
गहू (गोधूम),
रांगोळी 
काजळ किंवा बुक्का (अबीर),
१० चुनरी किंवा १चुनरी आणि ९ब्लाउजपीस.
(पहिल्या दिवशीच्या पूजनामध्ये मोठ्या आईला चुनरीच अर्पण करण्यात यावी, इतर दिवशी ब्लाऊजपीस अर्पण करू शकता )
दिप 
धूप 
हळद 
कुंकू
कुंकुम अक्षता
हरिद्रा (हळद)अक्षता 
तुलसीपत्रे 
बिल्वपत्रे
सुगंधी पुष्पे 
वेणी किंवा गजरा
झेंडूच्या फुलांची माळ. 
सकाळच्या आणि सायंकाळच्या पूजनाकरता दूध आणि साखर.
आरतीचे तबक. 

प्रतिष्ठापना:

१) चैत्र तसेचअश्विन नवरात्रीच्या प्रथम दिवशी एका परातीमध्ये आवश्यक तेवढी मृत्तिका (माती) घेऊन त्यात थोडेसे पाणी शिंपडावे. 

२) ती माती नीट ओली झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे दाणे पेरावेत व त्यावर परत थोडेसे जल व माती यांचे सिंचन करावे .परातीतील मृत्तिकेत (मातीत) गहू गोधूम पेरण्याचा विधी समाविष्ट आहे. या विधीनुसार पेरण्यात येणारे गहू, अंबज्ञ इष्टिकेच्या मुखासमोर न पेरता, ते इतर सर्व बाजूंनी पेरावेत, जेणेकरून नवरात्रीच्या काळात गव्हाच्या दाण्यांना फुटलेल्या तृणांनी मोठ्या आईचे मुख झाकले जाणार नाही.
(संदर्भासाठी समीरदादांच्या ब्लॉग वरील फोटो पहावा)

३) तद्नंतर एखाद्या पाटावर किंवा टेबलावर किंवा चौरंगावर एखादे सोवळे किंवा हिरव्या रंगाचा खण (चोळी खण) अंथरावा.
त्या स्थानाखाली व भोवती किमान रांगोळी असणे आवश्यक आहे.

४) तद्नंतर "जय जगदंब जय दुर्गे" असा गजर करीत, ही परात, त्या पूजास्थानावर ठेवावी.
 (पाट/चौरंग/टेबल)

५) तद्नंतर ती इष्टिका, तिचा सपाट भाग आपल्यासमोर येईल अशा रीतीने त्या गोधूम (गहू) मिश्रित मृत्तिका (माती) असलेल्या परातीत ठेवावी.

६) तद्नंतर त्या इष्टिकेच्या सपाट भागावर काजळाने किंवा बुक्क्याने (अबीर) देवीचे डोळे, नाक व ओठ रेखांकित करावेत.

७) तद्नंतर या इष्टिकेवर आपल्या आवडीच्या रंगाची एक चुनरी ,मस्तकावरील पदराप्रमाणे अर्पण करावी.
(पूजन विधीमध्ये अर्पण करण्यासाठी, दुसर्‍या दिवसापासून ,आपल्या आवडीनुसार चुनरी अथवा ब्लाऊजपीसही अर्पण करता येईल)

पहिल्यादिवशीच्या पूजनामध्ये मात्र, मोठ्या आईला चुनरीच अर्पण करण्यात यावी.

८) तद्नंतर एक तुलसीपत्र व एक बेलपत्र त्या इष्टिकेच्या दोन्ही बाजूस मातीत रोवावे.
आता ही "अंबज्ञ इष्टिका" अर्थात "मातृपाषाण" अर्थात "आदिमाता दुर्गेचे पूजनप्रतीक" तयार झाले आहे.

ज्यांची इच्छा असेल त्यांनी आपापल्या कुलदेवतेची तसबीर, टाक किंवा मूर्ती या पवित्र परातीच्या मागे किंवा पुढे सोयीनुसार ठेवावी. मोठी तसबीर असल्यास ती शक्यतो मागे ठेवावी आणि टाक व छोटी मूर्ती पराती समोर एका छोट्या ताम्हणात  कुंकुममिश्रित अक्षतांवर ठेवावी.

व्हिडिओ     

नवरात्रिपूजन

९) तद्नंतर आपापल्या सोयी व इच्छेनुसार दांपत्याने किंवा एकट्या व्यक्तीने श्रद्धावान पेहरावात समोर बसावे किंवा उभे रहावे. 

१०) तद्नंतर त्या आदिमाता स्वरूप अंबज्ञ इष्टीकेस "ॐ नमश्चंडिकाय‌ै"  असं म्हणत हळद व कुंकू लावावे.

११) तद्नंतर हात जोडून, "ॐ गं गणपतये नमः" हा जप पाच वेळा करावा.

१२) तद्नंतर नवदुर्गांची ''नाममंत्रमाला" एकदा किंवा तीनदा किंवा पाचदा किंवा नऊ वेळा म्हणत, त्या आदिमातेस, कुंकुम अक्षता, हरिद्रा (हळद), अक्षता, बिल्वपत्रे, तुलसीपत्रे व पुष्पे अर्पण करावीत.
("नवदुर्गा नाममंत्रमाला" म्हटल्याने, पूजनात अजाणतेपणे काही चुका घडल्यास, त्यांचे निराकरण होते)

नवदुर्गा नाममंत्रमाला - 
१) ॐ श्रीशैलपुत्र्यै नमः     २)  ॐ श्री  ब्रह्मचारिण्यै नमः   ३) ॐ  चंद्रघण्टाय‌ै नमः   ४) ॐ श्री  कुष्माण्डाय‌ै नमः    ५) ॐ श्री स्कन्दमात्रै  नमः  ६) ॐ श्री कात्यायन्यै नमः  ७)   ॐ श्री  कालरात्र्यै नमः    ८) ॐ श्री  महागौर्ये  नमः   ९) ॐ श्री सिद्धिदात्र्यै नमः

१३) आदिमातेस वेणी  किंवा गजरा दररोज अर्पण करण्यास हरकत नाही. 

१४) तद्नंतर झेंडूच्या फुलांची एक माळ त्या पराती भोवती (“अंबज्ञ इष्टीकेच्या” मांडणी भोवती) अर्पण करावी.

१५) तद्नंतर पुरणा -वरणाचा नैवेद्य अर्पण करावा. वरणभात व पुरण ह्यांशिवाय, आपापल्या इच्छेनुसार व आवडीनुसार कुठलेही भोजन पदार्थ अर्पण करू शकता.
मात्र नैवेद्य अर्पण करताना पुरणावरच तुलसीपत्र ठेवावे.
 
१६) तद्नंतर "माते गायत्री सिंहारूढ भगवती महिषासुरमर्दिनी..." ही आरती दीप पज्वलित करून करावी ह्यावेळेस इतर कुठलीही आरती घेऊ नये. 

पहिल्या रात्री देखील ही आरती करणे आवश्यक आहे. त्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद म्हणून वाटावा.
 
१७) यानंतर "ओम यज्ञेन यज्ञमयजन्त.." ही मंत्रपुष्पांजली म्हणून उपस्थित सर्वांनी पुष्पे बिल्वपत्रे व तुलसीपत्रे अर्पण करावीत. 

१८)  तद्नंतर आदिमातेस धूप दाखवावा. 

१९)  मग लोटांगण घालावे. 

२०) मातीवर रोज पाणी शिंपडावे. 

नित्य पूजन :
 दुसऱ्या दिवसापासूनचे पूजन, घरातील अन्य कोणताही सदस्य करू शकतो. 

तसेच रोज घरातील वेगवेगळा सदस्यही पूजन करू शकतो . 

१४ वर्षावरील कोणीही हे पूजन करू शकतो. 

नित्यपूजन रोज सायंकाळी , स्नान करून श्रद्धावान वेषात करावे.

दुसऱ्या दिवसापासून, नित्य पूजन करताना, पहिल्या दिवशी अर्पण केलेली चुनरी तशीच ठेवून ,श्रद्धावान चुनरी किंवा ब्लाऊजपीस अर्पण करू शकतात .

जर ब्लाऊजपीस अर्पण केले तर, हे ब्लाउजपीस "अंबज्ञ इष्टिकेवर" न ठेवता, "अंबज्ञ इष्टिकेच्या" एका बाजूला ठेवावेत . 

म्हणजे,पहिल्या दिवशी अर्पण करण्यात आलेली चुनरी, "अंबज्ञ इष्टिकेवर" पूजनाचे सर्व दिवस राहील व अर्पण केलेले ब्लाऊजपीस, अर्पण करून झाल्यावर, बाजूला काढून ठेवता येतील. 

हे अर्पण केलेले ब्लाऊजपीस, श्रद्धावान,'मायेची ऊब' या योजनेअंतर्गत, गोधडी शिवण्यासाठी वापरू शकतात किंवा स्वतःसाठी पण वापरू शकतात.  (नित्यपूजनविधीमध्ये, दुसऱ्या दिवसापासून,आदिमातेस चुनरी अर्पण करावयाची कि ब्लाऊजपीस हे श्रद्धावानांनी स्वेच्छेने ठरवावे. श्रद्धावान अंबज्ञ इष्टिकेस, दररोज चुनरी अर्पण केल्यास, सर्व चुनऱ्यांचा शेवटी पुनर्मिलाप करावा.)  

आदिमातेस, चुनरी किंवा ब्लाऊजपीस अर्पण केल्यानंतर, खाली नमूद केलेले सर्व उपचार करून नित्यपूजन करावे:-

१)  आदिमाता स्वरूप "अंबज्ञ इष्टीकेस" "ॐ नमश्चंडिकायै " असं म्हणत हळद व कुंकू लावावे.

२) तद्नंतर हात जोडून, ॐ गं गणपतये नमः " हा जप पाच वेळा करावा.

३) तद्नंतर नवदुर्गांची ''नाममंत्रमाला" एकदा किंवा तीनदा किंवा पाचदा किंवा नऊ वेळा म्हणत, त्या आदिमातेस, कुंकुम अक्षता, हरिद्रा (हळद)अक्षता, बिल्वपत्रे, तुलसीपत्रे व पुष्पे अर्पण करावीत. ("नवदुर्गा नाममंत्रमाला" म्हटल्याने, पूजनात अजाणतेपणे काही चुका घडल्यास, त्यांचे निराकरण होते)

नवदुर्गा नाममंत्रमाला - 
१) ॐ श्रीशैलपुत्र्यै नमः  २) ॐ श्री  ब्रह्मचारिण्यै नमः   ३) ॐ श्री चंद्रघण्टायै नमः ४) ॐ श्री कुष्माण्डायै नमः  
५) ॐ श्री स्कन्दमात्रै  नमः   ६)ॐ श्री कात्यायन्यै नमः ७)  ॐ श्री कालरात्र्यै नमः  ८) ॐ श्री  महागौर्ये  नमः   
९) ॐ श्री सिद्धिदात्र्यै नमः

४) आदिमातेस वेणी किंवा गजरा दररोज अर्पण करण्यास हरकत नाही. 

५) दुसऱ्या दिवसापासून, सायंकाळच्या नित्य पूजनामध्ये. झेंडूच्या फुलांची नवीन माळ अर्पण करतेवेळी, आदल्या दिवशीची माळ/माळा पूजन मांडणीत तशाच ठेवाव्यात किंवा न ठेवाव्यात हे,श्रद्धावान स्वतःच्या आवडीनुसार व सोयीनुसार ठरवू शकतात.

६) तद्नंतर पुरणा-वरणाचा व इतर भोजन पदार्थांचा नैवेद्य, आपल्या इच्छेनुसार अर्पण करू शकतात. मात्र, शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी शाकाहारी नैवेद्य अर्पण करणे श्रेयस्कर. भोजनाच्या अन्य पदार्थांमध्ये कांदा-लसणाचे पथ्य नाही, मांसाहार शक्यतो टाळावा. 

७) तद्नंतर सायंकाळी आरती करताना, विविध आरत्या घेण्यास हरकत नाही; ह्यावेळी कुठल्याही क्रमाने आरती करू शकतो.

८) त्यानंतर दूध-साखरेचा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद म्हणून वाटावा.

(नित्य पूजनाच्या उपचारांनुसार, मोठ्या आईला, दररोज, अनुक्रमे सकाळी व सायंकाळी, दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करणे आवश्यक आहे.)
 
 ९) यानंतर "ओम यज्ञेन यज्ञमयजन्त" ही मंत्रपुष्पांजली म्हणून उपस्थित सर्वांनी पुष्पे, बिल्वपत्रे व तुलसीपत्रे अर्पण करावीत. 

१०)  तद्नंतर आदिमातेस धूप दाखवावा. 

११)  मग लोटांगण घालावे. 

१२) मातीवर रोज पाणी शिंपडावे. 

कधी कधी नवरात्र तिथी फक्त आठ दिवसांमध्ये येतात तेव्हा, 'अश्विन नवरात्रीमध्ये' विजयादशमीच्या आदल्या दिवशी व 'चैत्र नवरात्रीमध्ये' रामनवमीच्या आदल्या दिवशी, दोन चुनऱ्या/ब्लाऊजपीस अर्पण करावे.  

एखाद्या वर्षी नवरात्र तिथी नऊ ऐवजी दहा दिवस आल्यास, वाढत्या क्रमाने चुनरी / ब्लाऊजपीस अर्पण करावे.  (एकूण दहा चुनऱ्या किंवा १ चुनरी (पहिल्या दिवसासाठी) व इतर दिवसांसाठी ९ ब्लाऊजपीस अर्पण केले जातील.) 

  
पुनर्मिलाप: 

१) अश्विन नवरात्रीमध्ये विजयादशमीच्या दिवशी व चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी ,सकाळी आदिमातेस हळदीकुंकू अर्पण करून ,'दूध-साखर' व फक्त 'पुरण' एवढाच नैवेद्य अर्पण करावा. 

२) मग अक्षता व फुले अर्पण करून आदिमातेची,स्वतःच्या शब्दांत क्षमायाचना व कृपायाचना करावी आणि दोन्ही हात जोडून पुढील मंत्र म्हणावा : 

 आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्। पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वरि ॥

३) मग स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालताना पुढील मंत्र म्हणावा: 

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च। तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण्यां पदे पदे ॥

४) तद्नंतर परातीमध्ये उगवलेल्या रोपांवर दुधाचे फुलाने सिंचन करावे व आदिमातेच्या मस्तकावर कुंकुमअक्षता अर्पण करताना 'गुरुक्षेत्र मंत्र' म्हणावा व परात थोडीशी सरकवावी. 

५) तद्नंतर आपण स्वेच्छेनुसार व सोयीनुसार त्या "अंबज्ञ इष्टिकेचा" जलात पुनर्मिलाप करावा व त्या परातीतील थोडीशी माती,तुळशीच्या रोपास अर्पण करावी आणि परातीत आलेल्या रोपांतील एक रोप,तुळशीच्या कुंडीत लावावे बाकी सर्व विसर्जन करावे' 
 
पुनर्मिलाप पूजनानंतर अश्विन नवरात्रीमध्ये विजयादशमीचा दिवस व चैत्र नवरात्रिमध्ये रामनवमीचा दिवस किंवा त्या पुढील तीन दिवसात कधीही “अंबज्ञ इष्टिकेचा” जलात पुनर्मिलाप करावा .

(चैत्र नवरात्रीत श्रद्धावान ,त्यांना हवे असल्यास, पुनर्मिलाप हनुमान पौर्णिमेच्या दिवशीही  करू शकतात.)

 मात्र पुनर्मिलाप होईपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ दूध-साखरेचा नैवेद्य अर्पण करावा.
 

इतर माहिती:

घरामध्ये सोयर- सुतक असतानाही हे पूजन करू शकतो.  

मासिकपाळीच्या काळात स्त्रिया दर्शन घेऊ शकतात व नमस्कार करू शकतात.  

नवरात्रीच्या काळात स्वतःच्या राहत्या घराशिवाय अन्य स्थळी निवासास असल्यास, त्या ठिकाणीही श्रद्धावान हे पूजन करू शकतात . 
 
नवरात्रीच्या काळात घरातील किंवा नात्यातील व्यक्ती,स्वर्गवासी झाल्यास नवरात्रीपूजन सुरू ठेवायचे अथवा नाही ह्याबाबत श्रद्धावानांना स्वातंत्र्य आहे; परंतु मध्येच पुनर्मिलाप  करावयाचा असल्यास "आदिमाता शुभंकरा स्तवनम्" अकरा वेळा म्हणून मग अक्षता वाहून तदनंतर पुनर्मिलाप  करावा. 

एखाद्याने आपल्या घरात एका वर्षी हे नवरात्री पूजन नव्याने सुरू केले, तर दरवर्षी हे पूजन करणे बंधनकारक नाही. पण ज्यांच्या घरात अगोदरपासून वंशपरंपरेने नवरात्री पूजन सुरू असेल,त्यांनी दरवर्षी पूजन करणे आवश्यक आहे . 

एखाद्या घरात जर अगोदरपासून सातत्याने नवरात्री पूजन सुरू असेल तर,पुढील पिढीतल्यांनी हे पूजन सुरु ठेवणे आवश्यक आहे. 

एखाद्या व्यक्तीने नव्याने हे पूजन करण्यास सुरुवात केली, तर त्याने, पूजनास सुरुवात करताना असा संकल्प करावा की, "पूजन पुढे सुरू ठेवायचे आहे किंवा नाही हे पुढील प्रत्येक पिढी ठरवेल".  

घरातील अन्य मंगल,शुभप्रसंगी असे पूजन एका दिवसासाठी करू शकतो. 

अशा एकदिवसीय पूजनाच्यावेळी,परातीत गहू घेऊन त्यावर "अंबज्ञ इष्टिका"  ठेवून , पूजन करावे व नंतर ते गहू गरजूस दान द्यावे.

श्रद्धावानांनी त्यांच्या जुन्या पद्धतीनुसार पूजन करण्यास काहीच हरकत नाही परंतु,वरील पद्धतीने पूजन केल्यास, नवरात्री पूजनातील त्रुटी व चुका व व्यक्तिगत दोष यांचा परिणाम होत नाही. 

काही श्रद्धावान यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने पूजन करीत आले आहेत. परंतु तरीही, सद्गुरूंच्या शब्दाप्रमाणे पूजन करावे की,इतर पद्धतीने पूजन करावे हा निर्णय,श्रद्धावान वैयक्तिकरित्या घेऊ शकतात.


२०१७ च्या अश्विन नवरात्रोत्सवामध्ये सुरू झालेल्या,परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या ,नवरात्री पूजनाच्या विशेष पद्धतीचा अनेक श्रद्धावान लाभ घेत आहेत.