सुंदरकांड पठण उत्सव - १७ मे ते २१ मे २०१६

 
संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी विरचित ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ सर्व भारतभर श्रद्धावानजगतात अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि त्यातील ‘सुंदरकांड’ ह्या भागाला श्रद्धावानांच्या जीवनात आगळंवेगळं स्थान आहे. सद्गुरु बापूंसाठीही ‘सुंदरकांड’ ही अतिशय प्रिय गोष्ट आहे.
 
सुंदरकांड पठण उत्सव (Sundarkand Pathan Utsav)
 
सीतामाईच्या शोधाकरिता हनुमंताबरोबर निघालेल्या वानरांचा समूह समुद्रकाठी पोहोचतो इथपासून सुंदरकांडाची सुरुवात होते. त्यानंतर हनुमंत समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश करून सीतेचा शोध घेतो?व लंका जाळून पुन्हा श्रीरामांच्या चरणांशी येऊन त्यांना वृत्तांत निवेदन करतो. मग बिभीषणही श्रीरामांकडे येतो व श्रीराम वानरसैनिकांसह सेतू बांधण्यास सुरुवात करतात. असा हा घटनाक्रम सुंदरकांडात वर्णिला आहे.
 
‘सुंदरकांड’ हे आमचं जीवन सर्वाथाने सुंदर करणारं आहे, असं सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू वारंवार सांगतात. सुंदरकांडावर आधारित ‘तुलसीपत्र’ ही अग्रलेखमाला दै. प्रत्यक्षमध्ये बापू नारदजयंती 2007 पासून लिहीत आहेत व आजपर्यंत ह्याचे बाराशेच्या वर अग्रलेख प्रकाशित झाले आहेत. ह्यांतील पहिल्या अग्रलेखामध्ये बापू सुंदरकांडाबद्दल म्हणतात -
‘‘सुंदरकांड म्हणजे रामायणातील अत्यंत सुंदर आणि देदीप्यमान व तेजस्वी, शुभप्रद शिखर. ह्या सुंदरकांडावर दत्तगुरुकृपेने माझे अपरंपार प्रेम आहे. ह्या नारद जयंतीपासून सुंदरकांडातील प्रत्येक ओवीवर (चौपाई, दोहा) मी सातत्याने व क्रमशः लिहीत राहणार आहे. हे माझ्या मनाने केलेले सुंदरकांडाच्या पावित्र्याचे लोटांगण असेल.’’
 
संतश्रेष्ठ तुलसीदासजींबद्दल बापू अग्रलेखात लिहितात - 
‘‘संतश्रेष्ठ तुलसीदास म्हणजे रामदासस्वामींप्रमाणेच जनसामान्यांना रामभक्ती अत्यंत प्रेमाने शिकविणारा एक थोर संत. तुलसीदासांचा प्रत्येक श्‍वास रामनामाबरोबर निगडीत झालेला होता व ज्या क्षणाला त्यांच्या हृदयाचा प्रत्येक ठोका रामनामाशी निगडीत झाला, त्याच क्षणाला साक्षात महाप्राण श्रीहनुमंताने तुलसीदासांना दर्शन दिले व तुलसीदासांच्या दृष्टीसमोर प्रत्यक्ष संपूर्ण रामकथा हनुमंतप्रभुंनी जिवंत केली व अशी जिवंत कथा पाहतापाहताच तुलसीदासांनी ‘श्रीरामचरितमानस’ ही रामकथा लिहून पूर्ण केली.’’
 
त्याचप्रमाणे सुंदरकांडाचं महत्त्व सांगताना बापू पुढे लिहितात -
‘‘मानवी जीवनास विकासासाठी, प्रपंचासाठी व परमार्थासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन ह्या सुन्दरकाण्डात ठायीठायी भरलेले आहे. एवढेच नव्हे तर ह्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन संपूर्ण जन्म उत्कृष्ट करण्यासाठी, सुख, शांती व तृप्तीच्या प्राप्तीसाठी लागणारे सामर्थ्यसुद्धा देण्याची ताकद ह्या सुन्दरकाण्डात आहे.’’
 
बापूंनी आपल्या प्रवचनांमध्येही सुंदरकांडाचा महिमा वारंवार सांगितला आहे. आपण त्यांतील एक महत्त्वाचे क्लिपिंग बघूया.
 
 
 
महावीर वज्रांग म्हणजेच ‘बजरंगबली’ स्वतःच्या मूळ स्वरूपात कार्यास सिद्ध होतो. येथेच सुन्दरकाण्डाची सुरुवात होते. 
 
श्रीहनुमंताला बापू सदैव ‘रक्षकगुरु’ म्हणून संबोधतात आणि सुंदरकांड हा हनुमंताचा पुरुषार्थ आहे, असे बापू सांगतात. माझा रक्षकगुरु श्रीहनुमंत स्वतःला प्रभू रामचंद्रांचा दास म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो आणि हा अनिरुद्ध त्या हनुमंताचा दासानुदास म्हणवून घेण्यातच स्वतःच्या जीवनकार्याची इतिकर्तव्यता मानतो, ह्या शब्दांत हनुमंताबद्दल वाटणारं प्रेम बापूंनी व्यक्त केलं आहे. 
 
दर वर्षी मे महिन्यामध्ये खार येथील श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे ‘श्रीहनुमानचलीसा’ ह्या स्तोत्राचे बापूंच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धावान प्रतिदिन 108 ह्याप्रमाणे साप्ताहिक पठण करतात. ह्याचबरोबर ह्या वर्षी फेब्रुवारी/मार्च महिन्यात ‘श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्’ येथे ‘सुंदरकांड पठण’ही आयोजित करण्यात आलं होतं. ह्या पठणकाळात सुंदरकांडाचे एकूण 1100 पाठ करण्यात आले. बापूंच्या घरच्या देवघरातील श्रीरामपंचायतनाच्या मूर्तीचं पुरोहितवृंदाकडून अर्चन करून घेऊन ह्या पठणाची सुरुवात झाली होती. ‘रक्षकगुरु’ हनुमंताच्या भव्य तसबिरीसमोर पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्वतः बापू दररोज ह्या पठणास उपस्थित राहत होते. हजारो श्रद्धावानांनीही ह्या पठणाचा लाभ घेतला. 

 

 अधिकाधिक श्रद्धावानांना ह्याचा लाभ घेता यावा ह्यासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार श्रीहरिगुरुग्राम, न्यू इंग्लिश स्कूल, बांद्रा (पूर्व) येथे सुंदरकांड पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन दि. 17 मे ते 21 मे 2016 ह्या दरम्यान केलं गेलं आहे. ह्या उत्सवाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बापूंच्या देवघरातील श्रीरामपंचायतनाच्या मूर्तींबरोबरच, स्वतः सद्गुरु बापूंनी स्वहस्ते घडवलेली हनुमंतशिळा पूजनमांडणीमध्ये विराजमान असणार आहे. ह्या कार्यक्रमाचं महत्त्व सांगताना बापू म्हणाले -

 

ह्या सुंदरकांड पठण कार्यक्रमाच्या रूपाने सद्गुरु बापूंनी सर्व श्रद्धावानांना आपले जीवन सुंदर बनवण्यासाठी दिलेली एक सुवर्णसंधीच आहे. तरी प्रेमाने ह्या पठणात सहभागी होऊन त्याचा आपण सर्व श्रद्धावानांनी जास्तीत जास्त लाभ मिळवूया.

 
 ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

My Twitter Handle