अनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात.
हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला आहे. तसेच संदीपसिंह महाजन, अंजनावीरा महाजन, सचिनसिंह वराडे ह्यांच्याबरोबर इतर सर्व जणांनी वेगवेगळी उदाहरणं देत, सद्गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी आपल्या “मीपणाचा” त्याग करणे किती महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सद्गुरुंचे गुणसंकीर्तन ऐकणे आणि स्वत: करणे हे किती आवश्यक आहे ह्याबद्दल खूप छान विवेचन केले आहे.
आपण मागच्या वेळेला सपटणेकरांची गोष्ट बघितली. हेमाडपंतांच्या कथेपासून सपटणेकरांच्या कथेपर्यंत येऊन आपण पोहोचलो. या गोष्टीचं सार हेमाडपंत आपल्याला २ ओव्यांमधून सांगतात,
म्हणूनि केला निज निर्धार| अनुग्रह बाबांचा होयतोंवर| तेथेंच वृत्ती ठेवूनि स्थिर| रहावें सुस्थिर मानसें | त्रिविधतापें तापलेला | वरी साईंच्या दर्शना भुकेला | ऐसा कोण विन्मुख गेला | जो न निवाला अंतरीं |
- (श्रीसाईसच्चरित अ.४८, ओ.१२५, १२६)
माझी वृत्ती कशी असायला हवी हे वरील पहिली ओवी दाखवते आणि अशी वृत्ती असेल तर साईनाथ कसा प्रतिसाद देतात हे दुसरी ओवी सांगते. त्याचप्रमाणे हा साईनाथ कुठल्या हाकेला साद देतो आणि कोणाला साद देतो हे खालील ओवी सांगते,मी माझिया भक्तांचा अंकिला| आहें पासींच उभा ठाकला| प्रेमाचा मी सदा भुकेला| हांक हांकेला देतसें|
- (श्रीसाईसच्चरित अ.११, ओ.७६)
सपटणेकरांच्या कथेमध्ये आपण पाहतो की त्यांच्या मुलाचा मृत्यु झाल्यानंतर, साईनाथ त्यांना न मागताही मुलगा परत देतात.
मी लोकांची पोरें मारितों| हा कां मशिदीस येऊनि रडतो | बरें मी आतां ऐसें करितों| पोटासी आणितों पुत्र त्याचा| जैसा मेलेला रामदास | दिला माघारा त्या बाईस | तैसाच पुनश्च त्याचिये मुलास | आणितों मी पोटास त्याचिया |
-(श्रीसाईसच्चरित अ.४८, ओ.१४४, १४५)
त्यानंतर बाबांच्या शब्दानुसार पुत्रप्राप्ती झाल्यावर ८ महिन्यांच्या मुलाला घेऊन सपटणेकर साईनाथांच्या दर्शनाला येतात. (संदर्भ : अ.४८, ओ.१६७, १६८).
ह्या गोष्टीशी संबंधित श्रीसाईसच्चरितातील १४व्या अध्यायात एक थोडीशी वेगळी गोष्ट येते. शेठ रतनजी (Ratanji) (रतनजी शापूरजी वाडिया मिलकॉन्ट्रॅक्टर) हे पुत्रप्राप्तीच्या इच्छेने साईनाथांकडे येतात. “मनाची मुराद पुरवील अल्ला” असा त्यांना साईनाथांकडून आशीर्वादही मिळतो आणि रतनजींना पुढे पुत्रप्राप्ती होते. ही वंशवेल वाढत जाते पण परिस्थिती अशी होते की त्यांच्या १२ मुलांमधील ४ मुलच हयात राहतात. हेमाडपंत इथे स्पष्टपणे सांगतात,
यदृच्छेनें जें जें घडावें| त्यांतचि ज्याचें चित्त सुखावें| ऐसे रतनजी गोड स्वभावें| खेद न पावले तिळभर|
- (श्रीसाईसच्चरित अ.१४, ओ.२००)
म्हणजेच रतनजींच्या बाबतीत सुखाबरोबर दु:खही आले. ह्या कथेवरून आपल्याला कळते की श्रद्धावानांना सद्-गुरुंच्या चरणी कशाची मागणी करावी आणि कशी करावी हे ठरवावं लागतं. “माझी तर इच्छा अशी आहे, पण तुझी इच्छा असेल तेच दे” हा भाव असावा लागतो कारण माझ्यासाठी काय उचित आहे हे सद्-गुरुंशिवाय कधीच कोणीही सांगू शकत नाही. आद्यपिपादादाही हेच सांगतात,
प्रारब्ध आणील पुढे काय काळ आम्ही जरी नेणू करी प्रतिपाळ
आम्ही श्रीअनिरुद्ध महिमामध्ये हेच मागणे मागतो.
जे जे मजसाठी उचित | तेचि तू देशील खचित| हे मात्र मी नक्की जाणीत| नाही तक्रार राघवा|
त्याचप्रमाणे बापू आपल्या दिग्दर्शक गुरुंच्या गुणसंकीर्तनामध्ये (श्रीसाईमहिमामध्ये) म्हणतात, मजला आवडो अथवा नावडो| तू जे इच्छिसी तेचि घडो| हेचि मागता न अवघडो| जीभ माझी|
…आणि म्हणून हेमाडपंत आपल्या साईनाथांबरोबरच्या पहिल्या धूळभेटीनंतर आपल्याला सांगतात,
साईदर्शनलाभ घडला| माझिया मनींचा विकल्प झडला| वरी साईसमागम घडला| परम प्रकटला आनंद| साईदर्शनीं हीच नवाई|दर्शनें वृत्तीसी पालट होई| पूर्वकर्माची मावळे सई| वीट विषयीं हळूहळू|
- (श्रीसाईसच्चरित अ.२, ओ.१४४, १४५)
म्हणजेच फक्त साईनाथांच्या, सद्-गुरुंच्या दर्शनाने काय झालं : १) माझिया मनाचा विकल्प झडला – मनातील संकल्प विकल्प नष्ट होतात २) परम प्रकटला आनंद – जीवनातील सर्वोच्च (परम) आनंद अनुभवता येतो. ३) पूर्वकर्माची मावळे सई – गतकर्माचा “अनिष्ट प्रभाव” लय पावू लागतो ४) वीट विषयीं हळूहळू – षड्-रिपूंपासून भक्त / श्रद्धावान लांब जातात म्हणजेच त्यात ते सहजतेने अडकत नाहीत.
…आणि हेच “सद्-गुरुंना का शरण जावं” ह्याचं साधं आणि सोपं explanation हेमाडपंत आपल्याला देतात. बापूही आपल्याला नेहमी सांगतात की सर्वात मोठा चमत्कार कुठला – तर मनाची वृत्ती पालटणं, मनाचं नम: होणं (संदर्भ : श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज, सत्यप्रवेश, चरण ५, पान क्र. २५), आणि हाच सर्वात मोठा चमत्कार होय; जो हेमाडपंतांनी फक्त साईनाथांच्या (सद्-गुरुंच्या) दर्शनाने अनुभवला. हेच ते दर्शन महात्म्य जे कशाचीही अपेक्षा न ठेवता साईनाथांकडे गेलेल्या हेमाडपंतांनी अनुभवलं.
सच्च्या श्रद्धावानाला सद्-गुरुकडे कधीही काहीही मागावं लागत नाही. त्याच्यासाठी उचित ते सद्-गुरु देतच असतो. धूळभेटीच्या प्रसंगातून हेमाडपंत आपल्याला हेच दाखवून देतात.
(फोरममध्ये(Forum) भाग घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा:- https://sadguruaniruddhabapu.com/forums/topic/साई-द-गाइडिंग-स्पिरिट-हेम/)