रामरक्षा स्तोत्रातील ‘सीताशक्ती’: तृप्ती व पुरुषार्थ

रामरक्षा स्तोत्रातील ‘सीताशक्ती’: तृप्ती व पुरुषार्थ

 

१. रामरक्षा स्तोत्रातील सीताशक्ती 

रामरक्षा या स्तोत्रमंत्रावरील प्रवचन मालिकेतील चौथ्या भागात सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू ’सीताशक्तीः’ या ओवीबद्दल बोलताना म्हणाले की, रामरक्षा स्तोत्राची सीता ही शक्ती आहे. शक्ती म्हणजे केवळ शारीरिक बल, अणुशक्ती किंवा धनशक्ती यासारख्या बाह्य किंवा दृश्य गोष्टी नाहीत, तर शक्ती म्हणजे प्राणशक्ती, जी सर्व शक्तींचे मूळ आहे. 

बापूंनी वेगवेगळ्या उदाहरणांतून स्पष्ट केलं की, प्राण ही अशी शक्ती आहे जी दिसत नाही, पण तिची जाणीव तिच्या भावाने (म्हणजेच अस्तित्वाने - Presence) किंवा अभावाने (Absence) होत असते. शरिरात प्राण असताना शरीर क्रियाशील असतं, आणि ते गेल्यावर शरीर निश्चल होतं, यावरूनच प्राणशक्तीचे अस्तित्व लक्षात येते.

 

२. प्राणशक्ती आणि तिचे कार्य 

शरीरात होणाऱ्या क्रिया उदा. श्वासोश्वास, हृदयस्पंदन, मेंदूचे कार्य) या काही स्वतः प्राण नाहीत तर या सर्व क्रियांचे संचालन प्राणशक्ती करते. 

पुढे बापूंनी अणूचे उदाहरण देत स्पष्ट केलं की, अणूमधील प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांच्यातील अंतर कायम राखणारी जी शक्ती आहे, तिलाच आपण अणुशक्ती म्हणतो. जेव्हा या इलेक्ट्रॉन्सच्या रचनेत बदल होतो तेव्हाच अणूमधली ही शक्ती म्हणजे बाहेर येते. 

तसेच, प्राणशक्ती हीसुद्धा सर्व विश्वातील शक्तींचं मूळ रूप आहे, पण ती परमेश्वराच्या नियमानुसार कार्य करते. म्हणूनच ती विस्कळीत होत नाही, ती ठरावीक मार्गाने जाते.  

प्राणशक्ती ही सजीवतेमागील मूलभूत शक्ती असून ती तीन स्वरूपांत कार्य करते. 

(१) तृषा (भूक/गरज) 

(२) क्रिया (कृती), 

(३) तृप्ती (समाधान). 

जगातली प्रत्येक क्रिया ही या तीन टप्प्यांतून जाते; गरज निर्माण होते → कृती होते → समाधान मिळतं.

 

३. तृप्तीचा अभाव आणि त्याचे परिणाम 

अनेकदा प्रयत्न होतात, कृती होते, पण तृप्ती मिळत नाही. हीच अतृप्ती हे दुःखाचं मूळ कारण आहे. बापूंनी सांगितलं की, श्रीराम म्हणजे पुरुषार्थ. परिश्रम सुंदरतेने करण्याची ताकद म्हणजे पुरुषार्थ. तृप्ती मिळवण्याची ताकद म्हणजे पुरुषार्थ, आणि सीता म्हणजे तृप्ती. परंतू आपल्या आयुष्यात सीता (तृप्ती) ही रावणाच्या (दुष्ट संकल्पनेच्या) कैदेत असते. म्हणून पुरुषार्थ असूनही तृप्ती मिळत नाही. 

तृप्तीच खरी शक्ती आहे. तृप्तीमधूनच नवीन सामर्थ्य उत्पन्न होतं; अतृप्ती माणसाची सगळी शक्तीच नाहीशी करते. इतरांशी तुलना केल्यानेही अतृप्ती निर्माण होते. 

बापू सांगतात की सद्गुरुतत्त्वाकडे प्रत्येकाची रांग वेगळी असते. त्यामुळे तुलना करून स्वतःची सुखदुःख किंवा ध्येय ठरवू नका. स्वतःची ताकद ओळखून त्याप्रमाणेच कृती करा.

 

४. तुलना म्हणजे भय निर्माण करणारी 'कैकसी' आणि भय म्हणजे रावण 

तृप्ती हीच प्राणशक्तीचं अंतिम कार्य आहे. मनुष्य कितीही प्रयत्नशील असला तरी जर तो इतरांशी तुलना करत राहिला, तर त्याला तृप्ती मिळत नाही. 

बापू सांगतात, तुलना हीच ‘कैकसी’ आहे जी रावणाची आई आहे आणि तिच्या पोटीच जन्मतो रावण म्हणजे भय. ही तुलना आणि भय आपल्याला पुरुषार्थ (परिश्रम) आणि तृप्ती (समाधान) यांच्यापासून दूर ठेवते. 

भयही तुलनेतूनच निर्माण होतं, जे आपली क्षमता असूनही आपल्याला न्यूनगंडात टाकतं. म्हणून मनुष्याला आपलं कर्तव्यही योग्य प्रकारे करता येत नाही. जसं एखाद्याला गाणं येतं, पण स्टेजवर भीतीमुळे गाताच येत नाही, तसं आपल्या आयुष्यातही भीतीमुळे आपली ताकद कमी होते.

 

५. खरा मोक्ष म्हणजे तृप्ती 

मोक्ष म्हणजे काहीतरी जगापासून दूर जाणं नाही, तर शरीर, मन, प्राण या सगळ्या पातळ्यांवर पूर्ण तृप्ती म्हणजेच खरा मोक्ष. तुलना न करता, स्वतःच्या कुवतीनुसार काम करत रहाणे, मन:शांती आणि तृप्ती मिळवणे हीच खरी शक्ती आहे, आणि तीच श्रीरामरक्षेची प्रेरणाही आहे. 

बापू सांगतात, आपण दुःखी का होतो? कारण आपण सतत इतरांशी तुलना करतो. "त्याचं उत्पन्न जास्त आहे", "तो माझ्यासारखा स्थूल नाही", "तो पटकन पुढे गेला", अशा तुलना करून आपण स्वतःचं समाधान हरवतो. म्हणूनच इतरांशी तुलना करू नका. 

तुमचे ध्येय गाठण्यासाठी ताकदीनुसार टप्प्याटप्प्याने चाला. गरज असल्यास मध्ये विश्रांती घ्या. मोठं ध्येय पोहचण्यापर्यंतच्या प्रत्येक पायरीवर आनंदीत राहा. कारण तृप्ती असेल तरच पुढे जाण्याची ताकद मिळते. सीता ही तृप्ती आहे आणि तृप्तीला तुलना नाही. ती ‘अतुला’ आहे.

 

६. तृप्तीशिवाय कार्य सुसंगत होत नाही 

तृप्ती हीच पुरुषार्थाची खरी प्रेरणा आहे आणि तिच्याशिवाय कोणतेही कार्य सुसंगत होत नाही. 

बापू एक सोपं उदाहरण देतात, समजा, एखाद्या जागी तुम्ही काम करत असाल आणि महिन्याचा पगारच मिळाला नाही, तर पुढच्या महिन्यात काम करायला उत्साह राहील का? 

तसंच आयुष्यातसुद्धा आहे – कार्य (पुरुषार्थ) केलं की त्यातून तृप्ती मिळायला हवी. पुरुषार्थाच्या प्रत्येक टप्प्यावर तृप्ती मिळाली पाहिजे. नाहीतर आपण थकतो, नाउमेद होतो. 

‘सीता’ ही तृप्तीचं प्रतीक आहे. तिचा संबंध सेरेब्रल कॉर्टेक्स (मेंदूचा उच्चतम भाग) आणि त्याच्या पोषणासाठी लागणाऱ्या विशिष्ट शर्करेशी (ग्लुकोज) आहे. हिच शर्करा मिळाली नाही, तर मनुष्याचा पुरुषार्थच संपतो. आपला मेंदू, आपलं मन, हे समाधानाच्या (तृप्तीच्या) शक्तीवरच चालतं. 

तृप्ती मिळाली नाही की माणूस खोट्या अपेक्षांमध्ये, तुलनेत अडकतो, आणि अशावेळी खोटी किंवा अपूर्ण तृप्ती निर्माण होते – जी विकृती आणि दुर्बळतेकडे घेऊन जाते.

 

७. रामरक्षा स्तोत्रमंत्र – तृप्ती आणि पुरुषार्थ जागवणारा 

रामरक्षा स्तोत्रमंत्र हे "मंत्र" या शब्दाच्या अर्थाशी निगडित आहे. ज्याचं चिंतन केल्यामुळे जो रक्षण करतो तो मंत्र. मंत्र म्हणजे जो मनोमयपण आहे आणि प्राणमयपण आहे, तो मंत्र आहे. 

जेथे मन आणि प्राण एकत्र येतात, तिथेच पुरुषार्थ म्हणजे प्रयत्न व यश शक्य होते. रामरक्षा हे स्तोत्रमंत्र आहे – जे पुरुषार्थ घडवते आणि तृप्ती देते. 

बापूंनी तृप्तीतून पुरुषार्थ, पुरुषार्थातून तृप्ती याचे सुंदर उदाहरण देताना म्हणाले, ’पाऊस पडल्यावर जमिनीत तृप्ती निर्माण होते, मग ती बीजांना उगवते, झाडं तयार करते. ती झाडं तिला सावली देतात, तापमान नियंत्रणात ठेवतात आणि इतरांनाही उपयोगी पडतात. केवळ स्वतःपुरती तृप्ती म्हणजे अपूर्णता; खरी तृप्ती ही इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणारी असते. 

सीता ही तृप्तीची शक्ती आहे, तर राम म्हणजे पुरुषार्थ. तृप्तीमुळेच पुरुषार्थ शक्य होतो आणि पुरुषार्थामुळेच खरी तृप्ती प्राप्त होते.

 

८. रामरक्षा – आळस नष्ट करणारी आणि प्रेरणा देणारी 

बापूंनी सांगितले की रामरक्षा स्तोत्राच्या पठणामुळे आपली तृप्ती वाढायला लागते आणि ही पुरुषार्थ वाढवणारी तृप्ती आहे. ही तृप्ती आळस घालवते, प्रेरणा देते आणि मनोबल वाढवते. 

या स्तोत्राच्या प्रभावाने आपली कार्यक्षमता वाढते आणि राम म्हणजेच सर्व प्रकारच्या पुरुषार्थांचा मूळ स्रोत प्राप्त होतो. 

जर एखादा साधा माणूस ज्याला अध्यात्मही नीट कळत नाही तो मनापासून रामरक्षा म्हणायला लागला, तर त्याच्या मनातला आळस आपोआप निघून जातो. त्याला काम करायची प्रेरणा मिळते. फक्त रामरक्षा म्हणताना, भक्ती करताना तुलना करू नये. कारण तुलना झाली की तृप्ती गेली. तृप्ती आणि पुरुषार्थ या दोघांचं नातं सतत परस्परपूरक असून, सीतेशिवाय राम आणि रामशिवाय सीता असणे हे शक्य नाही. रामरक्षा स्तोत्रमंत्रात हीच ‘सीता’ म्हणजे तृप्ती कार्यरत असते, तर ‘राम’ म्हणजे पुरुषार्थ – ऊर्जा, ओज. 

सद्गुरु अनिरुद्ध सांगतात की आयुर्वेदानुसार सीता ही शांत-स्निग्धता म्हणजेच तृप्ती, तर राम म्हणजे उष्ण-स्निग्धता म्हणजेच म्हणजेच पुरुषार्थ (म्हणजेच उर्जा) यांचे प्रतीक आहेत. 

रामनाम म्हणजे ओज निर्माण करणारी शक्ती, ओज देणारी शक्ती. ओजाचा मुळ स्त्रोत राम आहे. ओजाशिवाय तृप्ती नाही आणि तृप्तीशिवाय ओज नाही. रामरक्षा स्तोत्रमंत्राच्या पठणानेच या दोन्ही गोष्टी मला मिळू शकतात.

 

९. रामरक्षा स्तोत्राची निर्मीती - बुधकौशिक ऋषी 

बापू स्पष्ट करतात की राम मिळवायचा असेल तर आधी तृप्ती – म्हणजे सीता आवश्यक आहे. रामरक्षा स्तोत्र हे तृप्ती आणि पुरुषार्थ, दोघांनाही जागृत करतं. आणि हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींनी अतिशय तृप्त अवस्थेत, सर्व जीवांच्या कल्याणासाठी लिहिलं. बुधकौशिक ऋषी पूर्ण तृप्त होते आणि आणि या तृप्तीमुळेच त्यांना सपूर्ण विश्वासाठी पुरुषार्थ करायची इच्छा झाली आणि रामरक्षा हा स्तोत्रमंत्र उत्पन्न झाला. म्हणूनच त्यातून मिळणारी तृप्ती आणि पुरुषार्थ हे अतुलनीय आहेत. 

  

संपूर्ण प्रवचन मराठी मध्ये येथे पाहू शकता :- 

https://www.youtube.com/watch?v=9ybzoYlfaKk 

  

संपूर्ण प्रवचन हिंदी मध्ये येथे पाहू शकता :- 

https://youtu.be/KK3ZlNxMWzY?si=25-oulSELdAUQYOA