प्रपत्ती - आप्पत्ती निवारण करणारी शरणागती... (Prapatti)

मागच्या वर्षीप्रमाणे, याही वर्षी , परम पूज्य नंदाईंच्या मार्गदर्शनाखाली, हॅपी होममध्ये, श्रीमंगलचण्डिका प्रपत्तीची धावपळ सुरू झालेली पाहिली.

नंदाई, तेथील काही श्रद्धावान स्त्रियांशी बोलत असताना म्हणाल्या, ‘तयारीची सुरुवातच आपण रामराज्याच्या पुस्तकात बापूंनी प्रपत्तीबद्दल सांगितलेली माहिती वाचूनच करुया. म्हणजे बापूंना काय अपेक्षित आहे ते आपल्याला नीट कळेल. दरवर्षी प्रपत्तीच्या आधी ही माहिती सर्व श्रद्धावान स्त्रियांनी वाचली म्हणजे त्यांना बापूंची भूमिका नीट समजून घेता येईल.

....आणि तेव्हाच मला आठवण झाली रामराज्याच्या प्रवचनाची, तो दिवस होता, ६ मे २०१०. त्या वेळेस परम पूज्य बापू म्हणाले, ‘‘आता महत्त्वाची गोष्ट सुरु होत आहे आणि ती म्हणजे श्रीचण्डिका उपासना... रामराज्य आणण्यासाठी ही चण्डिका महत्वाची भूमिका निभावते. ह्या चण्डिकेच्या कृपेनेच सर्वकाही होणार आहे.हिची उपासना केल्यामुळेच अशुभाचा नाश होतो, तसच अशुभ दूर होतं आणि यश व पराक्रम मिळत राहतात आणि अबाधित राहतात. ’’ त्या वेळेस परम पूज्य बापूंनी पहिल्यांदा प्रपत्तीविषयी सांगितले. प्रपत्तीचा सरळ सरळ अर्थ आहे आपत्ती निवारण करणारी शरणागती. पुरूषांसाठी श्रीरणचण्डिकाप्रपत्ती तर स्त्रियांसाठी श्रीमंगलचण्डिका प्रपत्ती. पुरूषांची प्रपत्ती श्रावण महिन्यात असते व स्त्रियांची आता संक्रांतीच्या दिवशी. म्हणूनच नंदाईची सगळी धावपळ सुरू होती.

माहिती वाचून झाल्यावर नंदाई म्हणाल्या... ‘‘ज्याप्रमाणे सप्तमातृका पूजन आपण आपल्या बाळांच्या संरक्षणासाठी करतो, त्याचप्रमाणे आपण प्रपत्ती करतो ती संपुर्ण कुटुंबाच्या संरक्षणासाठी. आपल्याला आपल्या कुटुंबाची संरक्षक बनविते ती आपली महिषासुरमर्दिनी चण्डिका म्हणजे आपली मोठी आईच.’’ नंदाई पुढे म्हणाल्या, ‘‘ज्याप्रमाणे बापू सांगतात की, विठ्ठलाच्या वारीला जाताना मनात विठ्ठल हवा त्याचप्रमाणे प्रपत्ती करताना आपल्या सर्वांच्या मनात ‘‘आपली मोठी आईच’’ असू देत.’’

पूजेची मांडणी करताना, पूजेची सजावट करताना, पूजनाची ताटे भरताना, आरती करताना, फुलं वाहताना, प्रदक्षिणा घालताना अगदी प्रत्येक कृती करताना आपण मनाने मोठ्या आईजवळ असायला हवे, एवढेच नव्हे तर घरी गेल्यावर प्रसादाचे सांबार बनविताना, आपल्या कुटुंबियांबरोबर बसून हा प्रसाद ग्रहण करताना हा ‘मोठ्या आईचा‘ प्रसाद आहे हा भाव प्रत्येकीच्या मनात असायला हवा. देव भुलतो तो आपल्या भावालाच ’.

श्रीमद्पुरूषार्थग्रंथातसुद्धा बापू आपल्याला हेच सांगतात, -

*- भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आधी भगवंतावर विश्‍वास असावा लागतो व त्याच्यावर प्रेम असावे लागते.

*- भगवंताच्या प्रतिमेचे पूजन हा आपले प्रेम पवित्र व सुसंस्कृत पद्धतीने व्यक्त करण्याचा सर्वात सोपा व प्राचीन मार्ग आहे. *- भगवंताच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करताना दर्शन, पूजन, चरणस्पर्श, ध्यान व जवळीक अशी पाच साधने आपोआपच घडत असतात.

- श्रीमद्पुरूषार्थ: तृतीय: खण्ड: आनन्दसाधना , पान क्र. ६२, पूजन (प्रतिकोपासना)

नंदाई पुढे त्या स्त्रियांना म्हणाल्या, ‘‘मांडणी हा एक उपचार आहे. तो जसा बापूंनी सांगितला आहे त्याप्रमाणे व्हायला हवा. प्रसन्नता निर्माण होईल इतपत आकर्षक मांडणी असायला हवी. पण त्याचं अवडंबर ही होता कामा नये. त्याचबरोबर आज आमची ‘‘मोठी आई‘‘ येणार आहे ती फक्त आमच्यासाठी; आईच्या हातातली शस्त्र फक्त आमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आहेत; हीच मला माझ्या कुटुंबाची संरक्षक बनविणार आहे; ही भावना, ही आर्तता आपल्या प्रत्येकीमध्ये असायला हवी. आपल्याला ‘मोठ्या आईशी‘ संवाद साधता आला पाहिजे. तिचे प्रेमाने आणि आर्ततेने नामस्मरण करता आले पाहिजे. ’’

पूजन उपचारामध्ये अनवधानाने काही चुकले तर घाबरून जाऊ नका हे सांगताना बापू श्रीमद्पुरूषार्थ ग्रंथात म्हणतात, परमेश्‍वर सदैव प्रत्येकाचे स्मरण व चिंतन न चुकता करतो. म्हणून त्याला भगवंताचे स्मरण व चिंतन करणारे मानव आवडतात. त्यांच्या चुकांना तो क्षमा करतो. - श्रीमद्पुरूषार्थ: प्रथम: खण्ड : पान क्र. ६६

नंदाई पुढे म्हणाल्या, ‘ प्रत्येक श्रद्धावान स्त्री ही वीरा आहे व ती तिच्या कुटुंबाची संरक्षक व्हायला हवी. ‘’मोठ्या आईला’’ आपण सर्वांनी खूप प्रेमाने शरण जाऊया आणि तिचा कृपाशिर्वाद प्राप्त करूया. ’ ‘‘...प्रपंच आणि आध्यात्म ह्या दोहोंमध्ये रामराज्य आलं पाहिजे. आमचं बेस्ट झालं पाहिजे, बेस्टेस्ट झालं पाहिजे.’’ हे बापूंच रामराज्याच्या प्रवचनातील वाक्य मला आठवलं. त्या प्रवचनात बापू म्हणाले होते की, रामराज्य फक्त मनापुरते सीमीत नसून, शरीर-मन-प्राण आणि बुद्धी ह्या सर्व स्तरांवर रामराज्य येणे आवश्यक आहे. आणि ह्यासाठी बापूंनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन आपल्याकडून व्हायला हवे. उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर पाणी पिणे, रोज शताक्षी प्रसादम घेणे, कढीपत्त्याची पाने खाणे, सूर्यप्रकाशात चालणे, फळं खाणे हे केल्यानेच आपण बापूंबरोबर रामराज्यात जाणार आहोत. तसेच बापूंनी इंग्लिश ही आपली वैश्‍विक भाषा प्रभावीपणे वापरता येण्यासाठी  'अनिरुद्धाज इन्स्टिट्युट ऑफ लॅन्ग्वेज ऍन्ड लिंग्विस्टिक्स' ही संस्था स्थापन केली. ह्या इन्स्टिट्युट्च्या प्रमुख, डॉ. सौ नंदा अनिरुद्ध जोशी ह्यांनी हॅपी इंग्लिश स्टोरीज हा आठ पुस्तकांचा संच स्वत: लिहिला की ज्यामुळे प्रत्येक सामान्य माणसाचं इग्लिंश अधिक प्रभावी होऊ शकेल. तसेच ,बापूंनी आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये अप टू डेट करणारी आणि स्पेशल आणि जनरल नॉलेज देणारे नियतकालिक म्हणजेच जर्नल्स, एक्सपोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स ह्या प्रोजेक्टद्वारा सुरू केली आहेत व त्याचं पब्लिशिंग डिसेंबर २०१२ पासून नियमीत चालू झाले आहे. (http://www.aanjaneyapublications.com). ह्या साईटवरून आपण ही सर्व जर्नल्स ऑनलाईन पर्चेस करू शकतो. सोशल मिडिया ह्या क्षेत्रात आपल्याला अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी आणि अधिक सुशिक्षित बनविण्यासाठी बापूंनी १ जानेवारी २०१४, चा प्रत्यक्ष ‘‘सोशल मिडिया - परिपूर्ण व परिपक्व वापर’’, हा विषय धरून लिहिला. जगावर अधिराज्य गाजविणार्‍या सोशल मिडियाचे प्रगल्भतेने, कल्पकतेने आणि जबाबदारीने हाताळण्याचे सामर्थ्य ह्या अंकाचे वाचन केल्यावर प्रत्येकाला मिळेलच ह्यात वाद नाही.

ह्या सर्व वैयक्तिक उत्कर्षाबरोबरच ग्रामविकास झाल्याशिवाय रामराज्य ह्या भारतामध्ये  अवतरू शकत नाही असे बापू ठामपणे सांगतात आणि त्यासाठी बापूंनी 'अनिरूद्धाज इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास' ही संस्था स्थापन केली. शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी बापूंनी विविध योजना अंमलात आणायला सुरूवात केली.

संपूर्ण रामराज्याच्या प्रवचनाबद्दल लिहायचे झाले, तर कितीही लिहिले तरी कमीच. ह्यासाठी आवश्यकता आहे ती वरचेवर रामराज्याचे पुस्तक आपण वाचण्याची आणि त्यातील बापूंनी सांगितलेल्या गोष्टींचे मनोमन पालन करण्याची. मग बापू आणि त्यांची आई, मोठी आई महिषासूरमर्दिनी आपल्यावर कृपा करायला तत्पर असणारच आहेत.

माझ्या डोळ्यासमोर आला तो १ जानेवारी, २०१४ चा आपल्या परम पूज्य बापूंचा दैनिक प्रत्यक्ष. काळाच्या बरोबर न चालता येणं ही एक मोठी आपत्तीच नाही का? पण ह्या आपत्तीला बापूंच्या लेकरांना तोंड द्यायला लागू नये ह्यासाठीच बापूंनी तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर अधिकाधिक व्यापक होत चाललेल्या सोशल मिडियाचा परिपूर्ण व परिपक्व वापर करण्यासंबंधी माहिती दिली आहे. ह्या माहितीचा वापर करून प्रत्येक श्रद्धावान वैयक्तिकरित्या ह्यातील प्रत्येक गोष्ट शिकू शकतो आणि समाजाच्याबरोबरीने स्वत:चा विकास साधू शकतो.

“हरि ॐ”

“श्रीराम”

“अंबज्ञ”

বাংলা