नव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत - २ (Hemadpant)
हेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती? तर अतिशय उद्विग्न.
इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत शिरडीस (Shirdi) जाण्याचे निश्चित ठरवतात. शिरडीला जायचं ठरतं, पण अचानक एक गोष्ट घडते, मनामध्ये विकल्प येतो. हेमाडपंतांच्या मित्राचा मुलगा अचानक निवर्ततो. हेमाडपंत मुद्दाम मुलाविषयी थोडक्यात लिहितात. (१) त्यांच्या मित्राचा मुलगा एकुलता एक आहे. (२) शरीराने सुदृढ आहे. (३) गुणवंत आहे. (४) तो शुद्ध हवेच्या ठिकाणी (लोणावळ्यात) असताना ज्वराक्रांत झाला. (५) सगळे मानवी उपाय केले जातात. म्हणजेच मुलात किंवा भोवतालच्या परिस्थितीतही दोष काढण्यासारखे काहीही नसतानाही मुलाचा मृत्यू होतो आणि म्हणूनच हेमाडपंत शब्द वापरतात – ‘प्रारब्धकर्मप्राबल्यता’. (संदर्भ अ. २/ओ. १०९) म्हणजेच अनेक उपाय केले जातात, देव-देवतांना नवस केले जातात. त्या मित्राच्या गुरुंनाही मुलाच्या जवळ आणून बसवलं जातं. तरीही मुलाचा मृत्यू होतो आणि मग उद्विग्न मनःस्थितीतील हेमाडपंतांसमोर प्रश्न उभा राहतो की गुरुची हीच उपयुक्तता का? कर्मामध्ये, नशीबामध्ये माझ्या जे आहे, ते होणारच असेल तर गुरुची आवश्यकता काय? एक मोठा विकल्प येतो.
हेमाडपंत पुढे म्हणतात की यामुळे शिरडीला जाण्याच्या माझ्या निश्चयात मोडता पडला. या मनःस्थितीत गुरुविषयी लिहिताना हेमाडपंत म्हणतात - (१) हाच ना लाभ गुरुचे संगती! (मित्राच्या मुलाचा मृत्यू) (२) गुरु काय करिती कर्मासी – (प्रारब्धकर्मप्राबल्यता) (३) नशिबात असेल तेच घडणार असेल तर गुरुवीण काय अडणार आहे? (४) गुरुच्या पाठीमागे जाऊन उगीचच आपला सुखातील जीव दुःखात का पाडा? (५) यदृच्छेने जे जे घडणार असेल, ते ते सुख वा दुःख भोगू – गुरुच्या कडे जाऊन काय होणार आहे? अशाही स्थितीत हेमाडपंत स्पष्ट करतात - जयाचे जैसे अर्जित| नको म्हणता चालून येत| होणारापुढे काहीही न चालत| नेले मज खेचीत शिरडीसी॥ (संदर्भ अ. २/ओ. ११४) ‘सांगू एकदा सांगू दोनदा’ या नियमाने साईनाथांच्या इच्छेने हेमाडपंतांना काकासाहेब दीक्षितांच्या कडून निरोप येतो. मार्ग दाखवला जातो; पण स्वतःच्या कृतीने – विकल्पाने हेमाडपंत शिरडीस जाण्याचे टाळतात. पण कृपाळू ‘दयाघन’ साईनाथ पुन्हा एकदा वेगळा प्रसंग घडवून आणतात; आता साईनाथांच्या लीलेने नानासाहेब चांदोरकरांकडून हेमाडपंतांना मार्ग दाखवला जातो, पण कसा? तर चांदोरकर दादर स्टेशनवर बसले असताना त्यांना त्या ‘बुद्धिस्फुरणदात्या’ साईनाथांकडून अशी प्रेरणा होते की की वसईला जायला अवकाश आहे; मध्ये एक तासाचा अवधी आहे. तर हा एक तास एका कामास लावूया. (लावू की कामास एकादिया – संदर्भ अ.२/ओ.११६)
अशी साईनाथांची स्फूर्ती होताच दादर स्टेशनवर एक गाडी येते; केवळ वांद्र्याकरिता आणि मग नानासाहेब त्या गाडीत बसून वांद्र्यास येतात व मग नानासाहेब हेमाडपंतांकरता (Hemadpant) निरोप पाठवतात. म्हणजेच काय (१) नानासाहेबांच्या मनात ‘काम’ कुठलं करायचं आहे हे स्पष्ट आहे. (२) नानासाहेबांकडे हेमाडपंतांना निरोप पाठवण्याची व्यवस्था आहे. (३) साईनाथांच्या लीलेने, जिथे निरोप पाठवला जातो, तेथे हेमाडपंत आहेत. (४) त्यावेळेस हेमाडपंता नानासाहेबांना त्वरित भेटायला येण्याच्या स्थितीत आहेत – जर उशीर झाला असता तर नानासाहेब भेटू शकले नसते.
म्हणजेच सद्गुरुमाऊली कशाप्रकारे घटना घडवून आणू शकते, ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. इथे हेमाडपंत अजून साईनाथांचे भक्त झालेले नाहीत; साईनाथांना भेटलेलेही नाहीत, फक्त काकासाहेब दीक्षितांकडून साईनाथांची महती कळली आहे व नानासाहेब चांदोरकरांनी कशासाठी बोलावून घेतलं आहे याचीही कल्पना नाही; म्हणजेच सद्गुरु भक्तांचे पूर्वजन्म जाणून अशी रचना करतात, प्रसंग घडवून आणतात, अशी परिस्थिती निर्माण करतात की त्याला सद्गुरुकडे जाण्याची ‘सुसंधी’ प्राप्त होते; पण निर्णय त्या त्या भक्तालाच करावा लागतो. प्रथम संधी होती, तेव्हा हेमाडपंतांकडून ती नाकारली गेली.
म्हणून साईनाथांनी दुसरी संधी देताना ‘प्रांताधिकारी’ असलेल्या नानासाहेबांकडून हेमाडपंतांस शिरडीच्या कथा ऐकवल्या. हेमाडपंतांनीही मोकळ्या मनाने, प्रांजळपणे नानासाहेबांची आतूरता बघून अत्यंत शरमेने मनाची झालेली चंचलता नानासाहेबांना निवेदन केली. साईनाथांच्या स्फूर्तीने नानासाहेबांनी अत्यंत तळमळीने, प्रेमाने हेमाडपंतांच्या सर्व शंकांचे निरसन करून, हेमाडपंतांकडून ‘तत्काळ निघतो’ असे वचन घेतले. एवढेच नाही, तर असे वचन घेऊनच नानासाहेबांनी तेथून प्रयाण केले. (संदर्भ अ.२/ओ.१२२) हीच ती साईनाथांची लीला.