सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग १२

संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १४०२ व १४०३.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू तुलसीपत्र - १४०२ या अग्रलेखामध्ये लिहितात,
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने कैलाशाच्याही भूमीपासून आठ अंगुळे उंचीवर उभी असणाऱ्या नववी नवदुर्गा सिद्धिदात्रीच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले आणि मग भगवान त्रिविक्रमास व आदिमातेस साष्टांग प्रणिपात करून ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांस तिच्याऐवजी येऊन बोलण्याची विनंती केली.
ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांनी आदिमातेची अनुज्ञा घेऊन पुढे येऊन बोलण्यास आरंभ केला, “हे सर्व उपस्थित ज्येष्ठ व श्रेष्ठ श्रद्धावानहो! ज्येष्ठ ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने पुढील भाग समजावून सांगण्याचे कार्य माझ्यावर सोपविले, ह्याबद्दल मी तिचा ऋणी आहे. कारण तिच्यामुळेच तर मी महागौरी ते सिद्धिदात्री ह्या प्रवासाचा साक्षीदार बनू शकलो.
पार्वतीच्या ‘महागौरी' स्वरूपाने घनप्राण गणपतीस जन्म दिल्यानंतर, ती आता सहजपणे सर्व विश्वातील घनप्राणाची माता झाली -
- अर्थात ‘महागौरी' रूपाने ही भक्तमाता पार्वती विश्व बनविणाऱ्या, विश्वात असलेल्या व विश्वात बदलत राहणाऱ्या सर्व प्रकारच्या अणूरेणूंमधील कार्यशक्ती व प्रभावशक्ती बनली.
- अर्थात मानव जो आहार घेतो, त्या आहारातील शक्ती तीच,
मानव जी भक्ती करतो, त्या भक्तीमधील शक्तीही तीच,
मनुष्य जे जे विचार करतो, त्या विचारांमधील ऊर्जाही तीच (मात्र ‘वाईट विचारांची ऊर्जा' म्हणून हिचे अस्तित्व कधीच नसते, उलट वाईट विचारांची शक्ती म्हणजे पार्वतीच्या शक्तीचा अभाव)
व हीच गोष्ट मानवाच्या आचाराची व विहाराची आहे.
तसेच मनुष्य डोळ्यांनी जे पाहतो, कानांनी जे ऐकतो, नाकाने जो गंध अनुभवतो, त्वचेने जो स्पर्श अनुभवतो व जिभेने जो स्वाद ग्रहण करतो, हे सर्व अनुभव स्मृती बनून मानवाच्या मनात साठविले जात असतात.
परंतु त्यातही ‘पवित्र' व ‘अपवित्र' हे दोन विभाग असतातच - पवित्र गंधाची, स्पर्शाची शक्ती पार्वतीचीच आहे, तर अपवित्र गंधाची, चवीची, स्पर्शाची शक्ती म्हणजेच पार्वतीच्या शक्तीची अनुपस्थिती;
आणि म्हणूनच मानव जेव्हा आपल्या कर्मस्वातंत्र्याचा वापर करून चुकीच्या गोष्टी करत राहतो, तेव्हा तेव्हा वृत्रासुर जन्माला येत राहतो - कधी केवळ फक्त त्याच्या जीवनात किंवा कधी संपूर्ण समाजजीवनात.
अशी ही पार्वती ‘स्कन्दमाता' व ‘गणेशमाता' म्हणून ‘महागौरी' बनताच तिने अत्यंत उत्साहाने, अगदी कानाकोपऱ्यातील प्रत्येकाला चांगली द्रव्यशक्ती (पदार्थशक्ती), कार्यशक्ती, तसेच घनप्राण अर्थात कार्यबल व कार्यप्रभाव मिळावा म्हणून अनेकविध प्रयोग करण्यास सुरुवात केली.
शिवशंकर आपल्या प्रिय धर्मपत्नीचे हे करुणाकार्य बघून अत्यंत समाधानी व आनंदित झाले
आणि त्यांनी तिच्या ह्या कार्याशी आदिमातेच्या प्रेरणेने स्वतःला जोडून घेतले.
‘अर्धनारीनटेश्वर' ह्या रूपाच्या निर्मितीमागे, हे कार्य हीदेखील एक प्रमुख प्रेरणा होती.
अशा रितीने ‘महागौरी' स्वरूप शिवाशी ‘भेद-अभेद' ह्यांवर मात करून एकरूप झाले, तेव्हाच त्या ‘महागौरी' ह्या मूळ रूपाला आदिमातेने आपल्या तेजाने न्हाऊ घातले
व तिला अत्यंत प्रेमाने, कौतुकाने, वात्सल्याने आपल्याघट्ट मिठीत घेतले.
त्यावेळेस महागौरीचे तीनही पुत्र तिचा पदर धरूनच उभे होते - दोन बाजूंस गणपती व स्कन्द आणि पाठीमागून ज्येष्ठ पुत्र वीरभद्र;
आणि परमशिव तर जोडलेलाच होता
आणि ज्या क्षणाला आदिमाता चण्डिकेने आपल्या अधरांनी (ओठांनी) आपल्या लेकीच्या मस्तकाचे चुंबन घेतले, त्या क्षणी ‘सर्वशक्तिसमन्विता', ‘सर्वसिद्धिप्रसविणी' आणि ‘सर्वकारणकारिणी' ही आदिमातेची तीनही तत्त्वे पार्वतीमध्ये प्रवाहित झाली
व त्यातूनच नववी नवदुर्गा ‘सिद्धिदात्री' अवतीर्ण झाली आणि आदिमाता चण्डिकेच्या महासिद्धेश्वरी, कल्पनारहिता, सिद्धेश्वरी, चिदग्निकुंडसंभूता, ललिताम्बिका ह्या स्वरूपांशी तिचे एकत्व संस्थापित केले गेले
आणि ह्यामुळेच पार्वतीच्या जीवनप्रवासाचा हा नववा टप्पा आता चिरंतन बनला आणि ती स्वतः चिरंतना बनली.
हे उपस्थित आप्तगणहो! घनप्राण गणपतीच्या जन्माच्या खूप आधीपासूनच मी ‘माध्याह्ननंदि' बनून शिवाच्या सेवेत होतोच. परंतु ह्या महागणपतीच्या जन्माची वेळ येताच परमशिव ‘प्रातर्-नंदि'स बरोबर घेऊन तपश्चर्येस निघून गेला व मला पार्वतीचा सेवक म्हणून ठेवले गेले
आणि त्यामुळेच महागणपतीच्या जन्मानंतर पार्वती तिच्या कार्यास लागल्यावर तिने मलाच तिचा प्रमुख सहकारी म्हणून निवडले होते.

ती मला ‘सहकारी' म्हणायची, पण मी मात्र ‘सेवक'च होतो. जेव्हा तीनही पुत्रांना घेऊन शिव-पार्वती आदिमातेला एकांतात भेटण्यासाठी मणिद्वीपात गेले, तेव्हादेखील ह्या शिवपंचायतनाचे वाहन म्हणून माझीच निवड शिव-पार्वतीने केली
आणि म्हणूनच मी सिद्धिदात्रीची अवतारस्थिती प्रत्यक्ष पाहणारा एकमेव भाग्यवान श्रद्धावान बनलो.
हे सर्व श्रद्धावानजनहो! दोन्हीही नवरात्रींमध्ये ह्या नवदुर्गामंत्रमालेने पूजन करून, आदिमाता चण्डिकेची कृपा प्राप्त करून घेत रहा कारण ही नवदुर्गा सिद्धिदात्री अशा श्रद्धावानांना सदैव तिच्या अभयमुद्रेच्या सावलीतच ठेवते
व हे तिचे गुप्तकार्य मी आज प्रथमच देवाधिदेव त्रिविक्रमाच्या अनुज्ञेने श्रद्धावान विश्वासाठी प्रकट करीत आहे.”

बापू पुढे तुलसीपत्र - १४०३ या अग्रलेखामध्ये लिहितात,
ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांनी हे सुंदर रहस्य प्रकट केल्यानंतर तेथील सर्व उपस्थितांमध्ये नववी नवदुर्गा सिद्धिदात्रीच्या चरणांवर मस्तक ठेवण्याची तीव्र इच्छा व तळमळ उत्पन्न झाली. परंतु कोणीच पुढे येऊन तशी विनंती करावयास धजत नव्हता
आणि त्याला कारणही तसेच होते.
कारण स्वतः आदिमाता व त्रिविक्रमासहित इतर सर्व नवदुर्गासुद्धा कैलाशाच्या भूमीला पदस्पर्श करून उभ्या राहिल्या होत्या. अर्थात त्या सर्वांचे चरण कैलाशाच्या भूमीवर होते.
परंतु ही सिद्धिदात्री अशी एकमेव नवदुर्गा होती की जिचे चरण कैलाशाच्या भूमीपासून आठ अंगुळे वर होते.
ह्यामागील रहस्य अजूनही समजलेले नसल्यामुळे, ‘विनंती कशी करायची' हा प्रश्न पडणे स्वाभाविकच होते.
परंतु शेवटी न राहवून ब्रह्मर्षि अगस्त्य व ब्रह्मर्षि कश्यपांची नात अहल्या, पति ब्रह्मर्षि गौतमाच्या अनुज्ञेने विनयपूर्वक पुढे झाली व तिने दोन्ही हात जोडून ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांना विचारले, “हे नित्यगुरु ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य! आमच्या सर्वांच्याच मनात खरं तर नऊच्या नऊ नवदुर्गांना प्रणाम करण्याचे आहे. परंतु आदिमातेच्या बाजूला दिसणाऱ्या पहिल्या आठ नवदुर्गा आता अंतर्धान पावल्या आहेत व त्यावेळेसच नववी नवदुर्गा सिद्धिदात्री तिच्या हातातील सुवर्णकमलछत्र आदिमातेच्या मस्तकावर अधांतरी ठेवून पुढे येऊन उभी राहिली आहे.
आम्हां सर्वांना तिच्या चरणांवर मस्तक ठेवायचे आहे. परंतु हिच्या हातातील सुवर्णकमलछत्रही आदिमातेच्या मस्तकावर अधांतरी आहे व हिचे स्वतःचे चरणही कैलाशाच्या भूमीला जराही स्पर्श न करता अधांतरीच आहेत.
हे सर्व पाहिल्यामुळे, हिचा पदस्पर्श मागावा की नाही, हेच आम्हाला कळत नाही. आता तुम्हीच आम्हाला कृपया मार्गदर्शन करावे.”
ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांनी अत्यंत कौतुकाने अहल्येकडे पाहिले व म्हणाले, “हे महामती अहल्ये! जे प्रश्न तुझ्यापेक्षा तपाने, वयाने, ज्ञानाने, विज्ञानाने श्रेष्ठ असलेले महर्षि व महामती विचारण्यास धजू शकले नाहीत, ते तू अत्यंत सहजतेने विचारू शकलीस.
हा तुझा प्रांजळ स्वभाव व बालबोध वृत्ती ह्या दोनच तुझ्या खऱ्या ताकदी आहेत. हे अहल्ये! गणपतीच्या जन्मानंतर त्याच्या ‘घनप्राण' म्हणून कार्याची सुरुवात लगेचच होणार होती व त्यासाठीच परमशिवांचा दूत म्हणून, शिष्य म्हणून, वाहन म्हणून माझी निवड पार्वतीने केली होती.
परंतु माझी ही निवड होताच, स्वतःच बुद्धिदाता असणाऱ्या गणपतीच्या अध्यापनाचीही सोय बघायची होती, ह्यामुळे मी विचारात पडलो होतो व नेहमीप्रमाणे प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी ज्येष्ठ भगिनी लोपामुद्रेकडे गेलो.
लोपामुद्रेने माझे सर्व विचार ऐकून घेतले व ती मला म्हणाली की - ‘जराही चिंता करू नकोस. तुला जी चिंता वाटत आहे तीसुद्धा आदिमातेचीच प्रेरणा आहे.
कारण गणपतीचा जन्म झाल्यानंतर ज्याक्षणी महागौरी गणपतीस अध्ययनासाठी तुझ्या हातात सोपवेल, त्याचक्षणी तुझी ही चिंता आपोआप नाहीशी होणार आहे -
- कारण हा घनप्राण गणपतीच खराखुरा व एकमेव चिंतामणि आहे
व त्याचे हे चिंतामणिकार्य तुझ्यापासूनच सुरू होईल.'
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने असे आश्वासित केल्यामुळेच मी ही जबाबदारी स्वीकारली व सिद्धिदात्रीच्या अवतरणाचा एकमेव साक्षीदार बनलो
आणि त्यामुळे छत्र अधांतरी राहू शकणे व सिद्धिदात्रीने पवित्र कैलाशावरसुद्धा चरण न ठेवणे, ह्यामागील मर्म मला अवगत आहे.
हे अहल्ये! सिद्धिदात्रीचे पवित्र कार्य निरंतर चालूच असते. पार्वतीच्या ह्या रूपाला काळाचेही बंधन नाही व स्थळाचेही बंधन नाही.
‘सत्ययुगाचा उत्तरार्धसुद्धा जेथे दुर्विचारांनी, दुर्गुणांनी, दुष्कर्मांनी, दुर्मांत्रिकांनी व आसुरी वृत्तींनी भारला जाऊ शकतो, तर मग इतर युगांचे काय?' - हा सर्व महर्षिंना, ऋषिंना व ऋषिकुमारांना पडलेला प्रश्न येथेच आपले उत्तर मिळवितो.
आदिमातेने हे ‘सिद्धिदात्री' रूप असे घडविले आहे की जिला स्थळाचेही बंधन नाही,
ह्याचाच अर्थ, जेथे १) दुष्कर्म २) दुर्वासना ३) दुर्मंत्र ४) दुष्टदैवतपूजन व ५) कुविद्या ह्यांचा विनियोग करून ‘दुष्ट अभिचारकर्मे' अर्थात कुमंत्रसिद्धीने दुसऱ्यांचे वाईट करण्याची प्रक्रिया चालू असेल, त्या स्थळावर चण्डिकाकुलाच्या इतर सदस्यांना कधीच निमंत्रण नसेल; कारण त्यांना आवाहन करण्याने त्या दुष्ट लोकांच्या कार्यात अडथळा उत्पन्न होईल.
परंतु ह्या सिद्धिदात्रीस कुठल्याही स्थळी जाण्यासाठी व असण्यासाठी जराही बंधन नाही.
खरे तर इतर चण्डिकाकुल सदस्यांनाही हे बंधन नाहीच; परंतु हे सर्वजण, मानवाच्या कर्मस्वातंत्र्यावर आपल्याकडून बंधन येऊ नये म्हणून निमंत्रणाशिवाय, आवाहनाशिवाय वाईट स्थळी जात नाहीत - मात्र जर त्यांचा भक्त अशा स्थळी संकटात असेल, तर त्याने नुसती आठवण काढताच ते चण्डिकाकुलसदस्य तेथे प्रकट होतात.
परंतु ही सिद्धिदात्री एकमेव अशी आहे की हिला काळाचे व स्थळाचे बंधन नसल्यामुळे, हिला कर्मस्वातंत्र्याचेही बंधन नाही; कारण कुणाचेही कर्मस्वातंत्र्य हे स्थळ, काळ ह्यांच्यावरच अवलंबून असते
व ह्यामुळेच ही नवदुर्गा सिद्धिदात्री अशा गलिच्छातल्या गलिच्छ ठिकाणीसुद्धा अगदी तशा दुष्ट प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीपासूनच घट्टपणे उभी असते - कुठल्याही स्थळाला वा वस्तूला वा पदार्थाला वा जिवाला स्पर्श न करता.
कशासाठी?
सिद्धिदात्री कुठल्याही चण्डिकाविरोधी मार्गाला अर्थात देवयानपंथविरोधीमार्गीयांची, त्यांनी मिळविलेली कुठलीही सिद्धी त्रुटींसहित व अपूर्णच ठेवते व त्यामुळेच श्रद्धावानांचे संरक्षण होत राहते.
मात्र हे सर्व जे काही ती करते ते अगदी हवेलासुद्धा स्पर्श न करता; कारण ह्या तिच्या ‘श्रद्धावानांचे सहज संरक्षण' ह्या कार्याकरिता तिची प्रत्येक कृती अस्पर्श असणेच आवश्यक नाही काय?
हे अहल्ये! तू स्वतःहून प्रश्न विचारलास. त्यामुळे तिच्या चरणांना स्पर्श करण्याचा पहिला अधिकार तुझा व मग इतर प्रत्येकाचा.
हे अहल्ये! प्रणाम कर.”
महामती अहल्येने नवदुर्गा सिद्धिदात्रीच्या चरणांना स्पर्श करून त्यावर आपले मस्तक ठेवताच माता सिद्धिदात्रीने अहल्येला वरदान दिले, “हे प्रिय कन्ये अहल्ये! तुझा हा बालबोध स्वभाव सदैव असाच राहील व त्यातूनच प्रत्येक युगात तू महत्तर कार्ये घडवून आणशील.
हे अहल्ये! ‘चांद्रविद्या' अर्थात चंद्रविज्ञान तुला तुझ्या मातापित्यांनी अर्थात शशिभूषण व पूर्णाहुतिने शिकविण्यास सुरुवात केलेलीच आहे. त्या अध्ययनाचा विनियोग ‘सूर्यविज्ञान' अध्ययन करणाऱ्या तुझ्या पतीच्या गौतमाच्या कार्याला पूरक अशा रितीने करीत रहा.
ह्यातूनच प्रत्येक युगातील सर्वांत मोठ्या जागतिक युद्धांमध्ये ‘विजयशीला' तूच असशील.”