सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग १०        

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग १०        

Previoust Article 

हिंदी 

संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १३९८ व १३९९. 

 सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू तुलसीपत्र - १३९८ या अग्रलेखामध्ये लिहितात,

श्रीशांभवीमुद्रेचे सर्व वर्णन व त्याविषयीची सावधानता हे सर्व नीट जाणून घेतल्यानंतर सर्व शिवगण, ऋषिकुमार, ऋषि आणि चक्क महर्षिदेखील आपापसात चर्चा करून ज्येष्ठ ब्रह्मवादिनी लोपामुद्रेस विनंती करू लागले, “हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मवादिनी! आम्हाला श्रीशांभवीमुद्रेविषयी, आठवी नवदुर्गा महागौरीविषयी व तिने आम्हाला दिलेल्या अष्टदल श्वेतपुष्पांविषयी अधिक जाणून घेण्याची प्रबळ इच्छा होत आहे व ही इच्छादेखील आमच्या हाताला कायमच्या चिकटलेल्या ह्या श्वेतपुष्पाच्या सुगंधाने अधिकच वाढते आहे. आमच्यावर कृपा कर.”

ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने महागौरीची व आदिमातेची अनुज्ञा घेऊन बोलण्यास प्रारंभ केला, “होय! तुमची जिज्ञासा त्या श्वेतपुष्पामुळेच वाढत आहे.

श्रद्धावानांची व सज्जनांची आध्यात्मिक, वैज्ञानिक, कलाविषयक, व्यापारविषयक, कारीगरीविषयक, देशरक्षण-धर्मरक्षणविषयक, प्रापंचिक अशा सर्व क्षेत्रांतील जिज्ञासा उचित मार्गाने व उचित क्रमाने वाढविण्याचे कार्य ही आठवी नवदुर्गा महागौरी करीत असते.

कारण ह्या ‘महागौरी' रूपानेच, तिच्याच देहावर प्रत्यक्ष परमशिवाने केलेल्या सातव्या गंगेच्या लेपातूनच गणपतीचा जन्म झालेला आहे व हा गणपती विश्वाचा घनप्राण असून बुद्धिदाता, प्रकाशदाता व विघ्नहर्ता आहे.

मग ह्याची माता असणारी ही महागौरी आपल्या भक्तांना अर्थात श्रद्धावानांना गणपतीकडून सर्व वर मिळावेत अशी व्यवस्था करणारच ना! व म्हणूनच ही श्रद्धावानांच्या मनात चांगल्या व उपयोगी जिज्ञासा निर्माणही करते व त्या पूर्णही करून घेते.

प्रिय आप्तजनहो! ह्या एकाच पार्वतीचे हे अष्टमीचे रूप महागौरी, अशा रितीने कार्य करीत असल्यामुळेच नवरात्रींमध्ये अष्टमी तिथीचे महत्त्व सर्वत्र प्रख्यात आहे.

बहुतेक स्थानांवर व प्रदेशांमध्ये नवरात्रीतील अष्टमीच्या दिवशी होम, हवन, यजन, यज्ञ केले जातात, ते केवळ ह्याचसाठी - कारण पार्वतीच्या जीवनप्रवासामधील ही ‘महागौरी' स्थिती अर्थात टप्पा अर्थात रूप हे आधीच्या सात रूपांशीदेखील एकरूप आहे व पुढील नवव्या रूपाशीही एकरूप आहे

व ह्यामुळे अष्टमीला केलेले हवन नऊच्या नऊ नवदुर्गांना समानपणे प्राप्त होते,

तसेच ही महागौरी प्रकट झाली, तीदेखील अश्विन शुद्ध अष्टमीलाच.

अष्टमीच्या दिवशी केलेले हवन, पूजन, आनंदोत्सव, भक्तिनृत्य (गरबा इत्यादि) आणि रात्रीचे जागरण, आदिमातेच्या चरिताचे पठण (मातृवात्सल्यविन्दानम्‌‍), आदिमातेच्या कार्याच्या व गुणांच्या कीर्तनाचे श्रवण व पठण (मातृवात्सल्य उपनिषद) हे सर्वकाही स्वतः आदिमातेला व नऊच्या नऊ नवदुर्गांना अत्यंत प्रिय असते -

- किंबहुना अश्विन शुक्ल अष्टमी हा दिवस सर्व श्रद्धावानांसाठी मोठे वरदान आहे -

- श्रद्धावानांना ह्या नवरात्रीतील पूजनामुळे ह्या नऊच्या नऊ नवदुर्गा सहाय्यकारी बनतात व ही महागौरी व स्कन्दमाता आपापल्या पुत्रांसह सच्च्या श्रद्धावानाच्या घरातच आपली आशीर्वादमय स्पंदने वर्षभर प्रक्षेपित करीत राहतात

आणि म्हणूनच श्रद्धावानाने आपल्याला जमेल त्या प्रकारे व जमेल त्या प्रमाणात अश्विन नवरात्र व चैत्र नवरात्र हे दोन अत्यंत पवित्र उत्सव आपापल्या क्षमतेनुसार प्रेमाने, श्रद्धेने आनंदोत्सव करीत साजरे करावेत.

हे श्रद्धावानहो! जो जो श्रद्धावान ‘मातृवात्सल्यविन्दानम्‌‍' व ‘मातृवात्सल्य उपनिषद' ह्यांचे नियमित श्रद्धेने पठण करतो व प्रत्येक नवरात्रीत एकेका ग्रंथाचे पारायण करतो, त्याला ही महागौरी आठ वर्षांनी हे श्वेतपुष्प बहाल करते

व मग एकदा का ते श्वेतपुष्प श्रद्धावानाच्या हाताला चिकटले की ते कायमचेच.

कारण ते श्वेतपुष्प खरंतर त्या श्रद्धावानाच्या लिंगदेहालाच चिकटते

व त्यामुळे त्याच्या कुठल्याही जन्मात ते श्वेतपुष्प त्याच्यापासून अलग होत नाही.

आता प्रश्न हा की हे पुष्प अष्टदलांचेच का?

उत्तर आदिमातेच्या ‘शाकंभरी शताक्षी' अवताराने देऊन ठेवलेले आहे - मानवाला प्रपंच करायचा असो की अध्यात्म की दोन्हीही.

श्रीश्वासम् उत्सवात आदिमाता शताक्षीचे दर्शन घेताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू 

परंतु त्या प्रत्येक कार्यासाठी त्याला भौतिक, प्राणिक व मानसिक पातळीवरील अन्न, जल व वायू लागतातच

व मानवाच्या त्रिविध देहांना लागणारे अन्न, जल, वायू हे आदिमातेच्या अष्टधा प्रकृतीकडूनच येत असतात

व हे श्वेत अष्टदलपुष्प त्या अष्टधा प्रकृतीचेच वरदान आहे आणि तेसुद्धा श्वेत अर्थात पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र.”  

बापू पुढे तुलसीपत्र - १३९९ या अग्रलेखामध्ये लिहितात,

अशा रितीने नवरात्रीतील अष्टमी तिथीचे माहात्म्य व महागौरीने दिलेल्या श्वेत अष्टदलपुष्प ह्यांविषयी श्रद्धावानांना समजावून सांगितल्यानंतर ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने सर्व उपस्थित ब्रह्मर्षिंस व ब्रह्मवादिनींस, आदिमातेची अनुज्ञा घेऊन तेथील उपस्थितांच्या छोट्या छोट्या गटांना ‘श्रीशांभवीमुद्रा' प्रत्यक्ष करून दाखविण्याची विनंती केली.

प्रत्येक ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनी आपापल्या गटाला घेऊन वेगवेगळ्या जागी जाऊन बसले.

कोणी कोणाकडे जावयाचे, हे सद्गुरु त्रिविक्रमानेच सांगितले व कुठे बसायचे तेही सांगितले.

प्रत्येक शिवगण व ऋषिसमुदाय, त्यांना नेमून दिलेल्या जागी जाऊन बसताच आश्चर्याच्या महासागरात उसळ्या मारत पोहू लागला.

कारणही तसेच होते - प्रत्येक ब्रह्मर्षि वा ब्रह्मवादिनीच्या गटाच्या बाजूने एक एक गंगानदी वाहत होती.

प्रत्येक ब्रह्मर्षि वा ब्रह्मवादिनीच्या आसनाच्या मागे एक बहरलेला बिल्ववृक्ष होता

आणि मुख्य म्हणजे प्रत्येक गट इतर गटांचे दृश्यसुद्धा पाहू शकत होता.

केवढ्या गंगा! केवढे बिल्ववृक्ष! आणि कुठे कुठे पहायचे?

ब्रह्मवादिनी लोपामुद्रेकडे मात्र कुठलाही गट दिला गेला नव्हता. तिला तिचेच मार्गदर्शकाचे कार्य करावयाचे होते.

ब्रह्मवादिनी लोपामुद्रा अत्यंत विनम्र भावाने आदिमाता श्रीविद्येच्या चरणांपाशी जाऊन उभी राहिली, “हे सर्व श्रद्धावान आप्तगणहो! आता तुमचे सर्वकाही पाहून झाले आहे, तसेच त्याचे आश्चर्यही करून झाले आहे. त्यामुळे ह्या क्षणापासून मात्र आपापल्या गटाच्या सद्गुरुकडेच लक्ष केंद्रित करून रहा.

तुमचे गुरु तुम्हाला आज श्रीशांभवीमुद्रा प्रदान करणार नाहीत, तर फक्त तुमच्यासमोर प्रात्यक्षिक करून दाखविणार आहेत.”

ब्रह्मवादिनी लोपामुद्रेच्या सांगण्यानुसार तेथील प्रत्येक उपस्थित फक्त आपापल्या गुरुकडे पाहू लागला.

प्रत्येक ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनी अर्थात ‘ब्रह्मगुरु' आता पद्मासनात स्थिर झाले होते.

त्यांनी प्रथम दोन्ही हात जोडून दत्तगुरुंची व आदिमातेची प्रार्थना केली आणि मग ते आपापले डोळे बंद करून बसले.

त्यांची इतर कुठलीही हालचाल होत नव्हती - अगदी पापण्यांची व नाकपुड्यांचीसुद्धा;

व ह्यामुळे पापण्यांच्या आड काय चालले आहे, ते समोर बसलेल्या कुणालाही दिसू शकत नव्हते.

परंतु कैलाशावर व तेसुद्धा आदिमाता व त्रिविक्रमाच्या उपस्थितीत असे कसे काय घडू शकेल?

नाही! येथे अशा स्थितीत कुणीही श्रद्धावान कशाहीपासून वंचित राहूच शकत नाही. भगवान त्रिविक्रमाने प्रत्येक समूहाच्या बाजूने वाहणाऱ्या त्या त्या गंगेच्या जलाने लोपामुद्रेस प्रत्येक ब्रह्मगुरुच्या पापण्यांवर सिंचन करण्यास सांगितले.

त्याबरोबर अगदी प्रत्येकाला ब्रह्मगुरुंच्या पापण्या दिसत असूनसुद्धा, त्या पापण्यांमागील त्यांच्या डोळ्यांची हालचाल व्यवस्थित दिसू लागली.

त्या प्रत्येक ब्रह्मगुरुचे दोन्ही डोळे, त्यांच्या त्यांच्या दोन्ही भुवयांच्या पासून समान अंतरावर असणाऱ्या मध्यबिंदूवर केंद्रित झालेले होते

व त्यांच्या डोळ्यांतून अत्यंत पवित्र व शुद्ध भाव सौम्य व मृदु विद्युत्‌‍-शक्तीच्या रूपात त्यांच्या आज्ञाचक्राकडे वाहत होता

आणि त्याचबरोबर त्यांचे आज्ञाचक्र एका विलक्षण सुंदर तेजाने ओतप्रोत भरून वाहत होते

व त्या आज्ञाचक्रातूनही एक अत्यंत विलक्षण प्रवाह त्या ब्रह्मगुरुंच्या डोळ्यांमध्ये शिरत होता.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध के द्वारा प्रतिपादित श्रीशब्दध्यानयोग उपासना में रहनेवाली आज्ञाचक्र प्रतिमा

मात्र हा विलक्षण प्रवाह जलाचा वा विद्युतशक्तीचा नव्हता, तर अत्यंत सुंदर, सौम्य व शांत अशा आधी कधीही न बघितलेल्या अद्भुत प्रकाशाचा होता

व हा अद्भुत प्रकाशप्रवाह त्या ब्रह्मगुरुंच्या डोळ्यांत शिरून मग त्यांच्या त्रिविध देहातील ७२,००० नाड्यांमध्ये प्रवाहित होत होता

व ह्या प्रकाशामुळे त्या ब्रह्मगुरुंच्या शरीरातील प्रत्येक स्थूल पेशी अत्यंत तरुण, ओजयुक्त व शुद्ध होत होती व त्यांच्या मानसिक द्रव्याचा प्रत्येक कणही.

एवढ्यात सर्वांच्या कानांवर ‘ॐ श्रीदत्तगुरवे नमः' हा भगवान त्रिविक्रमाच्या आवाजातील मंत्र ऐकू आला आणि त्याबरोबर पापण्यांच्या आडून दिसणारे सर्वकाही अदृश्य झाले.

सर्व ब्रह्मगुरुंनी मात्र आपले डोळे उघडण्यास लगेचच सुरुवात केली नाही - जणूकाही त्यांनी त्रिविध देहात मिळविलेला तो दिव्य प्रकाश ते नीट साठवून ठेवीत होते.

भगवान त्रिविक्रमाचा ‘श्रीदत्तगुरवे नमः' हा जप चालूच होता व मग ब्रह्मर्षि अगस्त्यांनी प्रथम आपल्या पापण्या उघडल्या. त्यांच्या पाठोपाठ इतर सर्व ब्रह्मगुरुंनीही क्रमाक्रमाने आपापल्या पापण्या उघडल्या.

ते सर्व ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनी आता अधिकच तेजस्वी, अधिक तरुण, अधिक शक्तिमान व बलवान दिसत होते.

ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने सुहास्यवदनाने सर्वांना सांगितले, “श्रीशांभवीमुद्रेच्या साधनेमुळे प्रत्येक साधकाचा स्थूल देह, प्राणमय देह व मनोमय देह अशाच रितीने नेहमी नित्यनूतन व टवटवीत राहत असतो.

मात्र आज्ञाचक्रातून जो प्रकाश निघाला, तो कुठून आला, हे फक्त श्रीशांभवीविद्येच्या सतराव्या व अठराव्या कक्षेतच जाणता येते.

‘श्रीशांभवीमुद्रा सद्गुरु त्रिविक्रमाकडून प्राप्त करून घेणे' हेच प्रत्येक श्रद्धावानाच्या जन्मशृंखलेचे सर्वोच्च ध्येय असावे; कारण श्रीशांभवीमुद्रा प्राप्त झाल्यानंतर दुःख, भय, क्लेश ह्या गोष्टी पीडाच करत नाहीत व कितीही संकटे आली, तरीदेखील श्रद्धावान त्यातून तरून जातो.

हे उपस्थित श्रद्धावानहो! ही आठवी नवदुर्गा महागौरी आपल्या इतर आठ रूपांप्रमाणेच अत्यंत कृपाळू आहे.

प्रियजनहो! ‘ह्या नऊजणींमध्ये कोण जास्त कृपाळू किंवा कोण जास्त प्रभावी' असा विचार चुकूनही करू नका.

कारण प्रत्येकीचे मार्ग वेगळे असले, तरी प्रत्येकीचे प्रेम, कृपा व अनुग्रह सारखाच आहे.

कारण शेवटी ह्या नऊजणी म्हणजे एकच पार्वती आहे.”