न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा...(Nahu Tuzhiya Preme Aniruddha Premsagara)

Nahu Tuzhiya Preme Aniruddha Premsagara

।। हरि ॐ ।।

 

aniruddha-bapu-5
अनिरुद्ध बापू अभंगाला दाद देताना

 

’न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही "अलौकिक" प्रेमयात्रा सर्व श्रद्धावानांनी अनुभवली आणि मनाने अजूनही सर्वजण त्या दिवसाच्या आठवणींमध्ये जगत आहेत. या प्रेमयात्रेच्या महासत्संगाची सुरुवात झाली, रविवार दिनांक २६ मे २०१३ रोजी, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस् अकॅडमीच्या स्टेडियमवर. सकाळपासूनच श्रद्धावानांनी मैदान भरू लागलं होत. तळपत्या उन्हाची पर्वा न करता आबालवृद्ध श्रध्दावान या प्रेमयात्रेत सहभागी होण्यासाठी उत्सुक होते.

स्टेडियममध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होते, सर्वत्र झळकत असलेले ’न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा’ चे फलक, सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे मोठे कट आऊट्सआणि आद्यपिपादादा, मीनावैनी, चौबळ आजोबा, साधनाताई यांच्या तसबिरी.

सकाळी ११:३० वाजल्यापासून दुपारी ३:३० वाजेपर्यंत आजवर झालेल्या सर्व रसयात्रा, भावयात्रा व मोजके महत्त्वाचे उत्सव ह्यांमधील अविस्मरणीय व भक्तिमय क्षणांचा आनन्द श्रध्दावानांनी घेतला. जे श्रध्दावान या रसयात्रांचा आनंद अनुभवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही ’विशेष पर्वणी’ होती, तर जे श्रध्दावान ह्या रसयात्रा व भावयात्रांमध्ये सहभागी झाले होते, त्यांना पुन:प्रत्ययाचा आनन्द मिळत होता.

’आम्ही त्यावेळेस नव्हतो’ ही खंत आता कुणाही श्रध्दावानास नक्कीच असणार नाही कारण हे सर्व पाहताना मनाने हा सारा प्रवास श्रद्धावान करत होते. बापुंनी या विभिन्न यात्रा आणि उत्सवप्रसंगी केलेले मार्गदर्शन ऐकून श्रद्धावान समाधानी झाले होते.

दुपारी सव्वा दोन वाजता परमपूज्य बापू, नन्दाई आणि सुचितदादांचे आगमन झाले आणि त्यावेळी मैदान खचाखच भरून गेले होते. अनन्यप्रेमस्वरूप सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे आगमन होताच श्रद्धावानांमध्ये प्रेमाचे चैतन्य पसरले.

साधारण चारच्या सुमारास बापू, नन्दाई आणि सुचितदादा प्रेममंचाच्या (व्यासपीठाच्या) दिशेने जाऊ लागले, तेव्हा सर्व श्रद्धावानांनी ’हरि ॐ’ म्हणून त्यांना अभिवन्दन केले. बापुंनी प्रेममंचावरून सर्वांना हात हलवून ’हरि ॐ’ म्हटले आणि प्रेमयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. ’रामो राजमणि: सदा विजयते…’ या विजयमंत्राने ’न्हाऊ तुझिया प्रेमे’ या ’प्रेमयात्रेच्या’ सत्संगाची सुरुवात झाली.

पिपीलिकापथावरील आद्यपिपादादा, मीनावैनी, सुशीलाताई इनामदार, श्रीकृष्णशास्‍त्री इनामदार, लीलाताई, साधनाताई या श्रेष्ठ श्रद्धावानांच्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांवरील भक्तिरचना सादर केल्या गेल्या. प्रेमयात्रेच्या महासत्संगाच्या पहिल्या सत्राची सुरुवात श्लोकीने झाली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा भक्तिरचना सादर केल्या गेल्या. साधारण ६:४५ पर्यंत पहिल्या सत्रातील भक्तिरचना प्रस्तुत केल्या गेल्या. ’सांजवेळच्या रं वार्‍या...’ या पहिल्या सत्रातील अन्तिम भक्तिरचनेने विशेषत: श्रद्धावान भगिनींना माहेरच्या प्रेमाचा अनुभव करून दिला. त्यानंतर साधारण ४५ मिनिटांचे मध्यंतर झाले.

प्रत्येक श्रध्दावानला या अभंगाच्या ताकदीची कल्पना आहे. हे अभंग श्रध्दावानांना त्यांच्या बापू भक्तित स्थिर करतात. पण हे अभंग सहज सोपे केले ते प्रत्येक अभंगाच्या आधी असलेल्या निवेदनाने. स्वप्‍निलसिंहने लिहलेले निवेदन आणि गौरांगसिंहने समर्थपणे केलेले त्याचेसादरीकरण यांचा सुंदर मिलाप आपल्या सर्वांना पहायला मिळाला. लिहिण्याची व सादरीकरणाची साधी सोपी व सहजशैली अभंगाचा भाव सहजपणे श्रध्दावानांपर्यंत पोहचत होती. अभंग लिहणार्‍याचा भाव, त्याचबरोबर निवेदन लिहणार्‍या स्वप्‍निलसिंहचे बापूंवरील प्रेम, सदरकरणार्‍या गौरांगसिंहची भावोत्कटता व श्रध्दावानांचे बापूंवरील प्रेम व प्रत्यक्ष आपल्याबरोबर असलेले परमपूज्य बापू, नंदाई व सूचितदादा यामुळे सर्व आसमंत अक्षरश: मंत्रमय झाला होता.

प्रेमयात्रेचे दुसरे सत्र रात्री १० च्या आसपास संपले आणि ’सब सौंप दिया है जीवन का...’ या अन्तिम भक्तिरचनेच्या वेळी सर्व श्रद्धावान सद्गुरु श्रीअनिरुद्धांप्रति असणार्‍या प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावनेने स्वत:हून उठून उभे राहिले, त्यांचे हात आपोआप जोडले गेले आणि सर्वांनीच मन:पूर्वक ही प्रार्थना म्हटली.

सर्वांचेच अन्त:करण प्रेमभावाने भरून आले होते. महासत्संगातील विशिष्ट क्रमाने घेतल्या गेलेली भक्तिरचना, नेमक्या शब्दांतील निवेदन यांनी प्रत्येकाला आपापल्या जीवननदीचा प्रवास प्रेमप्रवास कसा बनवायचा आणि त्या प्रेमसागर अनिरुद्धापर्यंत कसा न्यायचा हे सहजपणे कळले होते. आद्यपिपांच्या ’मीच ह्याचा हाचि माझा अनिरुद्ध अवघा’ या शब्दांनी ’मला आधी याचे व्हायला हवे, मग तो माझा होतोच’, हे मर्म आज कळले होते. महासत्संगाचा हा टप्पा पूर्ण झाला, तरी प्रत्येकाची प्रेमयात्रा सुरूच होती. प्रेमयात्रा सदैव सुरूच असते. आज प्रत्येकाला ही यात्रा करण्यासाठी प्रेमाची शिदोरी मिळाली होती, दिशा मिळाली होती, सामर्थ्य मिळाले होते, प्रकाश मिळाला होता.

प्रत्येक जण आज अनिरुद्धप्रेमात चिंब भिजला होता. महासत्संगाची सांगता झाल्यावर बापू, नन्दाई आणि सुचितदादा जेव्हा प्रेममंचावर आले, तेव्हा बापुंच्या प्रेममय दृष्टिने जणू सर्वांना प्रेमाने न्हाऊ घातले. बापू मंचावरून खाली उतरले आणि त्याच वेळी जेव्हा आकाशातून पावसाचे थेंब अचानक बरसू लागले, तेव्हा श्रद्धावानांनी एकच जल्लोश केला. बापू, आम्ही आज तृप्त झालो, आज जन्माचे सोने झाले, आम्ही खरोखरच आज या भक्तिरचनांच्या गंगेत पूर्णपणे न्हाऊन स्वच्छ, शुद्ध, पवित्र झालो अशा प्रकरचा भाव श्रद्धावानांच्या मनात दाटत होता.

ज्यांना कार्यक्रमस्थळी येऊन सहभागी होणे शक्य नव्हते अशांनी आपल्याला घरी कुटुंबाबरोबर, मित्रमंडळीसह ह्या महासत्संगाचा आनंद घेतला. थेट प्रक्षेपणाचा (LIVE Webcast) फायदा देशविदेशातील अनेक श्रद्धावानांनी घेतला. भारतातील जवळजवळ सर्वच राज्यांत आणि जगभरातील ३८ देशांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले गेले.

भक्तीचा सुर, उत्कट भाव आणि मन:पूर्वक कृतज्ञता यांचा त्रिवेणी संगम असणारी ही प्रेमयात्रेची सुरुवात अनुभवून सर्व श्रद्धावानांच्या मनात एकच शब्द निनादत होता- "थेंब एक ह पूरा 'अवघे' नहाण्या 'अवघे' नहाण्या... न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुध्द प्रेमसागरा माझ्या भक्तनायका, माझ्या भक्तनायका!!!"