साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant's Journey) (फोरम पोस्ट नंबर - २)


Sai - The Guiding Spirit 

अनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion”  हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत.

श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या कॉमेन्टमध्ये एक महत्त्वाचा पॉइंट मांडला. “आपल्या आयुष्यात पण सद्‍गुरु अशा अनेक संधी तयार करतो, त्याच्या जवळ जाण्यासाठी”. पण अशा त्याने तयार केलेल्या संधी मानवाच्या हातून कळत नकळत निसटून जातात…आणि ह्याकरिता जबाबदार असतात ते “तर्क कुतर्कांचे भक्तिमार्गातील काटे.”

आपण बघतो की श्रीसाईसच्चरितामध्ये सपटणेकरांना (Sapatnekar) पण अशीच संधी प्राप्त झाली होती. वकीलीच्या परीक्षेची तयारी करत असताना साईनाथांची महती त्यांच्या कानावर येते. पण त्यावेळेला सपटणेकरांना श्रीसाईनाथांकडे जाण्याची आवश्यकता वाटत नाही. परंतु आयुष्यामध्ये पुढे काय वाढून ठेवलंय ह्याचा अंदाज कधीच कोणाला नसतो. म्हणूनच आद्यपिपादादा बापूंना उद्देशून म्हणतात,

प्रारब्ध आणील पुढे काय काळ

आम्ही जरी नेणू करी प्रतिपाळ

साधासुधा जीव अध्यात्म कळेना

घाबरूनी राही दूर दूर

ऐसिया माणसा कळे सांगतो मी

बापू कथा-कीर्तने दंग राही

पुढे सपटणेकरांच्या आयुष्यामध्ये अशी एक अघटित, अप्रिय घटना घडते की श्रीसाईनाथांकडे येण्याशिवाय त्यांच्याकडे तरणोपायच राहत नाही. ज्यावेळेला सपटणेकरांना ’आयुष्यात राम राहिला नाही’ अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला अशा परिस्थितीतून फक्त साईनाथच त्यांना बाहेर काढू शकतात आणि बाहेर काढतात. परमेश्वराला / परमात्म्याला दोष देणारे सपटणेकर सद्-गुरुंना शरण गेल्यानंतर, त्यांचं आयुष्य मूळ पदावर येतं.

म्हणून आम्हालाही सद्-गुरुंचं गुणसंकीर्तन करताना एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागते की गुणसंकीर्तन करणारा प्रत्येक श्रद्धावान इतरांच्या जीवनात, सद्-गुरुंपाशी येणा-या संधी निर्माण करतो. आपण आपलं काम करत रहायचं असतं, “तो” त्याचं काम करतोच.

कर्म मात्र मी करणार | समर्थ हरिगुरु फल देणारा |

ऐसा ज्याचा दृढ निर्धार | बेडा पार तयाचा ||

 ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥