हनुमान चलिसा पठण – Hanuman Chalisa Pathan
हनुमान चलिसा या महान सन्त श्रीतुलसीदासजीविरचित स्तोत्राचे सामूहिक पठण सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनानुसार दर वर्षी श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे केले जाते.
या वर्षी रविवार, दि. २१ मे २०२३ ते शनिवार, दि. २७ मे २०२३ ह्या कालावधीत श्री हनुमान चलिसा सामूहिक पठण आयोजित करण्यात आले आहे. हे सातही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत दररोज १०८ पेक्षा अधिक श्रद्धावान सामूहिकपणे हनुमान चलिसाचे कमीत कमी १०८ वेळा पठण करतात.
श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम् मधील श्रीमद्पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्र (क्षमायंत्र) ह्याच्या केंद्रस्थानी पंचमुखीहनुमंत आहे, तसेच चण्डिकाकुलाच्या तसबीरीतही हनुमन्त आत्मलिंगासह विराजमान आहे. अशा गुरुक्षेत्रम् मध्ये हनुमान चलिसा पठण करण्यात येते.
दि. २४ फेब्रुवारी २००५ रोजीच्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रवचनात हनुमान चलिसाच्या सुरुवातीच्या दोह्यातील ‘श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि’ ह्या ओळीचा भावार्थ उलगडून सांगताना बापू म्हणाले की ही ओळ प्रत्येकाची प्रार्थना व्हायला हवी. कुठेही धूळ पडली तर ती गोष्ट अस्वच्छ होते, पण सद्गुरुंच्या चरणांच्या धुळीने मात्र मनरूपी आरसा स्वच्छ होतो. सद्गुरुचरणधुळीच्या ह्या सामर्थ्याचे स्मरण महान संत तुलसीदासजी आम्हाला हनुमान चलिसाच्या सुरुवातीस करून देत आहेत.
बापू ज्यास ‘रक्षकगुरु’ म्हणतात, त्या हनुमंताची तसबीर श्रीहरिगुरुग्राम येथील स्टेजवरील मांडणीमध्ये बापूंच्या बैठकीच्या मागे आम्ही बघतो. तेथे दर गुरुवारी होणा-या सामूहिक उपासनेमध्ये ‘ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:’ हा जप केला जातो.
या मंत्राच्या जपाचा प्रियांकावीरा विचारे यांना आलेला अनुभव आपण यूट्यूबवर पाहू शकतो. प्रत्येक भक्ताच्या भक्तिमार्गावरील प्रवासाची सुरुवात हनुमंतापासूनच होते आणि म्हणूनच आईवडिलांनी त्यांची मुले लहान असल्यापासून त्यांच्यासह दररोज ३ वेळा हनुमान चलिसा म्हणावा असे बापूंनी सांगितल्यामुळे आज अनेक श्रद्धावान मातापिता याचे पालन करताना दिसतात. दर वर्षी श्रीगुरुचरणमासात म्हणजेच वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या कालावधीत कमीत कमी एक दिवस श्रद्धावानांनी १०८ वेळा हनुमान चलिसाचे पठण करावे असे बापू सांगतात. ज्या उपासना बापू आम्हाला करण्यास सांगतात, त्या बापू स्वत:ही करतात. ह्या वर्षी श्रद्धावानांच्या सोयीसाठी हे पठण श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् बरोबरच सर्व त्रिविक्रम मठांमध्येही (पुणे, वडोदरा, रत्नागिरी, मीरज, तसेच बोरिवली-मुंबई पश्चिम उपनगर) वरील कालावधीतच आयोजित करण्यात आले आहे. सर्व त्रिविक्रम मठांमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत हे पठण होईल व तेथील पठणाच्या दरम्यान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये होणार्या पठणाचे थेट प्रक्षेपण (Live streaming) करण्यात येईल.
आज्ञाचक्राचा स्वामी असणारा हनुमन्त श्रद्धावानाचे बोट धरून त्याला पुढे नेत राहतो, असे बापूंनी त्यांच्या प्रवचनात सांगितले आहे. सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे आपण भक्तिभावाने सामूहिक हनुमान चलिसा पठणात सामील होऊ, आपला जीवनविकास करण्यास रामदूत हनुमंत समर्थ आहेच.
‘जय कपीस तिहुं लोक उजागर’ या हनुमान चलिसातील पंक्तीचा अर्थ समजावून सांगताना ११ सप्टेंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात बापू म्हणाले - ‘मन, प्राण, प्रज्ञा हे मानवाच्या आत असणारे तीन लोक आहेत. मानवाचा विकास होण्यासाठी हे तीनही लोक उजळून निघणे आवश्यक आहे आणि या तीनही लोकांना उजळवून जीवन सुंदर करणारा आहे, सुंदरकाण्डाचा नायक हनुमंत.