दिवाळीच्या आधीच्या गुरुवारी प्रवचनामध्ये बापूंनी
मातृवात्सल्य उपनिषद दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे दत्तजयंतीला हे उपनिषद सर्वांना मिळणार आहे. तेव्हा बापूंनी या उपनिषदाबद्दल सांगितले होते की, "हे उपनिषद म्हणजे अगदी प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाच्या, मनाच्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्या प्रत्येक दुर्गुणासाठी, प्रत्येक पुण्यासाठी, प्रत्येक पापासाठी, त्याच्या आधीच्या व ह्या जन्माच्या पुढे येणार्या प्रत्येक जन्मांसाठी, त्याच्या स्वभावासाठी, स्वभावातल्या बदलासाठी, त्याच्या भक्तीला जपण्यासाठी, निष्ठेला वाढविण्यासाठी जे, जे म्हणून आवश्यक आहे ते, ते सगळेच्या सगळे ह्या उपनिषदामध्ये आहे." मग बापूंनी "
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते" हा श्लोक / मंत्र म्हणून दाखवला व अत्यंत मनापासून सांगितले की सर्व मंगलता, सर्व पुरुषार्थांची साध्यता देणारे हे उपनिषद आहे. बापू पुढे म्हणाले, "हे जे उपनिषद माझ्या आईने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते खरचं सांगतो, अधाश्यासारखे वाचा. तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हांला बाहेर काढून ते तुम्हांला चांगल्याच मार्गावर घेऊन जाणार."