संकल्पसुपारी
दरवर्षी सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या घरी अडीच दिवस गणेशोत्सव अतिशय उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो व अनेक श्रद्धावान बापूंच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठया संख्येने येतात.
‘गुरुनाम आणि गुरुसहवास। गुरुकृपा आणि गुरुचरण पायस। गुरुमंत्र आणि गुरुगृहवास। महत्प्रयास प्राप्ती ही।।’ असे श्रीसाईसच्चरितात म्हटले आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या घरी जाऊन, श्रीगुरु दत्तात्रेयांसह असणार्या श्रीगणेशाच्या मंगलमूर्तीचे दर्शन घेण्यास लाभणे ही श्रद्धावानांसाठी आनंदाची पर्वणीच असते.
‘हा आपल्या घरचा गणपती आहे’ असे बापूदेखील सर्व श्रद्धावानांना सांगतात आणि श्रद्धावानही याच भावनेने गणेशाचे दर्शन घेतात. गणपतीच्या आरतीच्या ध्रुवपदाची ओळ ‘जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥’ अशी आहे. श्रीगणेशाचे दर्शन घेताना कामनापूर्तीसाठी किंवा अडचणी सुटाव्या म्हणून भक्तिमय संकल्प करतात म्हणजेच येथील गणपतीस नवस करतात आणि त्या संकल्पाचे प्रतीक म्हणून येथील गणपतीसमोर संकल्पसुपारी ठेवतात. तसेच कामना पूर्ण झाल्यावर श्रीगणेशाच्या चरणी नवसपूर्तीही करतात.
अशा या श्रीगणेशाच्या दर्शनाकरिता गेली अनेक वर्षे श्रद्धावान आपल्या परिवारासह भक्तिभावाने येत आहेत आणि गणरायाच्या दर्शनाने, आशीर्वादाने तृप्त होत आहेत.