Bapu (Aniruddhasinh) Special Issue - Amche Bapu - (01-Jan-2012)

॥ हरि ॐ ॥

आमचे बापू

‘दादाचे सर’ ही बापूंची माझी १९८५ मध्ये झालेली प्रत्यक्ष ओळख.

सुचितदादा जनरल मेडिसिनमध्ये एम. डी. करण्यासाठी डॉ. व्ही. आर. जोशी ह्यांच्या युनिटमध्ये जॉईन झाले. त्यावेळी आपले बापू म्हणजेच डॉ. अनिरुध्द धैर्यधर जोशी हे त्याच युनिटमध्ये सिनिअर लेक्चरर होते. ते माझ्या दादाला अगदी फर्स्ट एम.बी.बी.एस. पासून वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. दादा रेसिडन्ट डॉक्टर म्हणून काम करु लागल्यावर बापू त्याला नियमितपणे शिकवू लागले होते. त्यामुळे त्यांचे संबंध अधिक दृढ होत चालले. ह्यानंतर हळूहळू दोन घरे कशी एकत्र आली व एकरुप झाली हे कोणालाच कळले नाही.

लहनपणापासून दादाच्या शब्दाबाहेर जायचे नाही, हा आई-काकांनी मला घालून दिलेला नियम माझ्याकडून सदैव पाळला गेला, ही बापूंचीच कृपा. त्याचबरोबर बापूंच्या शब्दाबाहेर कधी जायचे नाही हा माझ्या दादाचा दृढनिश्चय, म्हणून मग माझ्याकडूनही आपोआपच बापूंच्या शब्दांचे पालन होऊ लागले, ही माझ्या दादाची कृपा.

बापू- ताई - दादांच्या बरोबर काम करण्यास सुरुवात करुन आतापावेतो अठरा वर्षे झाली आहेत. ह्या अवधीत व त्याच्या आधीही बापू व दादांनी मला भरपूर शिकवले व ह्या तिघांनी मला भरपूर काही दिले. हे सर्व घेत असताना व इतर सर्व पाहत असताना बापूंच्या संपर्कातील अनेक जुन्या व्यक्तींच्या भेटी झाल्या व त्यांच्याशी बोलण्यातूनच आजच्या विशेषांकाचा जन्म झाला.

सुचितदादांची संमती मिळताच बापूंशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क केला असता व गुरुवारी सूचना केली असता २००५ सालीच अक्षरश: छोट्यामोठ्या लेखांचा पाऊस पडला आणि नंतरही अनेकजण लेख देतच राहिले. ह्यांतील काही मोजके अपवाद वगळता सर्वच लेख खूप सुंदर आहेत. फक्त मोजक्या काही लेखांमधून बापूंचे नाव फक्त घेऊन लेखकांना स्वत:चेच डांगोरे पिटायचे होते. हे लक्षात येताच सर्व लेख सुचितदादांकडे दिले. त्यांनीही शब्द न शब्द वाचून काढला व असे दांभिक लेख बाजूला केले. (जास्तीत जास्त चार किंवा पाच).

923037_539939496058643_85563759_nह्या विशेषांकामध्ये ह्या शेकडो चांगल्या लेखांमधून काही मोजकेच लेख व थोड्याशाच मुलाखती घेऊ शकलो. ह्या व इतर सर्व लेखांचे मिळून ‘आठवणींची पाने चाळताना’ हे पुस्तक काढायची सर्वांचीच इच्छा आहे. मात्र दादा त्यासाठी परवानगी देतील तेव्हाच.

बापूंच्या विलक्षण व्यक्तिमत्वाची व सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरम्‌ असणार्‍या जीवनशैलीची आणि कार्यप्रणालीची साधी नोंद करणेसुध्दा खूप कठीण आहे. त्यामुळे हा विशेषांक किंवा पुढे येणारे पुस्तक बापूंच्या सर्व पैलूंना स्पर्श करु शकेल असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.

मला हे लेख वाचताना जाणवलेली सगळ्यांत महत्वाची गोष्ट म्हणजे इतक्या विविध क्षेत्रातील लोकांचे बापूंवर असणारे वर्षानुवर्षांचे प्रेम. पण त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की स्वत: बापूसुध्दा आपल्या जुन्या मित्रा - आप्तांविषयी अत्यंत जिव्हाळ्याने बोलत असतात. ह्या विशेषांकातील जवळपास प्रत्येक लेखकाचे नाव मी बापूंच्या तोंडून ऐकलेले आहे. बापू अत्यंत आत्मीयतेने ह्या सर्वांविषयी बोलत असताना अत्यंत सुखावलेले असतात. बापूंना मी कधीच कटू आठवणींना उच्चारतानासुध्दा ऐकलेले नाही. त्यांच्याकडे असतात, त्या कुणाच्याही फक्त चांगल्याच आठवणी, स्मृती. खरं तर काका ( आद्यपिपा) म्हणायचे त्याप्रमाणे ‘ह्याला कुणाचेही दोष कधी बोचतच नाहीत व ह्याच्या मेमेरी बँकेमध्ये प्रत्येकाचे जेवढे चांगले तेवढेच साठवलेले असते.’

ह्या विशेषांकाचा कार्यकारी संपादक बनण्याचे भाग्य मला लाभले, ही देखील बापूंच्या आईचीच कृपा.