सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे 'नुपेक्षी कदा राम दासाभिमानी' यावरील मराठी प्रवचन - दि. 20-04-2023
दि. २० एप्रिल २०२३ रोजीच्या ‘ॐ त्रिविक्रमाय नम:’ या नामावरील प्रवचनात स्वयंभगवान हरिहर श्रीत्रिविक्रम ‘दासाभिमानी’ आहे, हे स्पष्ट करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी सन्त समर्थ श्रीरामदासस्वामी विरचित ‘मनाचे श्लोक’ या रचनेतील ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी’ या ओळीचा संदर्भ दिला आणि आम्हालाही ‘देवाभिमानी’ असायला हवे म्हणजेच आम्हालाही आमच्या भगवन्ताचा अभिमान असायला हवा असे सांगितले.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज द्वितीय खण्ड प्रेमप्रवास मध्ये ‘श्रीरामगुणसंकीर्तन’ प्रकरणात सन्त समर्थ रामदासस्वामींच्या मनाच्या श्लोकांसह सन्त श्रीतुलसीदासजीविरचित श्रीरामचरितमानस सुन्दरकाण्ड यातील चौपाई आणि दोहे यांचेही विवेचन केले आहे.
भगवन्ताचा अभिमान कृतीत उतरण्यासाठी भगवन्ताचा महिमा ऐकणे आवश्यक आहे, श्रवणभक्ती महत्वाची आहे असेही बापूंनी सांगितले.
बापूंनी त्यांच्या लहानपणी रेडियोवर ऐकलेली कीर्तने, भक्तिगीते यांबद्दल सांगताना ‘तूच कर्ता आणि करविता शरण तुला भगवंता’ या गीतकार पी. सावळाराम यांनी लिहिलेल्या, वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीताचा उल्लेख केला.
भगवन्ताचा अभिमान कसा असावा यासंदर्भात बापूंनी भक्त प्रल्हादाचे उदाहरण सांगितले. १३ अप्रिल २०२३ रोजीच्या इंग्लिश प्रवचनात बापूंनी भक्त प्रल्हादाची कथा सांगून, ‘प्रल्हादाचा भाव स्वत:च्या जीवनात कसा उतरवावा’ याचे मार्गदर्शन केले आहे.
पंढरपुरच्या भावयात्रा सत्संगात घेतलेल्या, सन्त जनाबाई विरचित ‘धरिला पंढरीचा चोर’ या अभंगाबद्दल आणि सन्त जनाबाईंच्या भक्तिभावाबद्दलही बापूंनी सांगितले.
स्वयंभगवानाचे वैशिष्ट्य स्पष्ट करताना बापूंनी पुरुषसूक्त या ऋग्वेदातील सूक्ताचा संदर्भ देऊन सहस्रशीर्ष, सहस्रहस्त असणार्या अशा या स्वयंभगावानाचे एक ज्ञानेन्द्रियही सर्व ज्ञानेन्द्रियांचे कार्य करण्यास समर्थ असते, एक कर्मेन्द्रियही सर्व कर्मेन्द्रियांचे कार्य करण्यास समर्थ असते हेदेखील विशद केले.
भगवन्ताला नैवेद्य अर्पण करा, नैवेद्य दाखवू नका, आणि अर्पण केलेला नैवेद्य तो सेवन करतो हा विश्वास बाळगा, असेही बापूंनी सांगितले. श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज तृतीय खण्ड आनन्दसाधना मध्ये ‘नैवेद्यम्’ प्रकरणात बापूंनी म्हटले आहे - ‘भगवंतास नैवेद्य अर्पण केल्यानंतर लगेचच ते ताट किंवा इतर पात्रे बाजूला नेऊ नयेत. साधारणतः जेवढा वेळ ते पदार्थ खाण्यास मानवास लागेल तेवढा वेळ नैवेद्य मनोभावे मूर्तीसमोर ठेवावा.’
तुलसीपत्र अग्रलेख १५७७ मध्ये बापूंनी लिहिले आहे - ‘ह्याच्या मूर्तीला अर्थात अर्चनविग्रहाला ‘जिवंत देव' जाणून सर्व प्रकारे सेवा करा आणि केवळ ह्याला आवडते म्हणून खऱ्याखुऱ्या गरजू श्रद्धावानांना सहाय्य करा, हेही भक्तिभावचैतन्यच.’
भक्तिभावचैतन्यसंबंधित तुलसीपत्र अग्रलेखांसंबंधीचा संवादही अनिरुद्ध भक्तिभावचैतन्य या बेवसाईटवर आपण पाहिलाच आहे.
माझ्या घरच्या देव्हार्यातील भगवन्ताच्या, सद्गुरुतत्त्वाच्या मूर्ती, प्रतिमा ह्या रूपांमध्ये साक्षात् ईश्वरच उपस्थित आहे हा विश्वास आमच्या कृतीत आला पाहिजे हा बोध बापूंच्या प्रवचनातून झाला. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति। तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः॥ ( भगवद्गीता ९/२६ ) ह्या भगवान श्रीकृष्णांच्या वचनाचा संदर्भ बापूंनी अनेक वेळा त्यांच्या प्रवचनात दिला आहे.
त्रिविक्रमास भक्ताचा त्रिविध अभिमान असतो असे बापूंनी सांगितले. भगवन्ताचे कौतुक करणे हादेखील देवाबद्दलचा अभिमानाच आहे. आम्हाला आमच्या देवाचे कौतुक असते का? क्रिकेटचा खेळ पाहताना आम्ही क्रिकेटपटूचे कौतुक करतो. पण दिवसभरात किती वेळा देवाच्या कौतुकाचा विचार आमच्या मनात येतो, याचा अन्तर्मुख होऊन विचार करण्यास बापूंनी सांगितले.
बापूंनी थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या एका कवितेचा उल्लेख केला, ज्या कवितेत त्या माहेरच्या वाटेवरच्या ज्या दगडाने ठेच लागली, त्या दगडाबद्दलही कौतुकाने बोलतात.
भगवन्ताला माझा प्रचंड अभिमान आहे आणि मला देवाचा अभिमान नाही, असे व्यस्त प्रमाण असणे उचित नाही. बरेचदा मानव ‘मी किती साधना केली, सेवा केली, भगवन्ताने मला काय दिले नाही’ याचा हिशेब ठेवतो; पण त्याऐवजी ‘देवाचा मला किती अभिमान आहे’ आणि ‘देवाने माझ्यासाठी काय काय केले आणि करत आहे’ याची गणती ठेवायला हवी, असेही बापूंनी सांगितले.
२३ मार्च २०२३ रोजीच्या प्रवचनात ‘एक भरोसो एक बल एक आस बिस्वास। एक राम घनश्याम हित चातक तुलसीदास॥’ या सन्त तुलसीदासजींच्या दोह्याचे संकीर्तनही बापूंनी स्वत: केले होते आणि उपस्थितांकडून करून घेतले होते.
आजही बापूंनी ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी’ ही ओळ स्वत: म्हटली आणि उपस्थितांनाही त्यात सामील करून घेतले.