रामरक्षा स्तोत्राची जन्मकथा – बुधकौशिक ऋषींची प्रत्येक जीवाचे कल्याण व्हावे ही तळमळ आणि रामनामाचा महिमा

रामरक्षा प्रवचन १ हे केवळ एक प्रवचन नसून, ते रामनामाच्या अथांग सामर्थ्याची आणि बुधकौशिक ऋषींनी हे स्तोत्र जगाला कसे दिले, याची एक मन थक्क करणारी गाथा आहे. बापूंनी प्रवचनाची सुरुवात ‘राम राम राम’ या नामजपाने केली आहे. ते सांगतात की, ‘राम’ हे एकच नाव हजारो नामांहून श्रेष्ठ आहे आणि जिथे त्याचे स्मरण होते, तिथे पाप टिकूच शकत नाही. मृत्यूच्या अंतिम क्षणी जर हे नाम मुखी असेल, तर तो केवळ अंत नसतो, तर जीवनभराच्या साधनेचा तो परमोच्च बिंदू असतो.
रामरक्षा स्तोत्र: केवळ मंत्र नव्हे, ऊर्जास्रोत!
रामरक्षा स्तोत्र हे केवळ एक स्तोत्र नाही, तर तो एक जागृत मंत्र आहे. बापूंनी स्पष्ट केले आहे की, ही रचना म्हणजे रामनामाच्या मुळाशी पोहोचवणारी एक ओजस्वी प्रार्थना आहे. "ॐ श्रीगणेशाय नमः" या ओळीने सुरू होणाऱ्या या स्तोत्राचे ऋषी आहेत "बुधकौशिक ऋषी". बापूंनी त्यांच्या नावाचा अर्थ अत्यंत सुंदरपणे उलगडला आहे: 'बुध' म्हणजे जागृत, विवेकी आणि 'कौशिक' म्हणजे मेघासमान. जसा मेघ पाण्याचा साठा करतो आणि योग्य वेळी पाऊस बनून बरसतो, तसेच हे ऋषी ज्ञानाचा खजिना आहेत – असा खजिना, जो सतत भरभरून देण्यास तयार आहे, त्याला शोधण्याची आवश्यकता नाही, फक्त त्याच्याकडून लाभान्वित होण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
रामरक्षेची जन्मकथा
या बुधकौशिक ऋषींचा जीवनप्रवास अत्यंत अद्भुत आणि प्रेरणादायी आहे. रामायणकाळ संपल्यानंतर जेव्हा लोक रामनाम विसरले होते, तेव्हा त्यांनी संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा सुरू केली. काशी विश्वनाथ मंदिरात त्यांना साक्षात शिवाने दर्शन दिले. शिवाने वर मागण्यास विचारताच, बुधकौशिक ऋषींनी "या जगातल्या प्रत्येकाच्या मुखात रामनाम असावे" अशी इच्छा व्यक्त केली. शिवाने अत्यंत प्रेमाने सांगितले की, हे शक्य नाही, कारण प्रत्येक जीवाला 'कर्मस्वातंत्र्य' आहे – अर्थात, त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मुखात रामनाम घालता येणार नाही.
हे पाहून, शिव, पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नंदी हे सर्व तपश्चर्येला बसले. आपल्या देवाचे परिश्रम पाहून बुधकौशिकांनी स्वतः अन्न-पाणी सोडून तपश्चर्या सुरू केली.
शेवटी, जेव्हा शिवासमोर राम प्रकटतात, त्याच क्षणी बुधकौशिक ऋषींच्या समोर शिव प्रकट होतात. बापू सांगतात, हे त्रिकालात्मक दर्शन आहे, रामाचीच लीला आहे. रामाने त्यांना वर दिला की जो कोणी बुधकौशिकाचे स्मरण करेल, त्याच्या मुखात रामनाम सदैव राहील.
राम बुधकौशिक ऋषींना स्वतःबरोबर शिव-पार्वतीच्या एकांतात घेऊन जातो, जिथे शिव-पार्वती रामाचे स्मरण करतात. बुधकौशिक ऋषिंना शिव-पार्वतीचे एकान्तातील तेज सहन होत नाही. ते तेज म्हणजेच रामनाम. बुधकौशिक ऋषी ते तेज जगाच्या कल्याणासाठी सहन करत राहताना अर्धनिद्रित अवस्थेत जातात. त्या अर्धनिद्रित अवस्थेतच बुधकौशिकांना रामरक्षा स्तोत्र ऐकू येते, जी एक दिव्य अनुभूती होती.
सरस्वतीची कृपा
बुधकौशिकांना लेखनकर्तृत्वाचा अहंकार येऊ नये यासाठी भगवती सरस्वतीमाता लीला करते आणि स्वत: लेखणी हातात घेऊन रामरक्षा लिहून काढते.
पहिल्यांदा रामरक्षा कोणी ऐकली?
रामरक्षा स्तोत्र पूर्ण झाल्यावर बुधकौशिकांना ‘ते कोणाला ऐकवावे’ असा प्रश्न पडला. वाल्मीकि ऋषी धावत आले आणि म्हणाले की त्यांना ते ऐकण्याचा पहिला हक्क आहे. त्यानंतर क्रौंच पक्षी आणि क्रौंची, क्रौंचावर ज्याने बाण मारला तो शिकारी, ज्याने बाण बनवला तो लोहार, ज्याने त्याला विद्या शिकवली ती लोहाराची आई आणि असे करत करत मनु ऋषींपर्यंत सर्वजण आले, कारण मनु हे सर्व मानवांचे पूर्वज आहेत. शेवटी ब्रह्मदेव आणि शिवशंकरही आले आणि त्यांनीही रामरक्षा ऐकण्याचा पहिला हक्क सांगितला.
सर्वजण ऐकण्याच्या पहिल्या हक्काबद्दल सांगू लागले तेव्हा भगवान श्रीराम स्वतः प्रकट झाले. त्यांनी सांगितले की रामरक्षा पहिल्यांदा ऐकण्याच्या त्यांच्या चढाओढीमुळे संपूर्ण विश्व तिथे जमा झाले आहे. शिवाने आपले वचन खरे केले होते, कारण सर्व मानवजात रामरक्षा स्तोत्र ऐकण्यासाठी जमा झाली होती आणि म्हणूनच म्हटलं जातं – "या विश्वातील असा एकही जीव नाही, ज्याने कधी ना कधी रामरक्षा ऐकलेली नाही."
रामरक्षा: एक अक्षय खजिना
बापू शेवटी सांगतात की, रामरक्षा ही केवळ स्तोत्र नसून हा विश्वातील सर्वांना परस्परांशी जोडणारा रामनामाचा अक्षय खजिना आहे. ज्या बुधकौशिक ऋषींनी स्वतःचा देह, अहंकार, सर्वस्व समर्पण करून शिवाकडून रामरक्षा ऐकली, त्या बुधकौशिक ऋषींना आपोआपच नमस्कार केला जातो.
ज्या रामरक्षेची जन्मकथा एवढी महन्मंगल आहे, ज्याच्यातील प्रत्येक शब्द प्रचंड अर्थाने भरलेला आहे, ते स्तोत्र नक्कीच महान असणार हे आम्हाला उमगते.
या प्रवचनातून आपल्याला रामनामाचे महत्त्व, रामरक्षेची जन्मकथा, भक्तीची ताकद कळते आणि बुधकौशिक ऋषींच्या निस्सीम भक्तीची, निःस्वार्थ त्यागाची व विश्वकल्याणासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची जाणीव होते.
संपूर्ण प्रवचन मराठी मध्ये येथे पाहू शकता :-
https://www.youtube.com/watch?v=SyP9BrJfqCI
संपूर्ण प्रवचन हिंदी मध्ये येथे पाहू शकता :-
https://www.youtube.com/watch?v=pqyXxpOAnI8