मानवाचे "हृदय" म्हणजे नक्की काय?

मानवाचे "हृदय" म्हणजे नक्की काय?

English

प्रत्येक मनुष्य हा परमात्म्याचा अवतारच आहे. 108%. प्रत्येक मनुष्य, तो कितीही पापी असो, त्याच्यामध्ये तो जिवात्मा आहे तो त्या परमात्म्याचाच अंश आहे. फक्त कोणी तो विकसीत केलाय तर कोणी त्याला विकसित केलेलं नाहीये. एवढाच मोठा फरक आहे. पाप्यामध्ये तो साक्षी रुपाने राहतो तर पवित्र माणसांमध्ये तो कार्यरतशील म्हणून राहतो. म्हणजे शेवटी एकाचा दुसर्‍याशी व्यवहार असा, एका परमात्म्याच्या अंशाचा दुसर्‍या परमात्म्याच्या अंशाशीच संबंध आहे. म्हणजेच एका विष्णुचा दुसर्‍या विष्णुशीच आहे. आम्हाला वाटतं हृदय म्हणजे ते रक्ताचा पुरवठा करणारा पंप. हो, आहेच. तो अर्थ आहेच इथे बुधकौशिक ऋषींच्या मनामध्ये, प्रश्नच नाही. पण त्याच्या पलीकडे आम्ही म्हणतो ना की ह्या माणसाला हृदय आहे की नाही, म्हणजे त्याला ते रक्ताचा पंप करणार्‍या प्रमाणे पंप आहे की नाही असा प्रश्‍न नसतो, त्याला भावना आहेत की नाही? ह्याला काही सहानुभूती आहे की नाही? ह्याला काही करुणा आहे की नाही? ह्याला काही प्रेम आहे की नाही? त्याचं हृदय पाषाण आहे. त्याच्या हृदयांत दगड-पाषाण बसवलेले आहेत. ह्याचा अर्थ काय? त्या माणसाला भावना नाहीत. भावना जी आहे ती अगदी कठोरपणाची आहे. मृदुपणाची नाहीये. प्रेमळपणाची भावना नाही.  प्रेमाची भावना नाहीये. त्याच्यामध्ये जराही ओलावा नाहीये. म्हणजे हृदय म्हणजे काय? तर प्रेमाचे अधिष्ठान. म्हणून बघा अगदी प्रेमाखातर बाण बिण काढून हृदय काढून देतो, त्यामधून आरपार गेलेला बाण दाखवतोच आपण. बरोबर की नाही? कारण हृदय म्हणजे प्रेमाचे स्थान. मग ते फक्त पती-पत्नींच्याच प्रेमाचे स्थान नाही. कोणाच्याही प्रेमाचे स्थान हे हृदय हेच आहे. म्हणजे प्रेमाचे जे काही स्थान आहे, त्याला हृदय म्हणतात हे आम्हाला कळलं पाहिजे. हृदय हे प्रेमाचे स्थान आहे हे वाक्य चुकीचे आहे, तर माझ्यामध्ये जे प्रेमाचे स्थान आहे ते प्रेमाचे स्थान म्हणजे हृदय. आणि ह्याचं रक्षण हा जामदग्नजीत करो अस बुधकौशिक ऋषी विनवतात. ज्याच्या जीवनात प्रेम नाही नं, त्या मनुष्याचे जीवन भकास होऊन जातं लक्षात ठेवा. जगामध्ये आम्ही नेहमी बघतो, चांगल्या वाईटाची लढाई चालते.

          सगळ्या लबाड व्यक्ति ज्या असतात त्या हरतात कुठे माहितीये बाबांनो? त्या हरतात फक्त प्रेमाच्या पुढे. कारण  ह्या वाईट व्यक्ति, त्यांच्याकडे प्रेम नसतं. त्यांना प्रेम समजू शकत नाही.

          मी विचार करताना माझ्या लक्षात येईल की मनुष्य प्रेम का करतो? तर दोन गोष्टींसाठी. एक काहीतरी लाभ व्हावा म्हणून. किंवा ती गोष्ट हितकारक आहे म्हणून. जी गोष्ट हितकारकही नाही, त्यापासून मला काही लाभही नाही, अशा गोष्टींवर मनुष्य प्रेम करतो का? नाही करत. 100% करत नाही.

          आणि म्हणून ती मंडळी फसतात कुठे? तर त्या ठिकाणी फसतात जिथे उत्कट प्रेम आहे. त्या उत्कट प्रेमाच्या पुढे त्यांना हार पत्करावीच लागते. ते काही करू शकत नाहीत.

          मग तुम्ही म्हणाल, आमच्या संपूर्ण शरीरामध्ये, ह्या देहामध्ये प्रेमाचं स्थान आमच्या मेंदूमध्ये आहे की आमच्या छातीमध्ये कुठे बसलेले आहे? की कुठे गळ्यामध्ये आहे? कुठे आहे? हे हृदय म्हणजे नक्की काय?

          माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये हृदय आहे. मेंदुमध्ये नाही, प्रत्येक पेशीमध्ये. माझ्या शरीरामध्ये  जेवढ्या म्हणून पेशी आहेत, एक नख आणि केस सोडले, त्या पेशी नाहीच आहेत. ते मृत पदार्थ आहेत. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशींमध्ये हृदय आहे, कारण प्रत्येक पेशींमध्ये रस आहे. प्रोटोप्लाझम ज्याला आम्ही म्हणतो, तो रस आहे आणि तो रस आहे म्हणून ती पेशी जिवंत आहे. तो रस आहे, तो प्रोटोप्लाझम आहे म्हणून ती पेशी कार्य करु शकते. सहजपणे कार्य करु शकते. हा जो रस आहे नं, तो रस आमच्या प्रत्येक पेशीमध्ये आणि पेशींच्या बाहेर पण आहे. पेशीच्या आतला रस कमी झाला तरी पेशी सुकली, आणि पेशीच्या बाहेरचा रस सुकला तरीही पेशी सुकली. म्हणजे पेशीच्या आत आणि बाहेर रस असणं ही पेशीच्या जीवंत राहण्यासाठीची नितांत आवश्यक गोष्ट आहे. रस!

          आम्ही श्रीकृष्णाचं वर्णनच काय म्हणतो? ‘रसोवैसः रसराज:’ की जो रसराज आहे, जो रस आहे या संपूर्ण जीवाचा - विश्वाचा तो रस म्हणजे तो भगवान श्रीकृष्ण, तो परमात्मा, तो श्रीराम! आणि हा जो रस आहे नं, हा रस म्हणजेच हृदय. हे आम्हाला कळलं पाहिजे. हृदय म्हणजे दुसरी कुठली गोष्ट नाही, तर माझ्या संपूर्ण शरीरभर जो रस पसरलेला आहे, लिम्फ नव्हे, लिम्फ म्हणतो ती गोष्ट वेगळी. रस म्हणजे प्रोटोप्लाझम आहे, जे फ्ल्युईड आहे, ते म्हणजे इन्ट्रासेल्युलर फ्ल्युईड किंवा एक्स्ट्रा सेल्युलर फ्ल्युईड, जे काही आहे, त्या सगळ्याला आम्ही रस म्हणतो आणि त्या रसामध्येच हृदय आहे. ओलेपणा...आणि भगवंत आमच्याकडे राहतो, तो कुठे राहतो? तो या रसाद्वारे कार्य करतो. परंतु तो राहतो मात्र कुठे, कि जिथे लाभ आणि हित हे त्याच्यापासून मिळवण्यासाठी, जो पर्यंत आमच्या मनामध्ये विचार आहे, की ह्याच्यापासून मला माझं हित करुन घ्यायचंय, ह्याच्यापासून मला लाभ करुन घ्यायचाय, तोपर्यंत तो 'तो' आहे. तो पर्यंत तो 'तो' आहे. तो हृदयात नाही आहे. आणि जेव्हा तो माझा असणं ह्यातच माझं हित आहे, तो माझा होणं हाच माझा लाभ आहे, हा विचार होतो, तेव्हा ’तो’ नाहीसा होतो. तो आतमध्ये राहतो. हे आम्हाला कळलं पाहिजे कि जो पर्यंत मला त्याच्यापासून लाभ करुन घ्यायचाय, त्याच्यापासून माझं हित करुन घ्यायचंय, तोपर्यंत तो, ’तो’ आहे, कारण लांब आहे ’तो’. पण जेव्हा मी म्हणतो, त्याला प्राप्त करुन घेणं हाच माझा लाभ आहे, आणि त्याला प्राप्त करुन घेण्यातच माझं हित आहे, तेव्हा तो, ’तो’ राहत नाही, कारण तो तेव्हा हृदयात जाऊन बसलेला असतो. माझ्या जीवनातल्या प्रत्येक रसामध्ये तो मिसळलेला असतो. तो माझ्या हृदयात बसलेला असतो. हे हृदयाचं स्थान आहे. मात्र त्यासाठी मला माहित पाहिजे की त्याच्यापासून लाभ मिळवायचा, त्याच्यापासून माझं हित करुन घ्यायचं, की त्याला मिळवणं हेच हित आहे हे मानायचं.