व्हेज चीज आणि नॉनव्हेज चीज (Veg and Non veg Cheese)

व्हेज चीज आणि नॉनव्हेज चीज (Veg and Non veg Cheese)

चायनीज खाद्यप्रकाराबरोबरच आता इटालियन, लेबनीज, कोरियन असे अनेक विदेशी खाद्यप्रकार गेल्या काही वर्षात भारतात लोकप्रिय होत चालले आहेत. ह्या खाद्यप्रकारांमध्ये बर्‍याच वेळा “चीज” वापरले जाते. चीज हा प्रकार जरी भारतामध्ये अनेक वर्षं मिळत असला तरी मागच्या काही वर्षांमध्ये “चीज”ची आवड लोकांमध्ये खूपच वाढली आहे.

burger-big

सद्‌गुरु अनिरुद्ध बापूंनी (डॉ. अनिरुध्द जोशी) दिनांक २५ सप्टेंबर २०१४ च्या हिंदी प्रवचनात “व्हेज चीज” व “नॉनव्हेज चीज”बद्दल माहिती सांगितली. चीज, जे आज अनेकांच्या सकाळच्या न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत स्थान घेऊन बसले आहे त्याच्या प्रकारांबद्दल व बनवायच्या प्रक्रियेबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे; व ही खरोखरच गंभीर बाब आहे. पण आज चीज हळू-हळू सॅन्डविच, सूप, पराठे, कोफता, पावभाजी, डोसा, पकोडे, टोस्ट, सॅलड, रोल्स्‌, पिझ्झा, बर्गर, इतकच काय तर आपल्या रोजच्या भाज्यांच्या रस्स्यामध्ये व अगदी आपल्या नेहमीच्या वडापावमध्ये सुध्दा जागा घेऊ लागलं आहे. त्यामुळे ह्या चीजबद्दल अधिक जाणून घेणं गरजेचं झालं आहे. म्हणून थोडक्यात पाहूया की चीज बनतं कसं.

चीज हा पदार्थ दूधापासून तयार होतो. चीज तयार करताना दूध घट्ट करण्याची प्रकिया असते. पण बर्‍याच वेळा ही प्रक्रिया जलद करण्यासाठी त्यात एक विशिष्ट पदार्थ घातला जातो ज्याचे नाव रेनेट्‌ (Rennet) आहे. 

Rennet  (http://en.wikipedia.org/wiki/ Rennet).

पण हे रेनेट येते कुठून? रेनेट्‌चा पारंपारिक स्त्रोत म्हणजे गोमांस. गायीच्या किंवा वासराच्या पोटातील आतड्यांमध्ये रेनेट्‌ सापडते, कारण सस्तन व रवंथ करणार्‍या प्राण्यांना अन्न पचनामध्ये ह्या रेनेटची आवश्यकता असते. ह्या रेनेटचा वापर करुन केलेल्या चीजला, “नॉन व्हेज चीज” म्हणतात. त्यामुळे हे असे रेनेट्‌ घातलेले चीज ज्यावेळेस आपण खातो तेव्हा आपण अप्रत्यक्षरित्या गोमांस भक्षणच करत असतो. भारतीय बाजारपेठेमध्ये व्हेजीटेरीयन चीजही मिळते. त्यातील काही भारतीय कंपन्यांनी बनवलेली आहे तर काही मल्टीनॅशनल कंपन्यानी बनवलेली आहे.

सनातन वैदिक धर्मात आपण गाईला ’गोमाता’ मानतो. श्रध्दावानांच्या ९ समान निष्ठांमध्येदेखील गोमाता, गंगामाता व गायत्रीमातेचा उल्लेख आहेच. गाय ही आपल्यासाठी पावित्र्याचं प्रतीक आहे.

चीज तयार करण्याची प्रक्रिया माहित नसल्या कारणाने अजाणतेपणे अनेकांकडून “नॉनव्हेज” चीज खाल्ले जाते. ज्यांना-ज्यांना नॉनव्हेज चीज खाणे टाळायचे आहे त्यांनी ह्यापुढे चीज किंवा चीज घातलेले पदार्थ विकत घेताना हे चीज “व्हेज चीज” आहे की “नॉनव्हेज चीज” आहे हे विचारणे आवश्यक आहे. बर्‍याच वेळेस उत्पादकांकडून चीजमध्ये रेनेट वापरल्याचा उल्लेख करण्याचे मुद्दाम टाळलेले असते. त्यावेळेस आपल्याला आपला चौकसपणा व आपली दक्षता वापरायलाच हवी. पण ह्याचा अर्थ चीजच खायचे नाही असा धरणे योग्य नाही.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥