नरजन्माचें काय कारण? - हेमाडपंत (The reason behind human birth -Hemadpant)

कालची दारासिंहाच्या मृत्युची बातमी सगळ्यांना दु:ख देऊन गेली. प्रत्येक भारतीय हळहळला, पण मरण हे जीवाची अपरिहार्यता आहे. साईसच्चरिताच्या ४३व्या अध्यायामध्ये हेमाडपंत आपल्याला हेच सांगतात.
जननापाठी चिकटलें मरण l एकाहूनि एक अभिन्न l मरण जीवप्रकृतिलक्षण l जीवाचे जीवन ती विकृती ll
- अध्याय ४३ ओवी ५२
मरण ही देहाची प्रकृति l मरण ही देहाची सुस्थिति l जीवन ही देहाची विकृती l विचारीवंती विचारिजे ll
- अध्याय ४३ ओवी ५६
पण मग हे जर असंच असेल तर जन्माला येऊन काय करायचं हा प्रश्‍न प्रत्येकाला पडू शकतो व पडतोच. जेव्हा लेखाजोखा करायची वेळ येते तेव्ह; "मी काय मिळविलं?" हा प्रश्‍न पडतोच. हा नरजन्म कशासाठी ह्या बद्दल हेमाडपंत लिहतात,  आला कोठूनि आहे कोण l नरजन्माचें काय कारण l एथील बीज जाणे तो प्रवीण l त्यावीण शीण मज सारा ll
- अध्याय ८ ओवी १६
शाश्‍वत सुख आणि शांति l हेंच ध्येय ठेवूनि चित्तीं l भूति भगवंत हे एक उपास्ति l परमप्राप्तिदायक ll
- अध्याय ८ ओवी ३१ 
आणि म्हणूनच हेमाडपंत समजावून सांगतात हा नरदेह कसा वापरु नये आणि कसा वापरावा. 
आहार-निद्रादी चतुष्टय l यांतचि होता आयुष्यक्षय l मग श्‍वांनां-मानवां भेद काय l करा निर्णय विवेकें ll
- अध्याय ८ ओवी १२
मानावा तो केवळ चाकर l नका बैसवूं त्या डोक्यावर l लाड नं पुरवा निरंतर l नरकद्वार करु नका ll
- अध्याय ८ ओवी ३३ 
पुढे जाऊन कळकळीने सांगतात,
म्हणोनि हा नरदेह निर्मून l इश्‍वर झाला आनंदसंपन्न l कीं विवेकवैराग्यातें वरुन l नर मद्‌भजन करील ll
- अध्याय ८ ओवी ५२
विनाशीं नर करितां साधन l होईल अविनाशी नारायण l नरदेहासम साधनसंपन्न l दुजा न आन ये सृष्टी ll
- अध्याय ८ ओवी ५३ 
आणि म्हणून प्रत्येक भक्ताला पुढे जाऊन विनंतीही करतात,
म्हणून झालें न जो शरीरपतन l आत्मज्ञाननार्थ करा यत्न l नरजन्माचा एकही क्षण l उपेक्षून  टाकूं नका ll
- अध्याय ८ ओवी ७८ 
हेमाडपंतांनी "नरजन्माचा एकही क्षण" उपेक्षित राहू नये यासाठी काय केलं? हेमाडपंतांनी साईनाथांनाच विनंती केली. मी तों केवळ पायांचा दास l नका करुं मजला उदास l जोंवरी ह्या देहीं श्‍वास l निजकार्यास साधूनि घ्या ll
- अध्याय ३ ओवी ४० 
पण ही अशी उच्च कोटीची विनंती हेमाडपंत का करु शकले असा प्रश्‍न आपल्या सारख्या सर्वसामान्य भक्तांना पडतो; आणि ह्याचे उत्तरही हेमाडपंतच आपल्याला देतात साईसच्चरिताच्या ४०व्या अध्यायामध्ये.
ध्यानीं मनीं साईचा ध्यास l हा तो निरंतराचा अभ्यास l सात वर्षांचा जरी सहवास l आंस न भास भोजनाचा ll
- अध्याय ४० अवी ११९
हा हेमाडपंतांचा "निरंतराचा" ध्यास आहे; ह्या जन्मातला, ह्याच्या आधिल जन्मातील ही आणि म्हणूनच कायमचाच (forever) प्रत्येक क्षणी हेमाडपंतांना ह्या साईचाच ध्यास होता. साईनाथ जेवावयास यावेत याचीच त्यांना "आस" होती; आणि म्हणूनच त्यांच्या करता "स्वप्न" हा भास नव्हता. म्हणून प्रत्येक साई भक्ताची वाट हेमाडपंतांच्याच वाटेने जाते.
ll हरि ॐ ll