अर्धांगवायूचा धोका... सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपेने वाचला जीव

- आलोकवीरा जैन, अंधेरी (प)

माझ्या पतींना आलेला सद्गुरु अनिरुध्द बापूंचा पुढील अनुभव कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळातील आहे.

 

           ४ जून २०२०, रात्री ९.४५ च्या सुमारास जेवण झाल्यावर माझे पती हॉलमध्ये टि.व्ही. बघत बसले होते. आमच्याकडे रात्री पाणी येत असल्याने आम्ही लवकर जेवून घेतो. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे रात्री पाणी आल्यावर पाणी भरायचे काम व स्वयंपाक घरातील इतर कामे मी करत होते. माझ्या भावाची मुलगी पूजा आमच्या शेजारीच राहते. त्यामुळे रोज त्यांचे आमच्याकडे घरी येणे जाणे असते. माझी भाची बाहेर माझ्या पतीबरोबर गप्पा मारत बसली होती. गप्पा मारताना अचानक तिची नजर ह्यांच्या चेहर्‍याकडे गेली. भाचीने ह्यांना विचारले, ‘‘काका, तुम्ही तुमच्या तोंडात काही भरून ठेवले आहे का? कारण तुमचा चेहरा मला वाकडा दिसतो आहे’’. ती लगेचच माझ्याकडेही आली व मलाही म्हणाली, ‘‘आत्या, मला काकांचा चेहरा जरा वाकडा झालेला वाटतो आहे’’. 

          तिचे बोलणे ऐकल्यावर मी लगेचच काम अर्धवट सोडून बाहेरच्या खोलीत गेले. त्यांच्याकडे बघितले तर मलाही त्यांचा चेहरा वाकडा झाल्यासारखा जाणवला. माझ्या मनात वेगळीच शंका यायला लागली. इतर कोणाचाही सल्ला न घेता मी लगेचच बापूंच्या फोटोकडे बघितले आणि प्रार्थना करून त्यांना विचारले, ‘‘बापू, मी आता काय करू’’? त्याच क्षणाला माझ्या मनात एक विचार आला. माझा विश्‍वास आहे की बापूंनीच मला संकट येण्याअगोदरच सतर्क केलेले होते. माझ्या मनात विचार आला तो असा की ह्यांना लगेच एकही क्षण न दवडता रुग्णालयात नेणे अत्यावश्यक आहे. मला जराही भिती वाटत नव्हती व माझ्यात इतकी हिम्मत आली, की मी ह्यांना म्हणाले, ‘‘मी तुम्हाला लगेच रुग्णालयात घेऊन जाणार आहे’’. मला सतत असेच वाटत होते की एका क्षणाचाही विलंब कदाचित ह्यांना त्रासदायक ठरू शकेल. मी लगेच माझ्या भावाला फोन केला आणि त्याला सांगितले की ह्यांना रुग्णालयात नेणे गरजेचे आहे. पण त्याच्यासाठीही न थांबता मी ह्यांना लगेच माझ्या दुचाकीवर बसवले व जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. माझे हे धाडसी रूप बघून माझे पतीही चक्रावले होते. रुग्णालयात गेल्यावर फक्त ८ ते १० मिनिटांच्याच अवधीत ह्यांना अतिदक्षता विभागात नेण्यात आले. अतिदक्षता विभागात दाखल करण्याइतपत ह्यांची प्रकृती बिघडलेली होती. पण ह्यांना बापूंनी त्याची जराही जाणीव होऊ दिली नाही. रुग्णालयातील डॉक्टरही मला म्हणाले, ‘‘एका क्षणाचा विलंबही घातक ठरला असता. तुम्ही योग्य ती वेळ गाठल्याने रुग्णाला वाचवता आले’’. त्यांना पॅरॅलेसिस (अर्धांगवायुचा) झटका आला होता.

 

          माझ्या सासरची मंडळी दिल्लीला स्थायिक आहेत. मी त्यांना फोन करून परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनाही ऐकून हायसे वाटले की ती वेळ निभावली गेली होती. माझे दीरही माझ्या घराच्याच शेजारच्या इमारतीत राहतात. त्यांच्याकडे गाडी असल्याने तेही मला म्हणाले, ‘‘मला सांगितले असते तर मी लगेचच ह्याला घ्यायला आलो असतो’’. मग मी त्यांना पटवून दिले की आपल्याकडे तुम्ही येईपर्यंतही वेळ नव्हता असे मला सतत अंतर्मनात वाटत होते’’. दीरांना त्यांची गाडी काढायला, ती पार्किंगमधून वळवायला तसेच कपडे करून बूट वगैरे घालायला वेळ लागलाच असता. त्या वेळेच्या आधीच हे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुखरूप ट्रिटमेन्ट घेत होते.

 

          माझ्या मनात बापूंच्या फोटोकडे बघितल्यावर आलेल्या पहिल्या विचाराने ह्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. पुढे येणारे संकट बापूकृपेनेच रोखले गेले होते. मी खूप अंबज्ञ आहे.