गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ९
सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.
‘विच्चे’ शब्द बनतो तीन गोष्टींपासून. ‘विद्’ धातु आहे, ‘विद्’ धातु. जसं ‘नम:’ मध्ये नम्-नमामि हा धातु पूर्णत्वाने आला. इकडे ‘विद्’ धातु फक्त एक अंग आहे, लहानसं अंग आहे. ‘विद्’ म्हणजे जाणणे, तेसुद्धा कसं? सुस्पष्टपणे जाणणे, व्यवस्थित जाणणे, नीट जाणणे आणि सर्व जाणणे म्हणजे विद्, विद्. विद् धातुचा अर्थ आहे, सर्वसमर्थपणे आणि सर्वांगाने जाणणे, विद्.
‘च’, ‘च’, ‘च’ चा एक अर्थ सरळ सरळ आहे म्हणजे आणि मराठीमध्ये आपण त्याला आणि म्हणतो, हिंदी मध्ये और म्हणतो, इंग्लिश मध्ये अॅण्ड म्हणतो. तो ‘च’ शब्दाचा अर्थ आहे परंतु इथे मात्र ‘च’ येतो, संस्कृतमधल्या दुसर्या अर्थाने म्हणजे सर्व अनेकविध गोष्टींचा, अनेकविध गोष्टींना एकत्र आणून, त्यांच्यामधलं जे काही उचित आहे, ते एकत्र आणून, त्यांचा समन्वय साधून सर्वात बेस्ट गोष्ट बनवणं म्हणजे ‘च’, आलं लक्षामध्ये, ‘च’ समन्वय आहे.
‘च’ म्हणजे काय उचिताचा समन्वय. जगातलं जे जे म्हणून बेस्ट आहे ते सगळं एकत्र आणून, त्यांच्यामधलं जे काय चुकीचं असेल ते बाजूला काढून, ते बेस्ट जे प्रत्येकातलं आहे, प्रत्येक वस्तूमधलं आहे, ते एकत्र केलं तर काय तयार होईल? ती ‘च’ क्रिया आहे, आलं लक्षामध्ये? म्हणजे जगातल्या पाठीवर आज जेवढी माणसं आहेत त्या माणसांमधले फक्त चांगले गुणधर्म एकत्र आणले, चांगल रूप एकत्र आणलं, चांगली क्रिया एकत्र आणली आणि एक माणूस बनवला आणि एक स्त्री बनवली. सगळ्या स्त्रियांमधून एक स्त्री, सगळ्या पुरुषांमधून एक पुरूष त्यांच्यामध्ये कुठलाही, कुणाचाही वाईट गुणधर्म आलेला नाही तर काय बनेल? बेस्ट मॅन ऍण्ड बेस्ट वुमन बनतील, बरोबर, बेस्ट पुरूष आणि बेस्ट स्त्री बनतील. ही च-कार क्रिया आहे, ही ‘च’ चा प्रभाव आहे.
तर ‘च’ म्हणजे काय, सर्व उचिताचा समन्वय साधून त्याच्यामधून अधिक उचित, श्रेष्ठ उचित बनवणं, आलं लक्षामध्ये. सुचित शब्दाचा हा अर्थ आहे, आलं लक्षामध्ये की सर्व बेस्टचा अर्क काढून त्याच्यापासून जे बेस्ट बनलं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की ग्रामर तोडून तर बेस्टेस झालं ते च-कार क्रिया आहे. ‘विद्’ आणि ‘च’ आणि मग येते ‘इ’. ‘इ’ गतौ, ‘इ’ गती आहे आणि ‘इ’ ऊर्जा आहे.
‘इ’ शब्दाचा अर्थ होतो गती किंवा अक्षराचा अर्थ होतो गती करणं किंवा ऊर्जा. म्हणजे काय? सर्व उचितपणे जाणणं, समर्थपणे जाणणं, जाणून त्यातलं उचित जे आहे, ते सगळ एकत्र आणणं, ते एकत्र आणलेल्यातलं सगळ बेस्ट आहे, त्याचं मिळून एक समन्वय करून एकच गोष्ट घडवणं आणि त्याला गती देणं. गती देणं म्हणजे ती गती नाही मोक्ष दिला वगैरे ती गती. त्याला गती देणं म्हणजे त्याला स्पीड देणं, म्हणजेच कार्यात आणणं आणि कार्याचा वेग वाढता ठेवणं, बरोबर आणि तेसुद्धा कसं? तर ऊर्जेने, ऊर्जेसहित. कसा तरी चाललाय मनुष्य पाय रेटत, हात रेटत नाही तर उत्साहित, उत्साहाने चाललेला आहे, वीरश्रीने चाललेला आहे, असं जे सगळं मिळून जे काही आहे ते ‘विच्चे’ आहे.
सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll