श्री दुर्गा भगवती आराधना (श्रीयंत्र महाभिषेक पूजन)
काल मंगळवार, दिनांक २२ डिसेंबर २०१५ रोजी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्मध्ये "श्री दुर्गा भगवती आराधना (श्रीयंत्र महाभिषेक पूजन)" हा सोहळा अत्यंत मंगलमय व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पूर्ण वेदोक्त पद्धतीने व नंदाईंच्या उपस्थितीत होणार्या ह्या पूजन व अभिषेक सोहळ्याची सुरुवात सकाळी ९.०० वाजता शांतीपाठाने झाली.
ह्या सोहळ्याचे प्रमुख वैशिषट्य होते ते पूजनस्थळी विराजमान झालेले, एरव्ही परमपूज्य बापूंच्या निवासस्थानी देवघरामध्ये असलेले व विशेष पद्धतीने घडवून घेतलेले पंचधातूचे त्रिमितीय श्रीयंत्र. सकाळी ११.०० ते दुपारी १.०० तसेच दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत, बापूंनी वारंवार ज्याचे महत्त्व विषद केलेले आहे अशा परमपवित्र श्रीसूक्ताची १६०० आवर्तनं होताना, त्रिमितीय श्रीयंत्रावर सुगंधित जलाने अखंड अभिषेक करण्यात आला. ह्या अभिषेकासाठी श्रीरामनवमी उत्सवात श्रीरेणुकामतेच्या पूजनाच्या वेळी वापरण्यात येणारे २७ छिद्र असलेले विशेष अभिषेकपात्र वापरण्यात आले होते.
श्रीसूक्ताची आवर्तनं होत असताना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्मधील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर महानैवद्य अर्पण करण्यात आला व महाआरतीच्या जल्लोषात सोहळ्याची भावपूर्ण सांगता करण्यात आली.
अनेक श्रद्धावानांनी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्ला भेट देऊन ह्या मंगल सोहळ्याचा आगळा आनंद लूटला. स्वत: परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादांनी वेळोवेळी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्मध्ये उपस्थित राहून श्रद्धावानांच्या आनंदात भर घातली.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥