पीतं वासो वसानं : रामरक्षा ध्यानमंत्रातील सगुण-निराकार भाव

रामरक्षा ध्यानमंत्र - “पीतं वासो वसानं”चा अर्थ

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापू रामरक्षा या स्तोत्रमंत्र मालिकेतील ८व्या प्रवचनात सांगतात, रामरक्षेच्या ध्यानमंत्रात “पीतं वासो वसानं” म्हणजे पिवळे वस्त्र धारण केलेल्या रामाचे वर्णन आहे. पिवळा रंग हा रामाच्या, म्हणजेच महाविष्णूच्या त्या सद्गुरुतत्त्वाच्या गुणधर्मांशी अभिन्नरित्या जोडलेला आहे.

बापू संत जनाबाईंचा एका अंभगातील ’नाचता नाचता हरीचा पितांबर सुटला, सावर सावर देवा ऐसे कबीर बोलला।’ या ओळीचा आध्यात्मिक अर्थ सांगताना बोलतात की पांडुरंगाचा पितांबर सुटतो म्हणजे जेव्हा भक्त नामात, भजनात, नाचात पूर्ण तल्लीन होतो तेव्हा देवाचे सगुण रूप म्हणजे त्याचे बाह्य आवरण दूर होते आणि त्याचे खरे मूळ स्वरूप दिसू लागते. पण भक्त ते सहन करू शकत नाही म्हणून संत कबीर बोलतात “देवा, सावर!”

सगुण-साकार आणि निर्गुण-निराकार ही दोन्ही रूपे समान श्रेष्ठ आहेत, पण त्यांच्या मधला एक प्रांत आहे — सगुण निराकार. जसा वारा दिसत नाही पण जाणवतो, तसा हा सगुण निराकार प्रांत. हा सगुण निराकार प्रांत म्हणजेच “पीत वस्त्र”, म्हणून रामाचे पिवळे वस्त्र हे फक्त कपडे नाहीत, तर देवाच्या मूळ स्वरूप आणि त्याच्या सगुण रूपाच्या मधील आच्छादन आहे.

भक्तीतील तल्लीनता - अज्ञानाचे पडदे दूर करणारा क्षण

हा मूळ परमात्मा सगुण साकार होऊन आलेला असतो आणि तरी त्याचं मूळ रुप बघण्याची भक्तांची इच्छा असतेच. परंतु संपूर्ण अष्टभावांनी, भक्ताचे शरीर, मन, बुद्धी, पंचप्राण, आत्मा सगळं काही फक्त ह्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, गजरामध्ये जेव्हा तल्लीन होते, त्याच क्षणाला भक्ताला परमात्म्याचं एकेक स्वरुप दिसायला लागते. भक्त भक्तीत भान विसरत नाही, तल्लीन होत नाही तोपर्यंत अज्ञानाचे पडदे दूर होणं शक्य नसते.

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध पुढे सांगतात, भगवंताची मूर्तीपूजा ही फक्त फुले वाहणे, पाणी अर्पण करणे एवढ्यावर मर्यादित नसते. खरी पूजा तेव्हाच त्या भगवंतापर्यंत पोहोचते जेव्हा मनात भाव येतो की ही केवळ मूर्ती नसून माझा भगवंतच आहे. हा भाव म्हणजेच सगुण-निराकार भाव,

आणि ही सगुण निराकारता म्हणजेच ‘पीतवस्त्र’. जेव्हा हा भाव दृढ होतो तेव्हा भक्त बेभान होतो आणि परमात्म्याचं एकेक सगुण स्वरुप माझ्यासमोर आपोआप प्रगटायला लागतं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मला त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपाचीही प्रचिती येते. वेद सांगतात – “नेति नेति” – म्हणजे असे नाही, तसेही नाही; असं म्हणता म्हणता आपल्याला खरा अनुभव मिळतो. जसे एखाद्या माणसाबद्दल समजतं की तो वाईट नाही, मग आपोआप कळते की तो चांगलाच आहे.

त्याचप्रमाणे परमेश्वराबद्दल सगुण-निराकारभाव आमचा मनामध्ये उत्पन्न होतो आणि स्थिर होतो, आमच्या प्राणांमध्ये स्थिर होतो आणि आपल्याला कळते की ही मूर्ती नाही आहे, हा परमात्माच आहे, हा माझा देवच आहे, हा सगळं काही करु शकतो. हा माझी प्रत्येक गोष्ट एकतोच आहे, बघतोच आहे, ह्याला सगळं कळतच आहे, हा भाव जेवढा माझा खंबीर होत-होत, एकशे आठ टक्के होतो, त्या क्षणाला पितांबर सुटतो.

भक्त आणि भगवंतामधील ‘अंतरपाट’ म्हणजे पीतवस्त्र

पीतवस्त्र म्हणजे भक्त आणि भगवंत यांच्यातला अंतरपाट. लग्न लागेपर्यंत पती-पत्नींमध्ये एक अंतर असायला हवं म्हणून मध्ये एक वस्त्र धरलं जातं त्याला अंतरपाट म्हणतात. लग्नातील अंतरपाट जसा ’शुभमंगल सावधान’ बोलल्यानंतर दूर होतो, तसेच भक्त व भगवंतामधील अंतर भक्ती व ध्यानाने दूर होते. परमेश्वर आणि मी ह्यांच्या मध्ये मी जेवढा परमेश्वरापासून लांब आहे ते अंतर म्हणजे माया आणि जेवढा मी परमेश्वराच्या जवळ आहे, ती जवळीक म्हणजे शुद्धविद्या. आम्हा दोघांमध्ये हा जो पडदा आहे, हे जे अंतर आहे ते आम्हाला त्याचेच म्हणजे त्या रामाचेच ध्यान करुन, त्याच्या त्या पीतवस्त्राचे ध्यान करुन दूर करायचे आहे.

ह्यानंतर बापूंनी वारकरी संप्रदायातील संत जनाबाईंच्या गोष्टीद्वारे पींताबरामागील भाव समजावून सांगितला. बुधकौशिक ऋषी या रामरक्षेमध्ये सांगतात की या पीतवस्त्रधारी रामाचे ध्यान सगुण-निराकार भावामध्ये करावे. आमचा भाव, आमची भक्ती बहुतेक वेळा काहीतरी मिळविण्यासाठी म्हणजेच साकार आणि काम्यभक्ती असते—अमुक मिळालं तर भक्ती, नाहीतर दुसरा देव. पण परमेश्वर एकच आहे, ‘सबका मालिक एक’. म्हणून भक्ती ही फळासाठी नसून परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी असावी. देवाला आपण आकारात अडकवू नये; तो ‘केशव’ आहे—म्हणजे आकृतीच्या पलीकडचा. भक्ती ही निराकार भावाकडे नेणारी असावी.

पीतवर्ण — परमेश्वरी शक्तीच्या उदयाचा रंग

राम आणि कृष्ण हे दोघेही पिवळा पितांबर धारण करतात. हा पिवळा रंग म्हणजे परमेश्वरी शक्तीच्या उदयाचा रंग आहे. जसा सूर्य उगवताना सोनेरी पिवळा रंग प्रकटतो, तसा हा पीतवर्ण म्हणजे परमेश्वरी शक्तीचे प्रगटीकरण. राम सूर्यवंशीच आहे, साक्षात सूर्यच आहे. हा आकाशात दिसणारा सूर्य म्हणजे राम नव्हे, तर अशा अनंत सूर्यांचा जो सूर्य आहे, जो सवितृ आहे तो राम आहे. रामाचं ध्यान करताना, माझ्या डोळ्यासमोर किंवा मनामध्ये हे पीतवस्त्र जेव्हा दिसायला लागेल तेव्हा माझ्या मनात हीच प्रार्थना केली पाहिजे की ‘पीतवस्त्र म्हणजे रामाचा उदय’. मी पीतं वासो वसानं’ म्हणतो, तेव्हा माझ्या मनामध्ये रामाचा उदय होत असतो. म्हणूनच रामरक्षेच्या ध्यानमंत्रात ‘पीतं वासो वसानं’ आले आहे.

परमेश्वर आणि परमेश्वराची कृपा ह्या वेगळ्या गोष्टी नाहीत. म्हणूनच माझ्या मनामध्ये रामाचा उदय झाला म्हणजे त्याची कृपा झालीच. ह्यासाठी मला ‘सगुण निराकार’ भावाचं पीतांबर धारण करायला पाहिजे. मी ज्याक्षणी ते पितांबर धारण करीन त्याच क्षणालाच मी त्या रामाचं ध्यान नीट करू शकेन. मी रामाचा पितांबर धारण करणे म्हणजे रामाचा जो भाव भक्ताविषयीचा आहे, तसा माझा भाव परमेश्वराविषयी असणे होय.

पीतवर्ण — प्रत्येक मानवाचा खरा कैवारी

हा पीतवर्ण आपली साथ कधीच सोडत नाही. जेव्हा देहातून प्राण निघून जातात, तेव्हा पंचप्राण बरोबर त्या माणसाचं अंतर्मन व लिंगदेह घेऊन जातात. या लिंगदेहाचा वर्णही पिवळाच असतो. नवीन जन्मातही लिंगदेहासोबत हाच रंग असतो. म्हणूनच पिवळा पितांबर म्हणजे आपला खरा कैवारी. माझ्या लिंगदेहालासुद्धा सुरक्षितपणे देहाच्या बाहेर घेऊन जाणारा, तेथून परत नवीन जन्मामध्ये मला आणणारा हा पीतवर्ण, ह्या परमेश्वराच्या अंगावरील वस्त्राचा रंग बनलेला हा पिवळा रंग, ह्या संपूर्ण पृथ्वीला शक्ती पुरविणार्‍या ह्या सूर्याच्या उदयाचा रंग असलेला हा पिवळा वर्ण आणि म्हणूनच माझ्या रामाचे ध्यान करताना ‘पीतंवासोवसानं’ म्हणजे पिवळे वस्त्र धारण करणारा राम माझ्या डोळ्यासमोर यायला हवा.