सद्‌गुरूमहिमा ( Sadguru mahima)

ll  अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ll
 
ll ॐ नमश्चण्डिकायै ll
 
इतर देव सारे मायिक l गुरुचि शाश्‍वत देव एक l चरणीं ठेवितां विश्वास देख l ‘रेखेवर मेख मारी’ तो ll
                            - श्रीसाईसच्चरित अध्याय १० ओवी ४
 
सद्‌गुरुंची महती सांगणार्‍या अनेक ओव्या श्रीसाईसच्चरितात येत राहतात; पण माझ्या मनाला मात्र कायम ही ओवी व्यापून राहिली. या एकाच ओवीत हेमाडपंत सद्‌गुरुंच्या चरणांचं महत्त्व पटवून देतात. भक्ताने सद्‌गुरुंच्या ठायी विश्‍वास ठेवायचा, पण नक्की कुठे? या प्रश्‍नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. हेमाडपंत स्वत:चा अनुभव सांगतात.
 
लाधलों साईंचा चरणस्पर्श l पावलों जो परामर्ष l तोचि या जीवाचा परमोत्कर्ष l नूतन आयुष्य तेथूनि ll
                            - श्रीसाईसच्चरित अध्याय २ ओवी १४०
 
हा अनुभव मी स्वत:ही घेतलाय. १९९७च्या गुरुपौर्णिमेला माझ्या सद्‌गुरुंचं, परमपूज्य बापूंचं "पाद्यपूजन" मी केलं. हा माझ्या जीवनाचा "परमोत्कर्ष" आणि खरंच त्या दिवसापासून "नूतन आयुष्य चालू झालं". माझ्या सद्‌गुरुंनी माझ्या दादानंतर मला ह्या पाद्यपूजनाची संधी दिली हे त्यांच अकारण कारुण्य. आज आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करताना माझ्या मनात ह्या मागील आठवणी तशाच ताज्या आहेत.
 
श्री साईसच्चरिताच्या ११व्या अध्यायातील १५२वी ओवी बापूंनी माझ्या वडिलांकडून मला गुरुमंत्र म्हणून दिली. पुरेल अपूर्व इच्छित काम l व्हाल अंतीं पूर्ण निष्काम l पावाल दुर्लभ सायुज्यधाम l अखंड राम लाधाल ll
Sadguru, Saibaba, Shirdi, Sai, Sai mahima, leela, idol, Hemadpant, Adyapipa, Vaidya, Suresh Vaidya,
या साईनाथांच्या मूर्तिवर काका नित्य अभिषेक करीत असत.
 
साईनाथांनी स्वत: निंबवृक्षाखाली असलेल्या भुयारासंबंधी म्हटलं,
 
"हे माझ्या गुरुचे स्थान l अति पवित्र हे माझे वतन ll" 
 
त्यानंतर ह्याच ठिकाणाजवळ निंबातळी (गुरुस्थानी) श्री अक्कलकोट स्वामींच्या पादुकांची स्थापना करून घेतली..
 
आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या आवडीच्या सद्‍गुरुंची महती सांगणार्‍या ओव्या खाली देत आहे.
 
 
तन-मन-धन सर्व भावें। सद्‌गुरूपायीं समर्पावें। अखंड आयुष्य वेंचावें। गुरुसेवेलागुनी॥५७॥- अध्याय-१
 
गुरु जननी गुरु पिता। गुरु त्राता देव कोपतां। गुरु कोपतां कोणी न त्राता। सदा सर्वदा जाणावें॥२१॥- अध्याय १८
 
नलगे साधनसंपन्नता। नलगे षट्‍शास्त्रचातुर्यता। एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा॥७४॥ - अध्याय १९
 
मग काका सुरा टाकोन। काय वदती द्या अवधान। "बाबा आपुलें अमृतवचन। धर्मशासन तें आम्हां॥१७०॥
 
आम्ही नेणूं दुजा धर्म। आम्हां नाहीं लाज शरम। गुरुवचनपालन हेंच वर्म। हाचि आगम आम्हांतें॥१७१॥
 
गुर्वाज्ञापरिपालन। हेंचि शिष्याचें शिष्यपण।हेंचि आम्हां निजभूषण। अवज्ञा दूषण सर्वार्थीं॥१७२॥
 
होऊं सुखी अथवा कष्टी। परिणामावर नाहीं दृष्टी। घडेल असेल जैसें अदृष्टीं। परमेष्ठीला काळजी॥१७३॥
 
आम्हां तों एकचि ठावें। आपुलें नाम नित्य आठवावें। स्वरूप नयनीं सांठवावें। आज्ञांकित व्हावें अहर्निशीं॥१७४॥
 
गुर्वाज्ञा जेथ स्पष्ट। युक्तायुक्त वा इष्टानिष्ट। हें विचारी तो शिष्य नष्ट। सेवाभ्रष्ट मी समजें॥१७६॥
 
गुर्वाज्ञेचें उल्लंघन। तेंच जीवाचें अधःपतन। गुर्वाज्ञा-परिपालन। मुख्य धर्माचरण हें॥१७७॥
 
चित्त गुरुपदीं सावधान। राहोत कीं जावोत प्राण। आम्हां गुरुचीच आज्ञा प्रमाण। परिणाम निर्वाण तो जाणे॥१७८॥
 
आम्ही नेणों अर्थानर्थ। आम्ही नेणों स्वार्थपरार्थ। जाणूं एक गुरुकार्यार्थ। तोचि परमार्थ आमुतें॥१७९॥
 
गुरुवचनाचिया पुढें। विधिनिषेध व्यर्थ बापुडे। लक्ष गुरुनियोगकर्तव्याकडे। शिष्याचें सांकडें गुरुमाथां॥१८०॥
 
आम्ही आपुल्या आज्ञेचे दास। योग्यायोग्य नाणूं मनास। वेळीं वेंचूं जीवितास। परी गुरुवचनास प्रतिपाळूं"॥१८१॥- अध्याय २३ 
गुरूचि सत्य माता-पिता। अनेका जन्मींचा पाता-त्राता।  तोचि हरिहर आणि विधाता। कर्ता-करविता तो एक॥६०॥ - अध्याय २५
 
गुरू एक दृष्टीचें ध्यान। इतर सर्व गुरुसमान। नाहीं गुरुविण दुजें आन। ‘अनन्य अवधान’ या नांव॥८१॥ - अध्याय ३२
 
वर दर्शवलेल्या मार्गाने आपण गेलो तर प्रत्येक भक्ताची स्थिती ’अखंड राम लाधाल’ अशी होईल, अशी मला खात्री आहे.