Aniruddha Bapu's blessings help me to recover fast after Hernia and Amniotic sac removal operation

 
 
 

बापूंच्या आशीर्वादाने मी हर्निया आणि अम्नीओटिक सॅक ऑपरेशननंतर खूप लवकर बरे झाली

 
- जया सोनवणे, नाशिक
 

 

आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला छोटे-मोठे अनुभव येतच असतात. त्यातलाच हा एक अनुभव.

तो अनुभव असा की मला 5-6 महिन्यांपासून मासिक पाळी आली नव्हती. मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना सांगितले असता, त्यांनी चेकअप करून सांगितले की काही काळजी करू नका. असे एक दोन वेळा झाले. त्यानंतर काही दिवसांनी रक्तस्त्राव सुरू झाला व तो काही केल्या थांबत नव्हता. तेव्हा आपल्या बापूपरिवारातील अनितावीरा पाटोळे मला त्यांच्या स्त्रीरोगतज्ञ दिराकडे घेऊन गेल्या. त्यांनी माझे चेकअप करून औषध व गोळ्या दिल्या. पण रक्तस्त्राव थांबत नव्हता. दुसर्‍या दिवशी डॉक्टरांनी लगेचच क्रिटींगची तयारी केली.

क्रिटींग करून गर्भपिशवीतील रक्ताचे गोळे काढले व ते रक्ताचे गोळे कॅन्सरचे असावेत अशी शंका आल्यामुळे चेकअपसाठी पाठविले. इकडे आमचा सर्वांचा बापूंकडे धावा चालू झाला की बापू रिपोर्ट नॉर्मल येऊ देत. आपल्या लेकरांच्या हाकेला सदैव तत्पर उभ्या असणार्‍या त्या माऊलीच्या कृपेने ते सर्व रिपोर्ट नॉर्मल येऊ दिले. तरी पण डॉक्टरांनी गर्भपिशवी काढून टाकण्यास सांगितले. दिवाळीनंतर सुट्टीमध्ये ऑपरेशन करण्याचे ठरविले.

तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की तुम्हाला आता लवकर मासिक पाळी येणार नाही. त्यामुळे परमपूज्य नंदाईच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी आणि माझी मुलगी 11 ऑगस्ट 2011 ला मुंबईला आलो. परंतु नेमकी त्याच दिवशी मला पुन्हा मासिक पाळी आली. गुरुक्षेत्रम्मधील एका स्वयंसेवकाने माझ्या तब्येतीची चौकशी केली व लगेच परमपूज्य डॉ. सुचितदादांकडे जाण्यास सांगितले.

दादांकडे गेले असता, दादांनी ‘रिपोर्ट आणले का?’ असे विचारले. पण हे अवचित घडले असल्यामुळे मी कसलीच तयारी करून आले नव्हते. त्यामुळे मी तोंडीच दादांना ऑपरेशनची कल्पना दिली. ‘‘काही काळजी करू नका’’ असे दादांनी सांगितले.

त्यानंतर संध्याकाळी श्रीहरिगुरुग्रामला गेल्यावर आईचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला. भरपूर ब्लीडिंग होत असूनही मी गजराला खूप नाचले. रात्रीच्या ट्रेनने आम्ही घरी परतलो.

15 ऑगस्ट रोजी सकाळी डॉक्टरांचा फोन आला की आज ऑपरेशन करायचे आहे. माझ्या दोन्ही मुलींनी मला धीर देऊन म्हटले, ‘‘आपण बापूंची बाळे आहोत तर घाबरायचे कशाला?’’

हॉस्पिटलमध्ये येताना अनितावीरा माझ्या सोबतच होती. पैसे जमा न करताही ऑपरेशनसाठी लागणारे मेडिकलचे सर्व सामान आणलेले होते. गर्भपिशवी, हर्निया आणि पोटातील चरबी ऑपरेशन करून काढून टाकली गेली. ऑपरेशन करतेवेळी बापू सोबतच असल्याचे मला वाटत होते. साधारण 1 ते 5 पर्यंत ऑपरेशन चालू होते. मला दुसर्‍या दिवशी शुद्ध आली. डॉक्टरांनी मला 6 महिन्यांची बेडरेस्ट सांगितली. 20 ऑगस्ट रोजी मला डिसचार्ज मिळाला.

त्या दिवशी माझा नेमका वाढदिवस होता. मी घरी आले होते. त्या दिवशी मला माझ्या सद्गुरुरायाकडून छान गिफ्ट मिळाली. अक्षरशः ऑपरेशन झाल्यावर आप्त बघायला येतात त्याप्रमाणे चक्क बापू मला बघायला आले - पादुकांच्या रूपाने! त्याचं झालं असं की आमच्या उपासना केंद्रातील श्री. ओक केंद्राचे सामान घेण्याकरिता आमच्या घरी आले. त्यावेळेस त्यांनी बोलता बोलता बापूंच्या पादुका गाडीत असल्याचे सांगितले. मी घाईने औक्षणाची तयारी करून औक्षण केले. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बापू स्वत:च (पादुकारूपाने) भेटायला माझ्या घरी आले होते. औक्षण करताना मी खूप रडले.

हे तर पादुकारूपाने मला बापूंचे दर्शन झाले, पण त्यानंतर दीड महिन्यांनी परमपूज्य बापू स्वतः जळगाव दौर्‍यावर आले होते. परतताना गाडी नाशिकरोड इथे थांबली, तेव्हा त्यांच्या दर्शनाकरिता हजारो श्रद्धावान स्टेशनवर गर्दी करून उभे होते. मला खरं तर त्यावेळेस डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली होती. पण मला राहवेना. मीही तिथे कशीबशी गेले. बापूंची वाट पाहत असताना ट्रेन आली. बापू ट्रेनच्या दरवाजात उभे होते. जमलेले श्रद्धावान बेभान होऊन त्यांचा जयजयकार करीत होते. जमलेल्या प्रत्येक श्रद्धावानाकडे त्यांनी कृपादृष्टीने बघितले. मी दूरवर उभी होते. माझ्याकडेही बापूंनी बघितले व बघताना एवढ्या गर्दीमधूनही त्यांनी ‘आता ओके  ना?’ असा प्रश्‍नार्थक इशारा केला व दोन्ही हातांनी आशीर्वाद दिला. मी हात जोडून बापूंना सांगितले की आता सगळं ओके आहे.

त्यानंतर अक्षरशः केवळ अडीच महिन्यांत सर्व नॉर्मल झाले. ही फास्ट रिकव्हरी पाहून डॉक्टरांनीही कौतुक केले. 6 महिन्यांची बेडरेस्ट, 1 वर्षासाठी कामातून ब्रेक आणि प्रवासास मनाई करण्यात आली होती. परंतु अडीच महिन्यांतच मी सर्व काम करू लागले होते व एका वर्षाच्या आतच मी आत्मबलच्या क्लासलाही जाऊ लागले होते.

हे सर्व फक्त बापूच घडवून आणू शकतो. अशी ही माझी प्रेमळ गुरुमाऊली!

अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण।
तयासी कैसा भय दु:ख भार।