पिपा तुझा दास, बापू तुझी आस - आद्यपिपा

पिपा तुझा दास, बापू तुझी आस - आद्यपिपा

आज गोकुळाष्टमी. सन २००५ साली आजच्याच दिवशी म्हणजे गोकुळाष्टमीस आद्यपिपांचे म्हणजे ‘काकांचे’ निर्वाण झाले. मी व दादा (सुचितदादा) त्यांना ‘काका’ म्हणूनच हाक मारत असू.  

‘भक्तिमार्गावरून चालताना पाय जमिनीवर ठेवून, लघुरूप धारण करून, रूपकात्मक अर्थाने मुंगीसारखे लहान होऊन प्रवास केला पाहिजे आणि सद्गुरुभक्तीचे माधुर्य सतत धारण केले पाहिजे’ असा आद्यपिपांचा निर्धार व विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी ज्या मार्गावरून सद्गुरुभक्तीचा प्रवास यशस्वीपणे केला, त्यास ‘पिपिलिकापथ' असे म्हटले जाते. भक्तिभावचैतन्यात राहू इच्छिणार्‍या प्रत्येकाला सद्गुरुचरणी नेऊन स्थिर करणार्‍या पिपीलिकापथाचे आद्य पांथस्थ म्हणून आपण सर्वजण त्यांना ‘आद्यपिपा’ असे संबोधतो.  

पिपा तुझा दास, बापू तुझी आस’ ही ओळ प्रत्यक्ष जगलेल्या आद्यपिपादादांच्या ‘पिपासा’ या भक्तिरचनांद्वारे आम्हां सर्वांना सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या म्हणजेच बापूंच्या भक्तिभावचैतन्यात राहण्याविषयी सुस्पष्ट मार्गदर्शन मिळते.   

सन १९४० साली, आद्यपिपांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे वडील त्यांना घेऊन शिर्डीला गेले. येथे सद्‍गुरु श्रीसाईनाथांचे, द्वारकामाई, समाधिस्थानाचे दर्शन घडवले, त्यांना तेथील उदी दिली. सद्‍गुरुंचे, सद्‍गुरुभक्तीचे माहात्म्य आणि ह्या स्थानांचे व उदीचे महत्त्वही सांगितले. त्या दिवसापासून त्यांचे जीवन सद्‍गुरुभक्तिमय झाले.  

वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे १९४५ साली त्यांनी श्रीसाईसच्चरिताचे दर वर्षी कमीत कमी चार सप्ताह करण्याचा संकल्प केला. श्रीसाईसच्चरिताचे वाचन, चिंतन आणि मनन हा त्यांचा पुढील साठ वर्षांचा जीवनप्रवास ठरला.  

‘गुरुपौणिमा गोकुळअष्टमी । पुण्यतिथी रामनवमी । या साईंच्या उत्सवीं नियमीं । ग्रंथ निजधामीं वाचावा ॥’ असे श्रीसाईसच्चरिताच्या ५२व्या अध्यायातील ५३व्या ओवीत स्वत: हेमाडपंतांनी लिहिले आहे. त्यानुसार रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी व विजयादशमी (दसरा) या दिवशी ते त्यांच्या सप्ताहाची सांगता करत.  

सतत साठ वर्षे अव्याहतपणे त्यांचा हा नेम सुरू होता आणि २६ ऑगस्ट २००५ रोजी गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर त्यांच्या लौकिक जीवनाध्यायाची सांगता झाली.    

आद्यपिपांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला शिरडी साईनाथांच्या भक्तीचा वारसा त्यांनी निष्ठेने जपला आणि पुढे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भेटीनंतर त्यांचा भक्तिमार्गावरील प्रवास वेगाने सुरू झाला. ‘बापू भेटला ज्या क्षणी, मन हे जाहले उन्मनी’ असे आद्यपिपा बापूंना भेटताच झालेल्या त्यांच्या भावपूर्ण मन:स्थितीचे वर्णन करताना म्हणतात. आद्यपिपांच्या पत्नी सौ. शुभदा यांची म्हणजेच आमच्या आईची त्यांना त्यांच्या या प्रवासात मोलाची साथ लाभली.  

त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ श्रीक्षेत्र गुरुकुल जुईनगर येथे १९ एप्रिल २००७ रोजी त्यांच्या रक्षाकलशाची स्थापना करून समाधि स्मारकाची स्थापना सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या उपस्थितीत करण्यात आली.  

आद्यपिपांच्या वडिलांना सद्गुरु साईनाथांकडून मिळालेली उदी त्यांनी आद्यपिपांकडे दिली होती आणि आद्यपिपांना सद्गुरु श्रीअनिरुद्धांकडून उदीचा प्रसाद लाभला होता. आद्यपिपांकडील ह्या उदीसही त्यांच्या समाधि स्मारक स्थानी ठेवण्यात आले.  

समाधि स्मारकास एकूण सहा पायऱ्या असून त्यांतील प्रत्येक पायरी एकेका पुरुषार्थाचे प्रतिनिधित्व करते. पिपीलिकामार्गावरून प्रवास करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष, भक्ती आणि मर्यादा ह्या पुरुषार्थांची सिद्धता करण्याचे स्मरण हे समाधि स्मारक करून देते. आद्यपिपांच्या नित्यपठणातील श्रीसाईसच्चरिताची पोथी समाधि स्मारक स्थानी ठेवली असून पाठीमागे सद्गुरु श्रीसाईनाथांची तसबीरही आहे.  

ज्याप्रमाणे अनिरुद्ध भक्तिभावचैतन्यात राहून आद्यपिपांनी ‘मीच ह्याचा हाचि माझा, अनिरुद्ध अवघा, पिपाचा अनिरुद्ध अवघा’ हे अनिरुद्धभक्तीचे शिखर गाठले, त्याप्रमाणे प्रत्येक जण पिपा होऊन म्हणजेच पिपीलिकापांथस्थ होऊन अनिरुद्धभक्तिमार्गातील सर्वोच्च ध्येय गाठू शकतो ही प्रेरणा आद्यपिपादादांच्या रचना देतात.     

‘धीर धरहु ना होऊ उदासा । सब मिली जाऊ अनिरुद्ध पासा ॥’ असे अनिरुद्धचलीसात सांगणारे आद्यपिपा आमची श्रद्धा-सबुरी दृढ करण्याचा मार्ग दाखवतात व त्याचबरोबर ‘पिपा तुझा दास, बापू तुझी आस’ हे सांगून सद्‍गुरुंची आस आणि सद्‍गुरुदास्यभक्तीची कास धरण्याने प्रत्येक जण पिपीलिकापथावरून यशस्वीपणे प्रवास करू शकतो, हेदेखील ठामपणे सांगतात.