पराम्बा पूजन (Paramba Poojan)

 श्विन नवरात्रीतील सप्तमीचा दिवस ! ह्या दिवशी परमपूज्य बापूंच्या घरी मोठ्या आईचे "पराम्बा पूजन" केले जाते. ह्या वर्षीही हे पूजन नेहमीच्या उत्साही वातावरणात संपन्न झाले. बापू, नंदाई व सुचितदादांचे मोठ्या आईवरील नितांत प्रेम, तिच्या सहवासाची आणि तिला आळविण्याची नितांत आर्तता, ह्या सर्वांची अनुभूती ह्या दिवशी आम्ही सर्वांनी घेतली. मोठ्या आईच्या कृपेमुळे आम्हा काही श्रद्धावानांना हे सुंदर पूजन प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले आणि त्याचप्रमाणे अनेक श्रद्धावानांनी फेसबुक आदि सोशल मिडियाच्या माध्यमातून पूजनाच्या फोटोंच्या रूपाने त्याचा अनुभव घेतला. आपल्या घरामध्ये आज मोठी आई येणार आणि तिचे पूजन आमच्या हस्ते होणार, ह्या आनंदापोटी बापू, आई, दादांची लगबग बघण्यासारखी असते.

स्वत: परमपूज्य नंदाईंच्या मार्गदर्शनाखाली ह्या पूजनाची सर्वांगीण तयारी व्यवस्थितरित्या करण्यात आली होती. अगदी पूजनाच्या दिवशीही घरातील प्रत्येक व्यक्ती फक्त मोठ्या आईच्या पूजनाच्या तयारीमधेच मन:पूर्वक सामील झाली होती.

12140688_843085212479666_5458077545116751164_nमोठ्या आईच्या आगमनाच्या आधीचे पूजाविधी होत असताना, मोठ्या आईच्या नावाचा गजर, विविध भजनं, विविध श्लोक ह्या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण वातावरण तिच्या आगमनासाठी सज्ज झाले होते. विविध जप होत असतानाच श्रीमातृवात्सल्यविंदानम्‌ मधील अत्यंत पवित्र अशा नवार्ण मंत्राचे, म्हणजेच "ॐ ऐं र्‍हीम क्लिम चामुण्डायै विच्चे" ह्या मंत्राचे १००८ वेळा आवर्तन झाले व ही आवर्तनं होत असताना नंदाईंसोबत संपूर्ण कुटुंब त्यात अत्यंत प्रेमाने सामील झाले होते.

ह्यानंतर आपल्या लाडक्या, अत्यंत कृपाळू मोठ्या आईचे पूजनस्थळी आगमन झाले. फुलांच्या सुंदर आणि अत्यंत मनोहारी पायघड्यांवरून, "जय जगदंब जय दुर्गे" ह्या जयघोषात मोठ्या आईचे (परमपूज्य बापूंच्या घरातील मोठ्या आईच्या मूर्तीचे) अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोठ्या आईचे आगमन आणि तिची पूजनस्थळी स्थापना होताना बापू, नंदाई व सुचितदादा स्वत: जातीने सर्व गोष्टींची काळजी घेताना दिसत होते. आगमनाचा हा अवर्णनीय सोहळा बघून आम्हा सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले.

IMG_2173मोठी आई स्थानापन्न झाल्यावर बापूंच्या घरामधील देवघरातील दत्तात्रेयांच्या मूर्तीचे व "त्रिमिती श्रीयंत्राचे"ही पूजनस्थळी आगमन झाले. त्यानंतर श्रीसूक्तम्‌, श्रीदेवीअथर्वशीर्ष आदि विविध स्तोत्रांच्या आधारे मोठ्या आईचे पूर्ण वैदिक पद्धतीने होणारे परांबा पूजन पाहताना प्रत्येकजण भक्तिरसात न्हाऊन निघत होता. ह्यावर्षी झालेल्या पूजनामध्ये मोठ्या आईच्या साज श्रुंगारासाठी स्वत: नंदाईने खास तयारी केली होती. साज श्रुंगार पूर्ण होताच मोठ्या आईचे ते अत्यंत पावित्र्याने भरलेले देखणे रूप पाहून नंदाईच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळून गेले.

आपल्या मोठ्या आईलाही कोणाचीच नजर लागू नये ह्या "निरागस भावनेने" नंदाईने खूप प्रेमाने मोठ्या आईला तीट लावला. त्यानंतर मोठ्या आईला अत्यंत प्रेमाने नैवेद्य अर्पण केला गेला.

त्यानंतर "कुमारिका पूजन" झाले. कुमारिका म्हणून बापूंच्या दोन्ही नाती उपस्थित होत्या. ह्या पूजनासाठीही स्वत: परमपूज्य नंदाईने अत्यंत हौशीने तयारी करून ठेवली होती. ह्या पूजनाच्या वेळी बापू, नंदाई व सुचितदादांच्या डोळ्यांमधून आपल्या नातींच्या कुमारिकापूजना बद्दलचे कौतुक ओसंडून वाहत होते.

त्यानंतर आरती झाली. आरती म्हणजे आर्ततेने देवाला घातलेली साद; अर्थात ही साद घालताना बापू, आई, दादांच्या डोळ्यातील भाव, त्यांची तळमळ ठायी ठायी जाणवत होती. आरती नंतर मोठ्या आईचा जोगवा म्हणून "परांबा पूजनाची" सांगता झाली. असा हा परांबा पूजनाचा सोहळा ह्याही वर्षी अत्यंत मंगलमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥