नव्या वर्षाच्या श्रध्दावान मित्रांना अनिरुध्द शुभेच्छा(New Year wishes to all Shraddhavans)

ज बर्‍याच दिवसांनी आपण एकमेकांशी संवाद साधत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याच दोन प्रोजेक्टस्‌मध्ये म्हणजे जेरीयाट्रिक इन्स्टीट्यूट व श्रीअनिरुध्दधाम यांच्या कामात व्यस्त होतो व त्यानंतर दरवर्षीप्रमाणे मी बापूंबरोबर गाणगापूरला गेलो.

आज नववर्षाच्या पूर्वसंध्येवर मी तुम्हाला म्हणजेच बापूंच्या सर्व श्रध्दावान मित्रांना व त्यांच्या श्रध्दावान कुटुंबीयांना नववर्षाच्या अनिरुध्द शुभेच्छा देऊ इच्छीतो. येणारे नवीन वर्ष अंबज्ञत्वाच्या म्हणजेच आनंदाच्या मार्गाने जीवन प्रवास घडवणारे ठरो ही बापू चरणी प्रार्थना. प्रत्येक नववर्षाची सुरुवात आपण उपासनेने करत आलो आहोत. याही वर्षी बापूंचे सर्व श्रध्दावान मित्र नववर्षाचे स्वागत उपासनेबरोबर आनंदोत्सवात करतील ह्याची मला खात्री आहे.

१ जानेवारी हा दिवस अजून एका कारणामुळे आपल्या सर्व श्रध्दावानांसाठी महत्त्वाचा आहे. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीदेखील १ जानेवारीला दैनिक प्रत्यक्षचा नववर्ष विशेषांक प्रकाशित होणार आहे व या वर्षीचा विषय आधीच सांगितल्याप्रमाणे ’सोशलमिडिया- परिपूर्ण व परिपक्‍व वापर’ हा आहे. सद्‌गुरू बापू आपल्याला गेली अनेक वर्षे कॉम्प्युटरस्‌ व इंटरनेटचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगतच आले आहेत. अगदी बँकांच्या व्यवहारांपासून ते शॉपिंगपर्यंत, मुलांचे शिक्षण, त्यांचा शाळा-कॉलेजातील प्रवेशांपासूंन ते नोकरीच्या शोधापर्यंत, प्रवासाच्या तिकीटांपासून ते अगदी सरकारी कामांपर्यंत व प्रामुख्याने ऑफिसेसमध्ये तर मोठ्याप्रमाणात हे कॉम्प्युटरस्‌ व इंटरनेट वापरणं एका अर्थाने अधिकाधिक अनिवार्यच होत चाललं आहे. काळाच्या बरोबर श्रध्दावानांनी रहावं हा विधायक हेतु व दृष्टीकोनसमोर ठेवून दैनिक प्रत्यक्षचा हा नववर्ष विशेषांक येत आहे, कारण कॉम्प्युटरस्‌, इंटरनेट व त्याच बरोबर सोशल मिडिया पुढे येणार्‍या काळाची फक्त गरजच नाही तर त्याचा एक अविभाज्य भागच असणार आहे.

डिझास्टर मॅनेजमेंटच्या सेमीनारमध्ये बापू म्हणाले होते; “आज माणूस माणसापासून लांब चालला आहे. हेच एक मोठे डिझास्टर आहे.या आजच्या काळात माणसांची भावनिक जवळीक सांभाळणं व त्याचबरोबर माणसाचं ’माणूसपण’ टिकवून ठेवणं हे मोठं आव्हान आहे.” श्रीसाईसच्‍चरितात माधवरावांच्या गोष्टीत साईनाथ रामदासीला सांगतात -

जा बैस जाऊनी स्थानावरी l पोथ्या मिळतील पैशापासरी l माणूस मिळेना आकल्पवरी l विचार अंतरी राखावा ll११७ll

-    अध्याय २७

व ह्या ओवीतून साईनाथ आपल्याला जीवनात माणसं जोडून ठेवण्याच महत्व अधोरेखित करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात हेच काम सोशल मिडियाच्या माध्यमातून होणार आहे.

त्याचप्रमाणे १९व्या अध्यायात एका साईभक्ताची गोष्ट येते. ह्या गोष्टीमध्ये हा भक्त इतरांची निंदानालस्ती करताना दिसतो. ह्या निंदानालस्तीवर टिका करताना साईनाथ म्हणतात;

“पहा त्या जिभेला काय गोडी l जनलोकांची विष्ठा चिवडी l बंधु-स्वजनावर चडफडी l यथेष्ट फेडी निज हौस ll२०५ll

बहुत सुकृताचिये जोडी lआला नरजन्म जो ऎसा दवडीl तया आत्मघ्‍ना ही शिरडी lसुखपरवडी काय दे ll२०६ll”

-      अध्याय १९

आपण सर्वांनी सोशल मिडियाचा वापर करताना वरील दोन गोष्टीचं कायम भान ठेवाव अस मला प्रकर्षाने वाटतं.

आज अगदी आत्ताच सोशल मिडियाचा वापर करुन मी रायगड किल्ल्यावर स्वच्छता सेवेसाठी गेलेल्या श्रध्दावान सेवकांशी बोललो. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ३५० हून अधिक एएडीएमचे डीएमव्हीज्‌; केंद्राचे प्रमुखसेवक व स्थानिक कार्यकर्ते सेवक व मुंबईहून गेलेल्या एएडीएमच्या सेवकांशी जवळ-जवळ सव्वातास संवाद साधला. ह्या माध्यमामुळे माझ्या ऑफिसमध्ये बसून मला त्यांच्याशी संपर्क करता आला, संवाद साधता आला, त्यांच्या काही शंकांचे निरसनही मला करता आले. हे केवळ सोशल मिडियाच्या ’व्हिडीओकॉन्फरंसींग’ ने शक्य झाले. ही सोशल मिडियाची मित्रांपर्यंत परिणामकारकरित्या पोहचण्याची क्षमता आहे.

बापूंच्या सर्व श्रध्दावान मित्रांना सोशलमिडियाचा परिपूर्ण व परिपक्‍व वापर करता येवो या इच्छेसह पुन्हा एकदा सर्व श्रध्दावानांना नूतन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.      

हरि ॐ

श्रीराम

मी अंबज्ञ आहे

 [btn link="https://sadguruaniruddhabapu.com/aniruddha-wishes-of-new-year-to-shraddhavan-friends/" color="orange"]English[/btn] [btn link="https://sadguruaniruddhabapu.com/नववर्ष-की-श्रद्धावान-मित/" color="orange"] हिंदी[/btn]