इंग्रजी भाषा शिकण्यासाठी नंदाईंनी लिहीलेल्या पुस्तकांचे प्रकाशन

Nandai-Aatmabal2
नंदाई आत्मबलच्या वर्गादर्म्यान इंग्रजी शिकवताना

  मे २०१० रोजी झालेलं ’रामराज्य २०२५’ ह्या संकल्पनेवरील परमपूज्य बापूंचं प्रवचन श्रद्धावानांनी ऐकलेले आहेच. ह्या प्रवचनात बापूंनी अनेकविध विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे ’चांगल्या प्रकारे इंग्लिश भाषेत बोलायला शिकणे’. त्यावेळी बोलताना बापू म्हणाले होते की "आज इंग्लिश ही जगाच्या व्यवहाराची भाषा बनली आहे. मातृभाषेचा अभिमान जरूर बाळगावा. पण आजच्या घडीला स्वत:च्या लौकिक प्रगतीसाठी इंग्लिश सुधारणं आवश्यक आहे. जर आपल्याला जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून रहायचं असेल, तर प्रवाहीपणे इंग्लिश बोलता यायलाच पाहिजे. त्यासाठी आपण ‘अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज अ‍ॅण्ड लिंग्विस्टिक्स’ ही संस्था स्थापन करत आहोत." बापू पुढे म्हणाले होते की "अनेक माणसे इंग्लिश बोलायचं म्हटलं की विचार पहिल्यांदा आपल्या मातृभाषेत करतात आणि मग इंग्लिशमध्ये बोलतात. हे चूक आहे. ह्यामुळे विचार करण्यामध्ये आणि व्यक्त करण्यामध्ये एक दरी तयार होते. ह्या दरीमुळे भाषा ओघवती रहात नाही. भाषा ओघवती असणं महत्त्वाचे आहे. भाषेची जी फ्लुएन्सी आहे, ती महत्त्वाची आहे."

 

Nandai-Aatmabal-English2-300x190

तसेच ह्या इन्स्टिट्यूटच्या प्रमुख व सर्वेसर्वा ह्या स्वत: ‘सौ. स्वप्नगंधावीरा अनिरुद्धसिंह जोशी’ (म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नंदाई) असणार आहेत असेही बापूंनी त्यावेळी जाहीर केले होते. आपल्या सर्वांना माहितच आहे की नंदाई आज गेली अनेक वर्षं ‘स्त्रियांचे आत्मबलविकास वर्ग’ चालवित आहेत, ज्यामध्ये इंग्लिश शिकणे हे आत्मबलच्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचे अंग असते. आत्मबलाच्या वर्गामध्ये प्रवेश केलेल्या काही स्त्रियांना सुरुवातीला इंग्रजी भाषेचा गंधही नसतो. परंतु ह्याच स्त्रियांना नंदाई अवघ्या ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये इंग्रजी भाषा बोलायला व लिहायला शिकवतात, जेणेकरून आत्मबलचा क्लास केलेल्या स्त्रिया रोजच्या व्यवहारापुरती इंग्रजी भाषा वापरायला शिकतात. त्याचप्रमाणे आत्मबलच्या कोर्स अखेरीस असणार्‍या स्नेहसंमेलनामध्ये ह्यातीलच काही स्त्रिया इंग्रजी नाटिकेमध्ये आत्मविश्वासाने भाग घेतात.

ह्याच अनुषंगाने, इंग्लिश भाषा शिकण्यास उपयुक्त असणारी, स्वत: नंदाईंनी लिहीलेली पुस्तके, संचाच्या (Set) स्वरूपात लवकरच प्रकाशित होत आहेत. ह्या पुस्तकांच्या आधारे सर्व इच्छुक श्रद्धावानांसाठी इंग्लिश शिकण्यास सहज व सुलभ मार्ग खुला होईल. हे पुस्तक बघणं, वाचणं व वापरणं हा एक आगळावेगळा आनंददायी अनुभव असेल. तसेच बापूंना अपेक्षित असलेल्या रामराज्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असेल हे निश्चित.

हिंदी     English    ಕನ್ನಡ   বাংলা