देव माझा विठू सावळा - भाग ४ (Dev Majha Vithu Sawala - Part 4)

सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा - भाग ४’ याबाबत सांगितले.

...आणि हा जो खेळ मांडलाय, तो कोणी मांडलाय? त्या विठोबाने मांडलाय की त्या चंद्रभागेने मांडलाय की त्या वैष्णवांनी मांडलाय? आम्हाला प्रश्न पडतो. एक तर बाबा खेळ मांडलाय, तर तो त्या विठ्ठलाने मांडलेला असला पाहिजे कि हे जे वैष्णव नाचती-गाती म्हणताहेत, त्या वैष्णवांनी मांडलेला असला पाहिजे किंवा त्या चंद्रभागेने मांडलेला असला पाहिजे. नाही, तुकाराम महाराजांसारखे संत आपल्या प्रत्येक वाक्याचा अर्थ स्वत:च नीट सांगत असतात, फक्त आम्ही बघावा लागतो.

देव माझा विठू सावळा - भाग ४
देव माझा विठू सावळा - भाग ४ - Sadguru Shree Aniruddha Pravachan 13 Nov 2003

 

‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी। नाचती वैष्णव गाती रे।’

ह्या खेळामध्ये वैष्णव नाचताहेत आणि गाताहेत म्हणजे त्यांनी तो मांडलेला नाहीय. विठ्ठलाने मांडला असता, तुकारामांनी तसंही स्पष्ट म्हटलं असतं. शेवटी सगळा करता-करविता तोच आहे. पण तरी मला माहीत पाहिजे हा खेळ मांडलाय, तो कोणी मांडलाय? तर त्या वाळवंटाने मांडलाय. हा खेळ कोणी मांडलाय? त्या चंद्रभागेच्या कुशीत सामावलेल्या वाळवंटाने. ह्या संतांचं म्हणणं कसं आहे की ह्या नदीच्या कुशीमध्ये ते वाळवंट निवांत आहे. तिच्या काठावर वाळवंट आहे, असं त्यांचं म्हणणं नाहीये. चंद्रभागेचा आकार चंद्राच्या कोरीसारखा आहे, म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात आणि तिच्या कुशीमध्ये, ती अशी चंद्रकोर आहे आणि तिच्या त्या ह्या कोरीच्या भागामध्ये ते वाळवंट आहे, ते तिच्या कुशीत असल्यासारखं आहे. म्हणून वाळवंट हे चंद्रभागेच्या कुशीत आहे आणि ह्या वाळवंटाने खेळ मांडलाय, आपल्याच ठिकाणी.

वाळू कशी असते? वाळू कशालाच उगवू देत नाही. कुठलंही बीज टाका, ते वाळूमध्ये उगवणं शक्य नाही. खडकावरसुद्धा एक वेळ अंकुर जीव पकडेल, आम्ही बघतो, आमच्या बिल्डिंगमध्येसुद्धा कुठेही पिंपळाचं झाड उगवतं. वाळूमध्ये काहीच उगवू शकत नाही. ‘काहीही स्वीकारायचं नाही, काहीही स्वीकारायचं नाही, फक्त असायचं’ हा भाव म्हणजे वाळवंटाचा भाव. काहीही स्वीकारायचं नाही, बाहेरच्या जगातलं कुठलंही बीज येऊ द्यायचं नाही. जसं मला देवाने घडवलं, तसंच रहायचं, हा वाळवंटाचा भाव. ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी।’ म्हणजे ह्या वाळवंटानेच खेळ मांडलेला आहे. बाबांनो, तिथे खेळ मांडणारं दुसरं कोणी नाहीये, ही जी भूमी आहे नं भक्तिची, त्या भक्तिच्या भूमीनेच हा खेळ मांडलेला आहे की ती भक्तिची भूमी कशी आहे, तर ह्या चंद्रभागेच्या काठावरच्या वाळवंटासारखी. ही चंद्रभागा, ही हजारो मैल, प्रत्येक नदी हजारो मैल परिसराला सुपिक करते. पण दिव्याखाली अंधार म्हणतात ना, त्याच्या विरुद्ध पण तशाच अर्थाने दुसरं कुठलं, तर ह्या नदीच्या काठावर मात्र कुठलाही सुपिकपणा नसतो, तर वाळवंट असतं. पण तरीही जी नदी, जी सगळ्यांना ओलं करू शकते, ती ह्या वाळूला भिजवत नाही का? नाही, ती भिजवते पण ह्या वाळूला वाळूच रहायचं असतं, कारण खूप मोठे खडक ह्या चंद्रभागेच्या की कुठल्याही नदीच्या की कुठल्याही सागराच्या पाण्याने, लाटांनी वारंवार आपटून-आपटून त्या खडकांचा चक्काचूर होतो, तो चक्काचूर म्हणजे वाळू.

आम्ही सगळे भक्त असेच पाषाण असतो. परमेश्वराची हाक आम्हाला कधीही ऐकू येत नाही. संतांचे बोल आमच्या हृदयात कधीच उमटत नाहीत आणि मग त्या चंद्रभागेच्या म्हणजे कलेकलेने वाढणार्‍या भक्तीच्या लाटांनी आमच्या ह्या सगळ्या पाषाणपणाचा चुरा होत राहतो आणि तो चुरा झाल्यानंतर आमचं पाषाणत्व निघून जातं आणि मग आम्ही त्या चंद्रभागेच्या कुशीमध्ये आनंदाने मिरवतो. हे वाळवंट जे आहे, ते वाळवंट भक्तीनदीच्या कुशीतच जन्माला येतं. भक्तीनदीच्या कुशीतच वाढतं आणि तेच खेळ मांडतं. कारण पाण्यात जाणार्‍याला आणि पाण्यातून बाहेर येणार्‍याला आधार देणं हेच त्याचं काम आहे.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||

॥ नाथसंविध् ॥