देव माझा विठू सावळा - भाग ३ (Dev Majha Vithu Sawala - Part 3)

सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा - भाग ३’ याबाबत सांगितले.

देव माझा विठू सावळा - भाग ३
देव माझा विठू सावळा - भाग ३
- Sadguru Shree Aniruddha Pravachan

 

आम्ही सगळे कोण? तर ‘नाचती वैष्णव गाती रे’ आम्ही ‘वैष्णव’. हा वैष्णवांचा धर्म कसा? आम्ही कोण, कसे? तुकाराम महाराज काय सांगतात?

‘तुका म्हणे सोपी केली पायवाट। उतरावया भवसागर रे।’

कोणी केली? ह्या वाटा, हे संत ज्या दाखवतात ना, त्यांच्यावरूनच चालायचं असतं. बाकीच्या सगळ्या वाटा कुठेतरी तुम्ही चुकू शकता, पण संतांच्या पावलावर पाऊल टाकून जी वाटचाल होते नं, ती कधीच चुकत नाही, कधीच चुकत नाही आणि तीच वाट आम्हाला सांगताहेत तुकाराम महाराज,

‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी। नाचती वैष्णव गाती रे।’

हा जो ‘रे’ येतो नं संतांच्या बोलण्यामध्ये, गाण्यामध्ये, अभंगामध्ये हा त्यांचा लडिवाळपणा असतो, हा त्यांचा आग्रह असतो, हा त्यांचा हक्काने सांगणं असतं, जोर देऊन सांगणं असतं आणि जो जवळचा आहे नं, त्याला सांगणं असतं. म्हणजेच आम्ही जे काही वेडीवाकडी भक्ती करतो, ते सगळे त्या तुकारामांचे ‘रे’ आहोत. तुकाराम आम्हाला सांगताहेत की, बाबांनो बघा, कसा सुंदर! अनुपम्य! सोहळा चाललेला आहे.

‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी।’ वाळवंटी खेळ मांडलेला आहे. आणि हे वाळवंट कुठलयं? तर हे चंद्रभागेचं वाळवंट आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ‘खेळ मांडियेला’. खेळ मांडलेला आहे. खेळ चालू होता, खेळ चालू राहणार आहे किंवा राहणार नाही, असं काही नाहीयं. तर खेळ ‘मांडियेला’ आहे. मग तो तुकारामाच्या काळात जसा खरा आहे, तसा तो आज पण खरा आहे. ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी।’ वाळवंटामध्ये म्हणत नाहीत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, ‘वाळवंटी ठायी’. आपण म्हणतो नं, ‘ठायीच्या ठायी मी त्याला गप्पगार केला’ म्हणजे जागच्या जागी. ठायी म्हणजे on the spot, त्याच ठिकाणी. एक इंच बाहेर नाही की एक इंच पुढे नाही की एक इंच मध्ये नाही. असा हा खेळ मांडलेला आहे आणि कसा आहे? जागच्या जागी आहे तो खेळ, म्हणजेच तो खेळ अनंत आहे.

‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी।’

ह्या संतांचं म्हणनंच मुळी आहे की, वैकुंठ नंतर आलं. वैकुंठ second-hand आहे, first-hand आमची पंढरी आहे. आमच्या विठोबाचे चरण, हीच पंढरी आणि तीच आमची first-hand आहे. ती पहिली आहे - ‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी।’ अरे, वैकुंठ नगरीच्या गोष्टी कशाला करता? आमची पंढरी म्हणजे आमच्या पांडुरंगाचे दोन चरण, हेच पहिले आणि मग सगळं काही.

इकडे तुकाराम महाराज आम्हाला सांगताहेत, ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी।’ असा ह्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हा खेळ अगदी यथायोग्यपणे, Apt पणे, उचितपणे मांडलाय आणि तो मांडलाय, जो अनंत काळ चालू आहे.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||

॥ नाथसंविध् ॥