देव माझा विठू सावळा - भाग २ (Dev Majha Vithu Sawala - Part 2)

सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा’ याबाबत सांगितले.

ही चंद्रभागा म्हणजे संतांची ‘माऊली’. प्रत्येक भक्त काय म्हणतो की मला वाळू व्हायचयं, मला वाळवंट व्हायचंय. मला देवा तुझ्या पायीची वहाण व्हायचंय किंवा नामदेवांसारखा श्रेष्ठ भक्त म्हणतो की, परमेश्वरा, पांडुरंगा तुझा पाय माझ्या डोक्यावर नाही पडला तरी चालेल, पण तुझ्याकडे येणारा प्रत्येक भक्त आणि तुझ्याकडून परत जाणारा प्रत्येक भक्त हा माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्याचं पाऊल माझ्या डोक्यावर पडू दे.’ आणि म्हणून नामदेवांनी आपली समाधि पंढरपूरला पांडुरंगाच्या पायरीमध्येच वसवली. तो श्रेष्ठ भावच म्हणजे वाळवंट! की ह्या चंद्रभागेमध्ये, ह्या संतांच्या माऊलीमध्ये, साक्षात रखुमाईचं, राधेचं स्वरूप असणार्‍या ह्या चंद्रभागेमध्ये अवगाहन करण्यासाठी, स्नान करण्यासाठी जे कोणी भक्त जातील, त्या प्रत्येकाला ह्या वाळवंटातून जावंच लागतं आणि चंद्रभागेतून बाहेर आल्यावर परत वाळवंटात यावंच लागतं. जाताना आणि येताना, दोन्ही वेळा जो पवित्र व्हायला जातोय तोही, जो पवित्र होऊन आला तोही, हा प्रत्येक जण ह्या वाळवंटातूनच जातो. म्हणून खरा भक्त म्हणतो की बाबा, मला बाकी काही नको. नको, मोक्ष नको, पंढरी नको, काहीही नको, वैकुंठ नको; तर मला हे वाळवंट बनव. कारण ह्या चंद्रभागेच्या काठावर मी राहीन, सुखेनैव राहीन आणि आहे तसा राहिलो तरी बिघडत नाही. पण कायम चंद्रभागेच्या कुशीत राहीन, संतांच्या पायाखाली राहीन आणि म्हणूनच हे वाळवंट खेळ मांडतं. अशा निर्व्याज प्रेम करणार्‍या भक्तांची भूमी म्हणजे चंद्रभागेच्या कुशीतलं वाळवंट आणि ह्याने हा खेळ मांडलेला आहे.

माझा विठू सावळा
देव माझा विठू सावळा  - Sadguru Shree Aniruddha Pravachan

 

पंढरपूरच्या भक्तांच्यासाठी एक गोष्ट माहित्येय की, विठोबा काय नवसाला पावणारा देव म्हणून त्याची प्रसिद्धी नाही. पण तरीही आज शेकडो वर्षं लाखो भक्त अत्यंत प्रेमाने त्याची वारी करतातच. असंही कोणी मानीत नाही की बाबा, विठ्ठलाची वारी न केल्याने विठ्ठल कोपतो, हाही आमच्यामध्ये समज नाही आणि तरीही आम्ही विठ्ठलाची वारी करतो. इतर देवांची आम्ही कितीही भजनं लावली, तरी विठ्ठलाची भजनं लागली की आमचे कान आपोआप तिकडे वळतात, आमचे पाय ठेका धरतात आणि आमचे हात ताल धरतात. ज्यांनी त्याला ओळखलं आणि मग जगाला ओरडून सांगितलं की होय, हाच तो! हाच तो आपला मायबाप! हाच माझं सर्वस्व! तुझ्या चरणांसी माझे सारे सुख, बस्स! आणि म्हणूनच त्या संतांचे बोल आम्हाला कायम पाझरत राहतात. पण हे संत चालतात चंद्रभागेची वाट ज्या वाळवंटातून, ते वाळवंट म्हणजे ही भक्तिभूमी. ही रखरखीत असते, असं आम्हाला वाटतं. पण ती रखरखीत स्वेच्छेने राहते आणि तेच वाळवंट जेव्हा विशिष्ट समयानंतर पुढे सरकतं, तेव्हा तेच सुपिक जमीन करतं, तेच सुपिक होत जातं.

मग फक्त अशा ठिकाणी हे वाळवंट का बनतं? तिकडे सुपिक का बनू शकत नाही, काही मोजक्याच ठिकाणी? कारण त्याच ठिकाणी अशी जागा असते की अनेक पत्थर त्या काठावर स्थिरावलेले असतात आणि ती नदी त्या पत्थरांना फोडण्याचं काम करत असते. तीर्थक्षेत्र म्हणजे आमच्या पाषाण-हृदयांना पाझर फोडण्याची जागा, आमच्या वाईट प्रारब्ध खडकांना फोडण्याची जागा, आमच्या कठोर मनाला त्याचे तुकडे-तुकडे शतश: विदीर्ण करण्याची जागा म्हणजे हे तीर्थक्षेत्र आणि म्हणून ह्या तीर्थक्षेत्रांमध्ये जेव्हा आम्ही जातो, तेव्हा आमचा भावही त्या तीर्थाचा असला पाहिजे. कारण ह्या तीर्थक्षेत्राच्या भूमीवरती हा खेळ अव्याहतपणे चालत असतो.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||

॥ नाथसंविध् ॥