By the grace of Aniruddha Bapu my Thyroid Gland operation was successful

 
 

अनिरुद्ध बापूंच्या कृपेने माझे थायरॉईड ग्रंथीचे ऑपरेशन यशस्वी झाले

 
- उला हेस, कोनिग्स्बेर्ग, जर्मनी
 

माझं नाव उला, आपण म्हणतो त्याप्रमाणे माझं नाव उलावीरा. वीरा म्हणजे शूर.

मी 2000 सालापासून बापूपरिवारात आहे आणि तेव्हापासून वर्षातून एकदा भारतात-इथे बापूंकडे येते. बापू माझ्यासाठी काय आहेत, ते कोण आहेत, माझ्या मनात त्यांचं काय स्थान आहे, ते मला सांगायचंय.

आपण जीवनाला ‘प्रवास’ म्हणतो. बापू ह्या प्रवासात माझे मार्गदर्शक आहेत. बापू माझ्या जीवनात आल्यापासून माझं जीवन अगदी सरळ, सुरळीत चाललं आहे. त्याआधी बरीच वळणं आली आयुष्यात-सारखी दिशा बदलवणारी-पण आता नाही. आता दिशा ठरली आहे आणि ती एकच आहे. म्हणून सगळं सरळच चाललं आहे. बापूंनीच माझं जीवन बदललं आहे, अगदी पूर्णपणे. ते माझ्यासाठी प्रत्येक दिवशी, अगदी सतत असतातच. किंबहुना तेच मला दिवसभर चालवतात - सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत.

मला माझ्या कानांवर अवलंबून रहाण्याची खूप सवय आहे. मला सतत ऐकत रहायला आवडतं. निसर्गातले स्वर, संगीतातले स्वर कानावर पडले की मला खूप प्रसन्न वाटतं. मला म्हणूनच अगदी प्रथमपासूनच इथे म्हटले जाणारे मंत्र, स्तोत्र, अभंग, गजर ऐकायला, जमतील तसे म्हणायला, नाचायलाही खूप मनापासून आवडतं. इथे बापूपरिवारामध्ये आम्हाला सर्वांनी खूप सहजतेने सामावून घेतलं, सहभागी करून घेतलं. आम्ही इथल्या सर्व भक्तांबरोबर बापूंसमवेत उत्सवांमध्ये सहभागी होत असतो, नाचत-गात असतो.

इथे जर्मनीमध्येही आमच्या ग्रुपमध्ये बापूंच्या कृपेने आम्ही गाण्यांची रचना केली. दर शनिवारी आम्ही उपासनेसाठी एकत्र जमतो, मंत्र पठण करतो आणि गाणी व गजर म्हणतो. आम्ही बापूंसाठी गातो, भगवंतासाठी गातो, नंदाईसाठी गातो, सुचितदादांसाठी गातो आणि आमच्या येशुसाठीसुद्धा गातो.

माझ्यासाठी बापू म्हणजे माझा येशु - मूर्तीमंत, माझ्यासमोर उभा ठाकलेला. माझ्यासाठी बापू म्हणजे सर्वोत्तम उदाहरण आहे - आदर्श जीवन कसं जगावं ह्याचं, माझा विकास मी कसा साधावा हे सांगणारं, माझं जीवन सकारात्मक दृष्टीने प्रगती कशी साधेल हे सांगणारं! रोजच्या माझ्या आयुष्यात माझ्या गुणांना मी कसा आकार द्यावा, माझ्यात सुधारणा कशी करता येईल, त्यासाठी कसे प्रयास करावे हे सांगणारं. आम्ही कसं जगावं हे त्यांच्याकडे पाहून शिकता यावं असं दिग्दर्शित करणारं सर्वोच्च उदाहरण, मॉडेल आणि आदर्श म्हणजे बापू! मला नेहमी मार्गदर्शन मिळेल, उचित सहकार्य मिळेल अशी व्यवस्थाही त्यांच्या कृपेने होतेच. हा माझा देव, माझा सद्गुरु, माझा मित्र, माझा पिता मला इतका जवळचा वाटतो, जिवाभावाचा वाटतो की मी कधीकधी त्याच्याशी भांडते, त्याला म्हणते, ‘हे काय होतंय? मी काय करू आता? मला काहीही कळेनासं झालंय. मला हे समजत नाही, मला ते कळत नाही....’ मग एखाद्या संभाषणातून, वाचनात आलेल्या काही गोष्टीतून मला मार्ग सापडतो. बापूच तो मार्ग दाखवतात. असा संपर्क घडतो. बापू आपली सद्सद्विवेकबुद्धी बनून चुकीच्या गोष्टींपासून आपले रक्षण करतात. बापू माझे शिक्षक आहेत. अगदी सर्वार्थाने.

बापू माझीच नव्हे तर माझ्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेतात. माझ्या जुळ्या बहिणीचा तर त्यांनी इतक्याप्रेमाने संभाळ केला आहे! तिचे प्राण वाचवले, ती पूर्णपणे स्वस्थ जीवन जगते आहे, ते केवळ बापूकृपेनेच. तिनेही आपले अनुभवकथन लिहिले आहे. त्यात सर्व तपशील आहे. बापू माझ्या मित्रपरिवाराचेही रक्षणकर्ते आहेत. भारतापासून दूर, माझ्या ह्या मायदेशीसुद्धा ते आहेत, मी रहाते त्या छोट्याशा गावात-कोनिग्स्बेर्गमध्येही ते आहेतच. बापू जर्मनीत आहेतच. ते मला, इथे रहाणार्‍या आम्हा सर्वांना सांभाळतात, प्रेमाने आमची काळजी घेतात. ते असतातच....सदैव.

मला एक घटना इथे सांगायची आहे. 2004मध्ये माझं थायरॉइड ग्लॅन्डचं ऑपरेशन झालं. हे माझ्या आयुष्यातलं तिसरं ऑपरेशन होतं. पहिलं ऑपरेशन 11व्या वर्षी झालं, दुसरं 18व्या वर्षी. ह्या आधी झालेल्या दोन ऑपरेशन्स्मध्ये आणि ह्या तिसर्‍या ऑपरेशनमध्ये मोठा फरक होता. ह्या वेळेला माझ्याबरोबर बापू होते. म्हणजे ह्या वेळेला मी बापूंना ओळखत होते.

ऑपरेशनची शक्यता कळली. करावं की नाही? आम्ही मुंबईला फोन करून विचारत होतो, काय करावं कसं करावं इत्यादि. इथले जर्मनीचे डॉक्टर म्हणत होते थायरॉइड ग्लॅन्ड काढावा. सुचितदादांचे शब्द होते, ‘टेक द होल थिंग आउट!’. माझा मग लगेचच निर्णय झाला. इथेच आमच्या जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं ठरलं. त्याच वेळेस मुंबईहून एका जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. ती नंदाईसोबतच होती. बर्‍याच इतर स्त्रिया होत्या. नंदाईला मग कळलं की माझं ऑपरेशन आहे. ती म्हणाली, ‘....काहीही झालं तरी एकत्र, एकमेकाला धरून रहा.’

खरोखरच आमचा इथला ग्रुप आहे नं, तोही आमच्यासाठी मोठं वरदानच आहे बापूंचं! एकमेकांशी घट्ट बांधलेला हा आमचा ग्रुप बापू, आई व दादा - ह्या तिघांच्या प्रेमकृपेचा सतत अनुभव घेत असतो. आम्ही एकमेकांच्या मदतीला धावून जातो, एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांवर प्रेम करतो आणि एकत्र येऊन भगवंताची गाणी म्हणतो. सगळं एकत्र येऊन करण्यात आनंद असतो, नाही का? ह्या जिव्हाळ्याचा अनुभव व आनंदही आम्ही बापूंच्यामुळेच घ्यायला शिकलो.

....तर माझ्या ऑपरेशनबद्दल पुढे सांगते. अ‍ॅनेट आणि पेट्रा, ह्या माझ्या मैत्रिणी माझ्या घरी येऊन राहिल्या, माझी अगदी मनापासून काळजी तर त्या घेत होत्याच पण माझं घर, माझ्या अंगणातला बगीचा सर्व काही त्यांनी सांभाळलं. मला अगदी भरून येत असे.

ऑपरेशनच्या दिवशी मी सतत सकाळपासून बापूंचा मंत्र म्हणत होते-‘ॐ मन:सामर्थ्यदाता श्रीअनिरुद्धाय नम:’. अगदी आंघोळ करतानादेखील. हा भारतात आल्यावर आम्ही शिकलेला अगदी पहिला मंत्र होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरही मी सतत हाच मंत्र म्हणत होते. मनातून भय, कुतर्क, शंका, अशा गोष्टींना काढून टाकण्याचा हा प्रभावी उपाय आहे. ह्या मंत्राने मन भरून गेलं की ह्या नकारात्मक गोष्टींना मन थारा देत नाही; आणि तसंच झालं. माझ्या मनात ऑपरेशनच्या भीतीचा लवलेशही उरला नाही. मला असं जाणवलं की मी अधिकाधिक मोकळी, अधिकाधिक स्वच्छ होते आहे. खूप हलकं वाटू लागलं.

त्या वेळेला माझे केस लांब होते. मी वेणी घातली. शांतपणे तयारी चालली होती.

बापूंचा मंत्र चालूच होता. मला ऑपरेशन थियेटरमध्ये आणण्यात आलं. अ‍ॅनॅस्थेशिया दिला गेला. गुंगी येईपर्यंत मंत्र चालूच होता. झोपेच्या अधीन होत होते, खोल खोल जात होते. वाटत होतं, बापूंच्या मंत्रामध्येच खोल- आत, आत जाते आहे. पार बुडून गेले आहे. अशीच खोल जाता जाता येऊन ठेपले ते थेट बापूंच्या चरणांशीच! बापू एका प्रकाशाच्या सिंहासनावर बसले होते. शुभ्र पांढरा प्रकाश सगळीकडे पसरलेला होता. बापूंच्या उजव्या बाजूला सुचितदादा आणि डाव्या बाजूला नंदाई होती. बापू अगदी सहज आणि प्रेमाने हसत होते. मी त्यांच्या चरणांशी बसले होते. स्वप्नातही मला माहित होतं हेच सत्य आहे, हेच! हाच एक असा आहे, ज्याच्या वाटेवर मला चालायचं आहे; हाच एक असा आहे, ज्याच्यावर मी ठाम विश्‍वास ठेवते, निश्‍चिंतपणे. हाच माझा देव आहे. मला आतूनशांत वाटलं. ह्याच्यावरच माझा संपूर्ण आणि ठाम विश्‍वास आहे. ह्यात कधीही काहीही शंका असूच शकत नाही.

ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. मला वॉर्डमध्ये आणण्यात आलं. अ‍ॅनेट आणि पेट्रा अर्थातच थांबल्या होत्या. अ‍ॅनेट माझ्या बेडजवळ आली आणि म्हणाली, ‘‘तुझं ऑपरेशन आत्ताच झालंय असं अजिबात वाटत नाही. शांत, प्रसन्न दिसतोय चेहरा, अगदी आत्ताच देवाला भेटून आलेल्या दूतासारखा!’’ ती असं का म्हणत असावी, तिला काय दिसत किंवा जाणवत होतं, ते मला माहित नाही परंतु मला मात्र त्या क्षणी मी अनुभवलेल्या सुंदर क्षणाबद्दल शब्दांत काही सांगता येणं शक्य झालं नाही.

हा अनुभवही मला खूप काही देऊन, शिकवूनच गेला. बापूकृपेने जगाकडे पहाण्याची दृष्टी बदलली तसे जीवनही बदलले.
आमच्या ग्रुपमधील मंडळींना दैनंदिन जीवनात बापू आपले अस्तित्व ठळकपणे जाणवून देतात. कधी काही खूण पटते, कधी उचित निर्णय घेण्याची स्फूर्ती मिळते, कधी स्वप्नात मार्गदर्शन घडते. बापू निश्‍चित आणि नि:संदिग्ध अशी सूचना मिळण्याची व्यवस्था करतात. आम्ही मग एकमेकांत ह्यावर चर्चा करतो, एकमेकांना सांगतो, ह्यातूनही शिकतो, एकमेकांचे ऐकतो. हेतू हाच असतो की बापूंना काय सांगायचंय, ते ऐकायचं; बापू काय दाखवतात, ते पहायचं; बापूंची काय इच्छा आहे, त्याप्रमाणे घडावं.

सत्य, प्रेम आणि आनंद.........सदा सर्वकाळ असो!

ह्या माझ्या मैत्रिणींबरोबर मी अनेक गाणी रचली, आम्ही त्यांना चालीही लावल्या. ही गाणी आम्ही बापूंसाठी गातो, बापूंसमोर बसल्याचीच भावना असते आमची. आम्ही मुंबईलाही ह्यातली काही गाणी म्हटली आहेत. भगवंताची गाणी म्हटलेली बापूंना आवडतात. आम्ही आमची ख्रिस्ती गीतेही गातो, काही भारतीय भाषांमधली गीतेही गातो. मला स्वत:ला ही गीते गायला खूपच आवडतं. मी अगदी लहान असताना माझ्या वडिलांनी मला गिटार वाजवायला शिकवलं. आमच्या कुटुंबात सर्वच संगीताचे शौकीन आहेत. मी चर्चच्या क्वायरमध्ये गात असे. ख्रिस्थी संस्कृतीच्या वातावरणात मी वाढले. पण ही माझीच संस्कृती, त्यातील मूल्य, संस्कार बापूंनीच मला समजावले. बापू माझा येशूच आहेत. अध्यात्माला रोजच्या व्यवहारामध्ये प्रवेश आहे, किंबहुना अध्यात्म दैनंदिन जीवनात सहज मिसळलेले असले पाहिजे, हे बापूंनी मला दाखवून दिले. भगवंत माझ्या जीवनामध्ये अक्षरश: आहे, प्रत्यक्ष आहे आणि त्याच्या ह्या अस्तित्वाचा आनंद घेण्यासाठी भौतिक जीवनापासून, जबाबदार्‍यांपासून व कर्तव्यांपासून स्वत:ला तोडण्याची काहीही आवश्यकता नाही. माझ्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांपासून, माझ्या मूल्यांपासूनही मला दूर जावे लागले नाही. मी आमच्या ह्या देशातील संस्कृतीतही ‘बापू’ हा आनंद अगदी मनसोक्त उपभोगू शकते. इथल्या चर्चमधल्या सेवा उपक्रमांमध्ये व इतर समारंभांमध्ये माझा नेहमीप्रमाणे सहभाग असतो.

बापूकृपेने मला जी नोकरी मिळाली आहे, ती मी आनंदाने करते.

शेवटी आमच्या एका रचनेमधल्या काही ओळी:

‘शुभ्र’ प्रकाशाचे सिंहासन; हो, बापू असे तेथे.
प्रत्यक्ष असे, सत्यात असे; हेच सत्य असे.

ह्या ओळींमधले सत्य प्रत्येक मनुष्य अनुभवू शकतो. कुठल्याही संस्कृतीतला, कुठल्याही देशातला, कुठलीही भाषा बोलणारा.

कारण बापू सर्वांचाच आहे, बापू सर्वांसाठी आहे.

॥ हरि ॐ ॥