महारक्तदान शिबीर २०१७
दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजीत व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाच्या आधारे साकार होणार्या महारक्तदान शिबीराचे यंदा १८ वे वर्ष आहे.
१९९९ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्गुरु बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या शिबीरांचे उपक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आयोजीत करण्यात येतात. २०१६ साली महाराष्ट्रातील १०६ ठिकाणी रक्तदान शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून एकूण ११,२१६ बाटल्या रक्त जमा केले गेले. हा उपक्रम वर्षभर राबविण्यामागील अव्याहत परिश्रमांतूनच या उपक्रमाची व्यापकता कळून येते.
दरवर्षी मुंबईत होणार्या महारक्तदान शिबीरामधुनच या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. यंदा १६ एप्रिल २०१७ रोजी श्री हरिगुरुग्राम (न्यु इंग्लिश स्कुल) येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात रक्तदान शिबीर आयोजित करण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे एका बाजूस एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात ओपरेशन करून घेण्याची रुग्णांची मानसिकता व त्यामुळे प्रचंड प्रमाणात रुग्णांसाठी भासणारी रक्ताची गरज तर दुसर्या बाजूस याच काळात निर्माण होणारा रक्त पुरवठ्याचा तुटवडा. इथे एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे प्रखर उष्णतेमुळे अंगाची काहिली होत असतानाही डॉ. अनिरुद्ध जोशींचे (बापू) श्रद्धावान मित्र मोठ्या प्रमाणात या भव्य महारक्तदान शिबीरामध्ये हिरहिरीने भाग घेण्यासाठी श्री हरिगुरुग्राम येथे येतात. गेल्या १७ वर्षापासून अव्याहतपणे अशा प्रकारे शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून आजपर्यंत ५१,९०० बाटल्या रक्त जमा होणे ही एक विशेष बाब ठरत आहे. या शिबीरात अतिशय उल्हसीत वातवरण असते व शिबीरात भाग घेणारा प्रत्येक श्रद्धावान ’दातृत्वाची अनुभूती’ घेत असतो.
या वर्षी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आणि नागपूर येथील ३३ रक्तपेढ्या या शिबीरात सहभागी होणार आहेत. रुग्णालयांच्या संबंधित मेडिकल स्टाफशिवाय आपल्या संस्थेतर्फे ६० डॉक्टर व ७० पॅरामेडिक्स हे शिबीर सुरळीत पार पाडण्यासाठी आपली सेवा देणार आहेत. शिबीरात रक्तदान करणार्या श्रद्धावानांसाठी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था संस्थेतर्फे केली जाईल. मुंबईजवळील आजुबाजुच्या परिसरातील ज्या श्रद्धावांनांना या शिबीरात भाग घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी बस सेवेची व्यवस्थाही तेथील उपासना केंद्रांतर्फे करण्यात आली आहे.
गेल्या १७ वर्षात डिसेंबर २०१६ पर्यत संस्थेतर्फे दरवर्षी आयोजीत होणार्या महारक्तदान शिबीरासकट महाराष्ट्रातील विविध भागात एकूण ८५२ रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले, यात १,१७,१३८ रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या आहेत.
मला नक्कीच खात्री आहे की या वर्षीसुद्धा महारक्तदान शिबीराला नेहमीप्रमाणेच श्रद्धावानांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळेल. या शिबीरात सामील होणार्या प्रत्येक श्रद्धावानाचा सहभाग स्वागतार्ह्य असेल. जे श्रद्धावान या शिबीरात रक्तदान करण्यासाठी पात्र ठरणार नाहीत त्यांच्यासाठी संस्थेतर्फे शिबीराच्या ठिकाणी चरखा चालवण्याचीही व्यवस्था केली जाईल, कारण तेथे चरखा चालवण्याद्वारेसुद्धा असे श्रद्धावान एका प्रकारे श्रमदान करण्याचा आनंद घेऊ शकतील.