बापूंची नाशिक भेट - Bapu's visit to Nashik
श्रीगुरू रुग्णालय, नाशिक येथे बापूंचे स्वागत
आपले लाडके सद्गुरु परमपूज्य अनिरुद्धबापू, ह्यांनी नुकतीच नाशिक येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’ संचालित ‘श्रीगुरुजी रुग्णालया’ला भेट दिली. ह्या भेटी दरम्यान बापूंनी रुग्णालयातील आयसीयू, डायलिसिस रूम, जनरल वॉर्ड्स, स्पेशल रूम्स, एक्स-रे, सी टी स्कॅन, फार्मसी, ओपीडी, पॅथॉलॉजी, कॅन्सर रेडिएशन रूम इत्यादि विभागांची पाहणी केली.
त्यानंतर ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहा’मध्ये रुग्णालयाच्या आयुर्वेदिक विभागाने सुरु केलेल्या ‘आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी उपयुक्त अशा पॅकेजेस’च्या शुभारंभ बापूंच्या हस्ते संपन्न झाला. ह्या प्रसंगी रुग्णालयातील काही डॉक्टरांचा बापूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बापू डॉक्टर व इतर सदस्यांशी बोलताना
ह्या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बापूंनी सांगितले, ‘आपण दुसऱ्याच्या मताचे खंडन करण्यात पुष्कळ वेळ वाया घालवतो. जग काय बोलते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या मतांनी काहीही फरक पडत नाही. आवश्यक तेथे जरूर विरोध करावा परंतु विरोध करण्यात उगीचच वेळ वाया घालवू नये. त्याचबरोबर हल्ली आपण बघतो की गरज नसतानाही रुग्णांना रुग्णालयामध्ये अॅडमिट करून घेतले जाते. भारंभार टेस्ट्स् करायला सांगितल्या जातात. ह्याउलट काही काही ठिकाणी आपण हेही बघतो की डॉक्टरकडे येणाऱ्या रुग्णाला तपासून विशेष काहीही झाले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तरीदेखील रुग्ण काहीतरी औषध द्या, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करा म्हणून मागे लागतात. दोन्हीही गोष्टी चुकीच्या आहेत. रुग्णांचेही प्रशिक्षण होणे आवश्यक आहे.’
त्याचबरोबर बापूंनी - रुग्णालयात अॅलोपथी व आयुर्वेदिक विभागांनंतर आता होमिओपथी विभागही सुरू करण्याची नितांत आवश्यकता प्रतिपादित केली. ‘येऊ घातलेले तिसरे महायुद्ध हे अण्वस्त्रांनीच खेळले जाणार असल्याकारणाने तिथे अॅलोपथी किंवा आयुर्वेदिक उपचारपद्धती तितक्याशा प्रभावी ठरणार नाहीत, तर तिथे एनर्जी लेव्हलवर काम करू शकणारी होमिओपथी उपचारपद्धतीच कामाला येईल’ असे बापूंनी ठामपणे सांगितले.
ह्याप्रसंगी बोलताना ‘श्रीगुरुजी रुग्णालया’चे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर ह्यांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला व हे सांघिक कार्य असून ह्यात सुरुवातीपासून समाजाची भक्कम साथ मिळाली असल्याचे कृतज्ञतेने नमूद केले. तसेच ह्या दरम्यान वैद्या अश्विनी चाकूरकर व वैद्या सोनाली देशमुख ह्यांनी उपस्थितांना रुग्णालयाच्या आयुर्वेद पॅकेजेसची माहिती दिली. डॉ. गिरीश चाकूर
कर ह्यांनी प्रास्ताविक केले. ह्यावेळी श्रीगुरुजी रुग्णालयाचे उपाध्यक्ष श्री मुकुंद खाडिलकर व कार्यवाह श्री प्रवीण बुरकुले हेदेखील उपस्थित होते.हा समारंभ अयोजीत करण्यात श्री रमेशभाई मेहता यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यानंतर के.टी.एच.एम महाविद्यालयाच्या मैदानात बापूंचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. इथे हजारोंच्या संख्येने श्रद्धावान आपल्या लाडक्या सद्गुरुंना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी अगोदरपासूनच प्रतीक्षा करत होते. ह्या श्रद्धावानांकरिता मैदानात उभारलेल्या दोन मोठ्या स्क्रीन्सवर बापूंच्या सभागृहातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात होते. पण येथील उपस्थितांना प्रतीक्षा होती, ती आपल्या लाडक्या ‘डॅड’ला प्रत्यक्ष पाहण्याची-ऐकण्याची!
सभागृहातील कार्यक्रम संपवून बापू मैदानात आले मात्र; आणि मैदानात एकच जल्लोष उसळला.
इथे बापूंचे प्रवचन झाले. प्रवचनादरम्यान बापूंनी उपस्थित श्रद्धावानांना संबोधित करताना - बदलत्या जगात तगून रहायचे असेल तर मोबाईल, कॉम्प्युटर इत्यादि आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची निकड प्रतिपादित केली. बापूंच्या प्रवचनानंतर सर्व उपस्थित श्रद्धावानांकडून ‘बापू, आता संपूर्ण नाशिकचाच दौरा लवकरात लवकर करा’ असा जोरदार आग्रह केला गेला.
ह्या कार्यक्रमानंतर ‘जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते’ हा बापूंच्या, तसेच सर्व श्रद्धावानांच्याही आवडीचा - त्यांच्या ‘मोठ्या आई’चा गजर घेण्यात आला व ह्याच - सद्गुरु व श्रद्धावान ह्यांच्या परस्परप्रेमापोटी तो उत्कटतेने रंगला. सद्गुरु बापूंनाही राहवले नाही व ते आपल्या ह्या मोठ्या आईच्या गजराच्या तालावर थोडा वेळ स्टेजवर नाचलेदेखील! सगळ्यात कळस म्हणजे त्यानंतर सद्गुरु बापूंनी माईक हातात घेऊन थोडा वेळ ‘श्रीगुह्यसूक्तम्’ देखील गायले. उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटण्याचाच तो प्रसंग होता!
बापूंच्या आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांप्रमाणेच हा कार्यक्रमदेखील संपूर्णपणे यशस्वी झाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यात, आपल्या लाडक्या ‘डॅड’वर - बापूंवर जीवापाड प्रेम करणाऱ्या श्रद्धावानांचा सिंहाचा वाटा होता, ह्याचा मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
खरे म्हणजे हा कार्यक्रम बऱ्यापैकी आयत्यावेळी ठरला होता. त्यातच पावसाळा सुरू झालेला असल्याने ग्रामीण भागात पेरणीची कामेही सगळीकडे जोरात चालली होती. नाशिक जिल्ह्यातील आपल्या उपासना केंद्रांतले श्रद्धावानही त्याला अपवाद नव्ह्ते - त्यांचीही पेरणीची कामे जोरात होती. तरीदेखील केवळ आपल्या सद्गुरुंवरील प्रेमापोटी, त्या विभागातील बापुभक्त श्रद्धावानांनीच नव्हे, तर दूरदूरच्या केंद्रांतील श्रद्धावानांनीही ह्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने हजेरी लावली.
भक्तीची ताकद दर्शविणारी अजून एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे. आपणां सर्वांना माहीतच आहे की गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय झालेला आहे व ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली असल्याच्या बातम्या येऊन थडकत होत्या. रविवारचा हा नाशिकचा कार्यक्रम उघड्या मैदानात असल्याने तिथे रविवारी किंवा आदल्या दिवशी जरी पाऊस पडला, तर कार्यक्रमावर विरजण पडेल, अशी चिंता सर्वांच्या मनात अधूनमधून डोकावत होती.
त्याचकरिता आदल्या गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे व उपासनाकेंद्रांवर त्याआधीच्या शनिवारी, उपासनेच्या वेळेस जो ‘श्रीस्वस्तिक्षेमसंवाद’ घेतला जातो, त्याच्या आधी विशेष अनाऊन्समेन्ट करण्यात आली होती की ‘आज श्रीस्वस्तिक्षेमसंवादादरम्यान आपण मोठ्या आईला प्रार्थना करूया की रविवारचा हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडू दे.’
ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता दूरदूरच्या ठिकाणांहून सकाळपासूनच निघालेल्या श्रद्धावानांना वाटेत मुसळधार पावसाचा सामना करायला लागला होता. मात्र जसजसे ते नाशिकच्या जवळ येत गेले, तसतसा पाऊस कमी कमी होत असल्याचे त्यांना अनुभवास येत होते. खुद्द नाशिकमध्ये, अगदी कार्यक्रमस्थळी देखील काळ्या ढगांनी आकाशात, अगदी मैदानावरसुद्धा गच्च गर्दी केली होती. कधीही पाऊस कोसळायला सुरुवात होईल, अशी चिन्हे स्पष्ट दिसत होती....
कार्यक्रम स्थळापासून एक-दोन किलोमिटर अंतरावर पाऊस असूनसुद्धा कार्यक्रम संपेपर्यंत कार्यक्रम स्थळी मात्र एक थेंबदेखील पाऊस पडला नाही! जणू ‘कोणीतरी’ त्याची काळजी घेतली होती!! ....आणि आश्चर्य म्हणजे हा कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून तिथेही धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाली!!
नाशिकमधील प्रसारमाध्यमांनी देखील आपल्या दैनंदिन वृत्तांमध्ये पाऊसपाण्याचा समाचार देताना - ‘देशात सगळीकडेच चांगला पाऊस लागला असूनही नाशिकमध्ये मात्र पाऊस का नाही?’ असे आश्चर्य व्यक्त केले होते. (सोबत तेथील एका वृत्तपत्राचे कात्रण जोडले आहे.)
पण हीच तर प्रार्थनेची ताकद आहे....‘श्रीस्वस्तिक्षेमसंवादा’ची ताकद आहे, जी तेथील उपस्थितांनी अनुभवली. ती ‘मोठी आई’ (महिषासुरमर्दिनी) बापूंच्या श्रद्धावान बाळांसाठी काहीही करू शकते, ह्याची एक झलकच ह्या निमित्ताने पहायला मिळाली.
प्रार्थनेची ही ताकद अनुभवून, सद्गुरुंच्या सत्संगाचा आनंद मनात साठवून उपस्थित श्रद्धावान आपापल्या घरी परतले.