अतुलितबलधाम
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज द्वितीय खण्ड प्रेमप्रवास मध्ये अतुलितबलधाम असणार्या श्रीरामदूत हनुमंताच्या अद्भुत सामर्थ्याबद्दल म्हणतात - ‘मर्यादित ते अमर्याद अनंतत्व', ‘भक्त ते ईश्वरत्व', हा प्रवास करणारा एकमेव, अद्वितीय मर्यादारक्षक अर्थात्‘रक्षकगुरु'. ग्रन्थराजात बापू हेदेखील सांगतात - ‘महाप्राण हनुमंत (महारुद्र) हा आज्ञाचक्राचा स्वामी आहे. आज्ञाचक्रास ‘भक्तिचक्र' असेही म्हणतात. ज्या प्रमाणात भक्ती, त्या प्रमाणात भक्तिचक्राची कार्यावस्था.’
प्रत्येकाच्या जीवनात भक्तिचक्र व्यवस्थितपणे सक्रिय व्हावे ह्यासाठी हनुमंताच्या भक्तीचे, उपासनेचे विविध पर्याय सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी उपलब्ध करून दिले आहेत, देत आहेत. हनुमंताच्या ‘अतुलितबलधाम’ या नावास अनुसरून, सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार रत्नागिरी (महाराष्ट्र) येथील ‘अतुलितबलधाम’ मध्ये पंचमुखी हनुमंताची मूर्ती स्थापन करण्यात आली.
दर वर्षी चैत्र शुध्द पौर्णिमेस अतुलितबलधाम येथे श्रीहनुमान पौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. विशेष म्हणजे ह्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमात श्रीपंचमुखहनुमंताच्या मूर्तीवर ‘पंचकुंभाभिषेक’ केला जातो.
बापूंनी स्वत: छिन्नी-हातोडीच्या सहाय्याने ज्या शिळेतून श्रीहनुमंताची मूर्ती कोरली, त्या हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन गुरुकुल, जुईनगर येथे दर वर्षी साजरा होणार्या ‘श्रीअश्वत्थ मारुती पूजन’ उत्सवात भक्तगण घेऊ शकतात.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीहनुमंताच्या उपासनेसाठी ‘श्रीहनुमानचलिसा’ स्तोत्राचे महत्त्व सर्व श्रद्धावानांना सांगितले आहे.
बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धावान गुरुचरणमासात श्रद्धावान हनुमानचलिसाचे अधिकाधिक पठण करतात.
शनीच्या साडेसातीचा त्रास होऊ नये यासाठी हनुमंताची उपासना केली जाते. हनुमंताची भक्ती, उपासना ही सर्व सुखे प्राप्त करण्याचा राजमार्ग आहे. ‘सुंदर हे नाम असणारा हनुमंत भगवद्भक्तांचे जीवन सुंदर करणारा आहे’ हे बापूंनी त्यांच्या प्रवचनाद्वारे, लेखनाद्वारे अनेक वेळा सांगितले आहे. ‘और देवता चित्त न धरई। हनुमत सेइ सर्ब सुख करई॥’ या चौपाईचा अत्यंत सुंदर भावार्थ बापूंनी त्यांच्या ४ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या हिंदी प्रवचनात सांगितला आहे.
श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी-विरचित हनुमानचलिसा, संकटमोचन हनुमानाष्टक या स्तोत्रांचे अर्थ व्यवस्थित रित्या सांगितला आहेत, तसेच श्रीपंचमुखहनुमत्कवचाचे महत्त्व बापूंनी ०९ मार्च २०१७ पासूनच्या हिंदीतील प्रवचनांमधून सांगितले आहे.
भगवत्-चरण-प्राप्ती म्हणजेच आनंदप्राप्ती आणि दु:खनिवृत्ती यांसाठी हनुमंताच्या उपासनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीरामचरितमानसच्या सुंदरकांडावर सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दैनिक प्रत्यक्ष मध्ये १६४४ अग्रलेखांची मालिका लिहिली.
तुलसीपत्र अग्रलेख क्रमांक १ मध्ये बापू लिहितात - ‘हनुमंताच्या असीम प्रेम व कृपेमुळेच आपल्याला राम मिळाला व त्यानेच आपल्याला रामाचा दास करून घेतले, ही कृतज्ञतेची भावना संतश्रेष्ठ तुलसीदासांच्या अंतःकरणात एवढी प्रखर होती की हनुमंताचे गुणवर्णन हा त्यांचा सहजस्वभाव बनला. अशी ही तुलसीदासांची रामकथा अर्थात श्रीरामचरितमानस, म्हणूनच भक्तीच्या साम्राज्यात एका वेगळ्याच अलौकिक स्थानावर आहे.
हनुमंताच्या मार्गदर्शनानेच भक्तिमार्गावरील प्रवासात श्रद्धावानाचे प्रत्येक पाऊल पुढे टाकले जाते, श्रीहनुमंतच बोट धरून श्रद्धावानाला भक्तिमार्गाने पुढे नेतो आणि म्हणूनच हनुमंताची भक्ती करणे आवश्यक आहे, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांना सांगितले आहे. एकाच वेळेस भक्त आणि देव या दोन्ही भूमिका समर्थपणे करणारा असा हा एकमेव अद्वितीय रामदूत महारुद्र हनुमंत.
हनुमान पौर्णिमा साजरी करताना श्रद्धावान भक्ती, युक्ती आणि शक्ती यांचा दाता असणार्या, जीवन सुंदर करणार्या महाप्राण हनुमंताची प्रार्थना करतात - ‘बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार॥’