Aniruddha Bapu's Udi helped me on many occasions (अनिरुद्ध बापूंच्या उदीने मला अनेक प्रसंगी मदत केली)
मला माझे मामा-मामी मदनसिंह ठाकुरदास व सुषमावीरा ठाकुरदास ह्यांच्याकडून सर्वप्रथम सद्गुरु श्रीअनिरुद्धांबद्दल (बापू) कळले. त्यानंतर जीवनप्रवासाची एक आनंदयात्राच होऊन गेली. साध्या साध्या बाबतीतही बापू आपली किती काळजी घेतात, ह्याचेही अक्षरशः दिवसाकाठी अनुभव येऊ लागले. तब्येतीचेही पुष्कळ वर्षांपासून छळणारे प्रॉब्लेम्स हळूहळू कमी झाले.
मी दहा-बारा वर्षापासून अॅनिमिक आहे. माझे हिमोग्लोबिन अनेक वर्षांपासून 4च्या आसपास इतके खाली असते. त्यातच 2000 मध्ये अचानक पितृछत्र गमविल्यामुळे मी डिप्रेशन मध्ये गेले होते. माझ्यामध्ये एकप्रकारची निगेटीव्हीटी आली होती. उपचारांमध्ये अनियमितपणा, सतत डॉक्टर बदलत राहणे, वेळेवर औषध न घेणं, आळस आणि कंटाळा याने ग्रस्त होते.
10 मे 2010 रोजी बापूंचे रामराज्यावरील प्रवचन ऐकूनसुद्धा वानरसैनिक बनण्याच्या नियमावलीचे पालन माझ्याकडून होत नव्हते. त्यांनी ह्या प्रवचनात सांगितलेल्या गोष्टींपैकी फक्त सकाळी गरम पाणी पिणे व उपलब्ध असेल तेव्हा कडीपत्त्याची पाच सहा पाने चावून खाणे ह्या व्यतिरिक्त मी काहीच करत नव्हते. परंतु एवढ्याशा नैसर्गिक उपचारांनी देखील माझे हिमोग्लोबीन, जे तोपर्यंत केवळ 4 च्या आसपास होते, ते वाढून 10 पर्यंत पोहोचले. ते ह्याच उपायांनी शक्य झाले हे मी विश्वासाने सांगते कारण रक्तवाढीच्या वगैरे गोळ्या मी कधीच रेग्युलर घेतल्या नाहीत किंवा आहाराकडे कधी खास लक्ष दिले नाही. खरे तर 2010 पासून केवळ एवढाच बदल (सकाळी कोमट पाणी पिणे व कडीपत्त्याची पाने खाणे) मी माझ्या दिनचर्येत केला होता. पण तेवढ्यानेही माझा फायदाच झाला व माझी रोगप्रतिकारकशक्ती वाढली. खरेच, आज वाटते की बापूंचे सगळेच ऐकले असते तर....!
बापू खरंच, असंख्य चुका केल्या, खूपदा रुक्षपणे वागले; तरीपण आपल्या कृपादृष्टीत आपण अंतर दिले नाहीत. कित्येक वेळा छोट्या मोठ्या प्रसंगातून आजारपणातून रक्षण करत आलात व करत आहात. मीच भक्तीत कमी पडले आणि माझ्या सोयीनुसार आपली उपासना करत राहिले. बापू मला क्षमा करा आणि वानरसैनिक बनण्याच्या प्रयत्नाला मदत करावी ही मनापासून प्रार्थना!
आमचा बापूंवरील विश्वास जेव्हा हळूहळू दृढ होत होता, त्या सुरुवातीच्या काळातील हा दुसरा एक अनुभव आहे. 2004 सालची घटना, सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दातांच्या उपचाराकरिता गेले असता समोरच दातांच्या डॉक्टर प्रज्ञा पटवर्धन एका जोडप्याशी बोलत होत्या. ते जोडपं विजापूरहून आपल्या एक महिन्याच्या बाळाच्या ट्रीटमेंटसाठी आले होते. विजापूरच्या हॉस्पिटलमधून त्या बाळाच्या डोक्याचे ऑपरेशन करून डोकं ओबडधोबड शिवून, त्यांना पुढील ट्रीटमेंटकरिता सोलापूरला जा असे सांगण्यात आले, असे बाळाची आई रडत सांगत होती. इथे डॉ.पटवर्धन त्यांना शक्य ती सर्व मदत करू, तुम्ही शांत रहा, असे आश्वासन देत होत्या.
ते बाळाला घेऊन दाताच्या डॉक्टरकडे का आले, याचा विचार करत माझी ट्रीटमेंट घेऊन मी डॉक्टरांकडून बाहेर पडले. पण माझ्या डोळ्यांसमोर सारखे ते बाळ व त्याची रडणारी आईच येत होते. मला राहवेना. मी बाळाचा शोध घेत चाईल्ड वॉर्ड मध्ये शिरले. बाळाच्या आईला माझ्या मुलीच्या गळ्यातील बापू नंदाईचे लॉकेट दिले व ते बाळाच्या गळ्यात घालण्यास सांगितले आणि ‘संध्याकाळी उदी आणून देईन’ सांगून निघाले. रात्री पुन्हा दवाखान्यात जाऊन उदी दिली, तेव्हा डॉ.पटवर्धनही तिथेच होत्या. बाळाची अवस्था बिकट होती. त्यामुळे त्यानंतर स्वतःहून फोन करून बाळाची चौकशी करण्याची माझी हिम्मत झाली नाही. दवाखान्यात परत माझे काही कामही निघाले नाही. पण बापूचे ‘काम’ मात्र सुरू झाले होते.
नक्कीच....कारण पुन्हा एक वर्षाने दाताचा प्रॉब्लेम सुरू झाला तेव्हा परत त्याच दवाखान्यात गेले असता डॉक्टरांनी पाहताक्षणीच मला सांगितले, ‘‘तुम्ही ज्यांना लॉकेट आणि उदी दिली होती, ते बाळ ठीक झाले!’’
ऐकून माझ्या अंगावर शहारे उभे राहिले. सर्व संकेत जिथे ते बाळ वाचू शकत नाही असे निर्देश करीत होते, त्या संकेताला छेद देऊन ते बाळ वाचले होते, नव्हे वाचविण्यात आले होते!
ह्या प्रसंगाने आमच्या बापूंवरील श्रद्धेला, विश्वासाला खतपाणी मिळाले आणि बापूरूपी वटवृक्ष आमच्या घरात जोमाने वाढू लागला, त्या वृक्षाची मुळेही घट्ट रूजू लागली. आता आमची मुले घराबाहेर पडताना उदी लावून व बापूंच्या फोटोला नमस्कार करून जाताना पाहून डोळे सुखावतात. विनाकारण काळजी करण्याच्या मानसिकतेपासून बापूंनी आमची सुटका केली. आत्मविश्वास वाढविला. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, नाशिक अशा अनेक गावातून अनेक बापूभक्तांची आपुलकी आणि स्नेह मिळत गेले.
खरंच, बापू! कसे आभार मानायचे? फक्त तुझेच होऊन राहायचे!
असाच दुसरा एक अनुभव सांगते. माझ्या मिस्टरांच्या मित्राची 16 वर्षीय मुलगी कावीळ झाल्यामुळे अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली. रक्त चढविण्याची गरज असल्यामुळे त्यावेळी अनेक नातेवाईकांनी रक्तदान केले. प्लाझ्मा, रक्त खूप देण्यात आले, तरी सुद्धा तिला आराम वाटत नव्हता. तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी हैद्राबादला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यास सांगितले. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. तिचे सर्व नातेवाईक हतबल झाले होते. ह्या हॉस्पिटलमधून हैद्राबादला डॉ.रेड्डी यांच्या दवाखान्यात तिला अॅम्ब्युलन्स मधून घेऊन जाताना माझ्या मिस्टरांनी तिच्या वडिलांच्या खिशात बापूंचा फोटो ठेवला व धीर देत म्हणाले की सर्व काही ठीक होईल. आम्ही हे ठामपणे म्हणू शकलो कारण आम्हाला माहीत होते की आता बापूच काय ते करणार आहेत!
हैद्राबादला गेल्यावर कळले की पेशंटच्या पोटात विषारी गाठ झाली होती. ऑपरेशन करून गाठ काढण्यात आली. 10-12 दिवसांनी तिला घरीदेखील पाठवण्यात आले. उपचारांदरम्यान आम्ही सर्व कुटुंबीय बापू आणि नंदाईची प्रार्थना करत होतो.
आता एकच छोटीशी व सांगावीशी वाटणारी गोष्ट. आमच्या घरासमोरचे कडूनिंबाचे झाड अचानक वाळले, कीड लागून साली खाली पडू लागल्या. सर्व उपाय केल्यानंतर शेवटी त्यात संस्थेची उदी घातली.
....आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते कीड लागून वाळत चाललेले झाड पुन्हा जोमाने वाढू लागले. आज ते झाड सावली देण्याइतके बहरले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या झाडाची पाने खाल्ली असता इतर झाडांच्या कडुनिंबाच्या पानांपेक्षा कमी कडू लागतात आणि खाऊ शकतो.
माझ्या बापूची लीलाच न्यारी !